जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 261/2021. आदेश दिनांक : 20/04/2022.
तुकाराम पि. रावण उपाडे, वय 45 वर्षे, व्यवसाय : वकिली,
रा. वैशाली नगर, बाभळगांव, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, दी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि.,
एशियन बिल्डींग, डी.ओ. 1117000, तिसरा मजला,
आर. कामनी रोड, बालार्ड इस्टेट, मुंबई - 400 001.
(2) व्यवस्थापक, दी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लि.,
वसंत संकुल, आश्विनी हॉस्पिटलजवळ,
औसा रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(3) अध्यक्ष, बार कॉऊन्सील ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा,
हायकोर्ट विस्तारीत इमारत, दुसरा मजला, मुंबई - 400 001.
(4) अध्यक्ष, लातूर जिल्हा वकील मंडळ, जिल्हा व सत्र न्यायालय,
लातूर, मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- नितीन पी. गिरी
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.4,02,000/- नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) प्रस्तुत प्रकरण दाखलपूर्व युक्तिवादाकरिता ठेवण्यात आले. आज दि.20/4/2022 रोजी तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ अनुपस्थित आहेत.
(3) ग्राहक तक्रारीमध्ये तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, