जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 107/2021. तक्रार दाखल दिनांक : 07/04/2021. तक्रार निर्णय दिनांक : 22/04/2022.
कालावधी : 01 वर्षे 00 महिने 15 दिवस
अब्दूल रहिम ईसाक शेख (मालक : ए.आर. कन्स्ट्रक्शन),
वय : 50 वर्षे, व्यवसाय : स्वंयनिर्भर, रा. खत्री हाऊस, खोरी गल्ली,
महेबूब नगर, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं.लि.,
शाखा कार्यालय, प्लॉट नं. डी-5/1, ऑफीस नं.7-10, तिसरा मजला,
एबीसी ईस्ट बिल्डींग, प्रोझोन मॉलजवळ, चिकलठाणा,
एम.आय.डी.सी., औरंगाबाद - 431 210.
(2) व्यवस्थापक, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कं.लि.,
शाखा कार्यालय, शॉप नं. एस-1 - एस-2, दुसरा मजला,
देशपांडे कॉम्प्लेक्स, नंदी स्टॉप, लातूर - 413 512.
(पुरसीस अन्वये वि.प. क्र.2 यांचे नांव वगळण्यात आले आहे.)
(3) व्यवस्थापक, हायड्रोटेक इक्विपमेंटस् प्रा.लि.,
प्लॉट नं. बी-15 ॲन्ड बी-16/2, एम.आय.डी.सी. हिंगणा
इंडस्ट्रीयल एरिया, हिंगणा रोड, नागपूर - 440 016. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 व 3 अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, स्वंयनिर्भरतेकरिता त्यांनी बांधकाम साहित्य पुरवठा व बांधकामासाठी ए.आर. कन्स्ट्रक्शन नांवे व्यवसायाकरिता Ajax Fiori Engineering Pvt. Ltd. कंपनीचे मिक्सर वाहन खरेदी केले आणि त्याचा नोंदणी क्रमांक एम.एच. 24 / ए.एस. 8936 आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडून मिक्सर वाहनाकरिता रु.27,30,250/- चे विमा संरक्षण देणारी पॉलिसी क्र.OG-21-2101-1811-00000166 घेतली असून पॉलिसी कालावधी दि.13/7/2020 ते 12/7/2021 होता.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, दि.21/1/2021 रोजी चालक शौकत मौला सय्यद हे मिक्सर वाहनाद्वारे काम करीत असताना टायरखालील माती दबल्यामुळे मिक्सर वाहन 8 ते 10 फुट खोल खड्डयामध्ये पडले. तक्रारकर्ता यांनी घटनेबाबत विमा कंपनीस माहिती दिली आणि दावा प्रपत्रासह कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर सर्वेक्षक संजय पवार व अभय कदम यांनी वाहनाचे सर्वेक्षण केले. विमा कंपनीच्या निर्देशाप्रमाणे तक्रारकर्ता यांनी मिक्सर वाहनाची दुरुस्ती करुन घेतली आणि त्याकरिता त्यांना रु.8,23,098/- खर्च आला. तक्रारकर्ता यांनी पाठपुरावा केला असता विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर केला आणि विमा रक्कम रु.8,23,098/- दिलेली नाही. विमा कंपनीच्या सेवेतील त्रुटीमुळे वाहनाद्वारे मिळणा-या रु.2,50,000/- उत्पन्नापासून वंचित रहावे लागले.
(3) तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांनी संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही विमा कंपनीने विमा दावा मंजूर केला नाही आणि सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.8,23,098/- व व्यवसायिक नुकसान भरपाई रु.2,50,000/- व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.15,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा विमा कंपनी व विरुध्द पक्ष क्र.3 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर विरुध्द पक्ष क्र.1 व विरुध्द पक्ष क्र.3 जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदनपत्र दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली. तसेच तक्रारकर्ता यांच्या पुरसीसच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष क्र.2 यांना ग्राहक तक्रारीतून वगळण्यात आले.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच तक्रारकर्ता यांचेकरिता विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकला.
(6) विमा संरक्षीत मिक्सर वाहनाच्या अपघातानंतर विमा कंपनीने विमा नुकसान भरपाई अदा केलेली नाही, असा तक्रारकर्ता यांचा मुख्य विवाद आहे. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर विमा पॉलिसी, नोंदणी प्रमाणपत्र, मिक्सर वाहनाचे छायाचित्रे, विरुध्द पक्ष क्र.3 यांनी दिलेले टॅक्स इन्व्हाईस, विमा कंपनीचा पत्रव्यवहार इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांच्या मिक्सर वाहन नोंदणी क्रमांक एम.एच. 24 / ए.एस. 8936 करिता विमा कंपनीकडे रु.27,30,250/- विमा संरक्षण देणारी पॉलिसी क्र.OG-21-2101-1811-00000166 दि.13/7/2020 ते 12/7/2021 कालावधीकरिता निर्गमीत केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्या मिक्सर वाहनाचे नुकसान झाल्याचे दर्शविणारे छायाचित्रे व मिक्सर वाहन दुरुस्तीकरिता केलेल्या खर्चासंबंधी टॅक्स इन्व्हाईस अभिलेखावर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ता यांच्या मिक्सर वाहनाकरिता विमा कंपनीकडे विमा संरक्षण असल्याचे व विमा कालावधीमध्ये वाहनाचा अपघात झाल्याचे निदर्शनास येते.
(7) विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनी व विरुध्द पक्ष क्र.3 यांना जिल्हा आयोगाद्वारे पाठविण्यात आलेले सूचनापत्र प्राप्त झालेले आहे. परंतु ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि उचित संधी प्राप्त होऊनही त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. वास्तविक पाहता, तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे खंडण करण्यासाठी लेखी निवेदनपत्र व पुराव्याची कागदपत्रे दाखल करण्यासाठी त्यांना उचित संधी होती. विरुध्द पक्ष क्र.1 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना विमा रक्कम का दिली नाही ? याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा त्याबाबत योग्य स्पष्टीकरण, उत्तर व कागदपत्रे अभिलेखावर दाखल केलेले नाहीत. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांना व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस आव्हानात्मक निवेदनपत्र व विरोधी पुरावा उपलब्ध नसल्यामुळे तक्रारकर्ता यांची वादकथने व तक्रारीपृष्ठयर्थ दाखल केलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
(8) प्रथमत: विमा कंपनीचे दि.5/2/2021 चे पत्र पाहता 7 दिवसाचे आत काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देशीत केलेले आहे. त्या पत्रासाठी तक्रारकर्ता यांनी दिलेल्या उत्तरामध्ये सर्वेक्षक यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता केल्याचे नमूद केले आहे. त्यानंतर विमा कंपनीचे दि.24/3/2021 चे पत्रानुसार उपलब्ध कागदपत्रांनुसार नुकसानीच्या वेळी श्री. सुखवास पवार हे वाहन चालवत होते आणि अनुचित लाभ मिळविण्यासाठी विमा कंपनीकडे दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे व कागदपत्रांची मागणी केल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर विमा कंपनीचे दि.29/3/2021 रोजीचे पत्र पाहता मागील पत्राच्या अनुषंगाने स्पष्टीकरण प्राप्त न झाल्यामुळे विमा दावा नामंजूर केल्याचे निदर्शनास येते.
(9) कागदपत्रांच्या अवलोकनाअंती व तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मिक्सर वाहनाकरिता विमा नुकसान भरपाई अदा केलेली नाही, ही बाब स्पष्ट होते. प्रामुख्याने दिशाभूल करणारी माहिती व कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा नामंजूर केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार अपघातसमयी शौकत मौला सय्यद हे मिक्सर वाहन चालवत होते. उलटपक्षी, विमा कंपनीचा पत्रव्यवहार पाहता श्री. सुखवास पवार हे अपघातसमयी मिक्सर वाहन चालवत होते. वास्तविक पाहता, शौकत मौला सय्यद किंवा श्री. सुखवास पवार हे मिक्सर वाहन चालवत असल्यासंबंधी त्यांचे शपथपत्र दिसून येत नाही. असे असले तरी तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर शौकत मौला सय्यद यांचा वाहन चालविण्याचा परवाना दाखल केलेला आहे. विमा कंपनीतर्फे त्याचे खंडन करण्याकरिता लेखी निवेदनपत्र, शपथपत्र किंवा उचित पुरावा दाखल केलेला नाही. अपघातसमयी श्री. सुखवास पवार हे मिक्सर वाहन चालवत होते, असे दर्शविणारा स्वतंत्र पुरावा नाही. अशा स्थितीमध्ये अपघातसमयी शौकत मौला सय्यद हे मिक्सर वाहन चालवत होते, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(10) विमा कंपनीने दि.29/3/2021 रोजीच्या पत्रानुसार श्री. सुखवास पवार यांचा वैध व कार्यक्षम वाहन चालविण्याचा परवाना, योग्य भरलेले व विमाकर्ता यांचेद्वारे स्वाक्षरीत व शिक्का असणारे दावा प्रपत्र, चालकाचे वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे व एम.एल.सी., अपघात तारीख व चालकाचे नांव निश्चित करणारा कागदोपत्री पुरावा इ. कागदपत्रे अप्राप्त असल्याचे नमूद केलेले आहे. परंतु तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीच्या प्रथम पत्र दि.5/2/2021 च्या अनुषंगाने दावा प्रपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, चालकाचे नांव व अपघात तारीख, अंदाजपत्रक, ओळखपत्र इ. कागदपत्रे दि.8/2/2021 रोजी सर्वेक्षक यांच्याकडे सुपूर्त केल्याचे आणि अपघातामध्ये चालक किंवा इतर व्यक्ती जखमी न झाल्यामुळे फिर्याद न नोंदवल्याचे किंवा पोलीस पंचनामा केला नसल्याचे कळविलेले आहे. अशा स्थितीमध्ये विमा कंपनीतर्फे उचित पुरावा दाखल नसल्यामुळे किंवा सर्वेक्षकाचे शपथपत्र नसल्यामुळे तक्रारकर्ता यांचे दि.13/2/2021 रोजीचे पत्र अमान्य करता येणार नाही. उक्त विवेचनाअंती विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्याद्वारे कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अयोग्य व अनुचित कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत आणि तक्रारकर्ता हे विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र ठरतात.
(11) विमा कंपनीद्वारे तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत व क्षतीग्रस्त वाहनाचे सर्वेक्षण केल्याबाबत सर्वेक्षक यांचा अहवाल दाखल केलेला नाही. तक्रारकर्ता यांच्या मिक्सर वाहनाकरिता केलेल्या खर्चाचे मुल्यांकन किंवा मुल्यनिर्धारण उपलब्ध नाही. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या दुरुस्ती पावत्यांचा विचार करुन विमा नुकसान भरपाई निश्चित करणे न्यायोचित आहे. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर रु.9,56,768/- रकमेच्या वेगवेगळ्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. परंतु तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार वाहन दुरुस्तीकरिता रु.8,23,098/- खर्च करावा लागला आहे. तक्रारकर्ता यांच्या स्वंय-स्वीकृतीमुळे त्यांना रु.8,23,098/- खर्च करावा लागल्याचे ग्राह्य धरण्यात येते. तक्रारकर्ता यांच्या मिक्सर वाहनाची नोंदणी दि.13/3/2019 रोजी झालेली आहे. मिक्सर वाहनास दि. 21/1/2021 रोजी अपघात झाला. म्हणजेच अपघातसमयी मिक्सर वाहनाचे वय 1 ते 2 वर्षादरम्यान होते. आमच्या मते, वाहनाच्या खर्चाचे मुल्यनिर्धारण करीत असताना बीमा विनियामक व विकास प्राधिकरण यांच्या दि.8/1/2013 रोजीच्या संदर्भ : IRDA/NL/ORD/MISC/006/01/2013 या आदेशानुसार घसारा विचारात घ्यावा लागेल. असे दिसून येते की, 1 वर्षापेक्षा कमी व 2 वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या वाहनाकरिता 10 टक्के घसारा वजावट करणे आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे त्यांनी केलेल्या रु.8,23,098/- खर्चाच्या 90 टक्के रु.7,40,788/- विमा नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात.
(12) तक्रारकर्ता यांनी विमा रकमेवर अपघात तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.29/3/2021 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विमा कंपनीस आदेश करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(13) तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांच्याकडून त्यांचा क्षतीग्रस्त वाहनाची दुरुस्ती करुन घेतली आहे. तक्रारकर्ता यांचा मुख्य वाद हा विमा रकमेसंबंधी आहे. विरुध्द पक्ष क्र.3 यांनी त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्यासंबंधी स्पष्ट वादकथने ग्राहक तक्रारीमध्ये नमूद नाहीत. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.3 हे तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई देण्याकरिता जबाबदार नाहीत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द आदेश नाहीत.
(14) तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.15,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. हे सत्य आहे की, नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना गृहीतक हे त्या–त्या परिस्थितीवर आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना विमा रक्कम मिळविण्याकरिता विमा कंपनीकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. विमा रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(15) तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडून मिक्सर वाहन बंद राहिल्यामुळे रु.2,50,000/- नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. वास्तविक पाहता, तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडून अनुवर्ती नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. अशाप्रकारे अनुतोष मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र नाहीत. त्यामुळे त्यांची प्रस्तुत मागणी अमान्य करण्यात येते.
(16) उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना विमा संरक्षीत मिक्सर वाहनाकरिता रु.7,40,788/- विमा नुकसान भरपाई द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना रु.7,40,788/- रकमेवर दि.29/3/2021 पासून प्रस्तुत पूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-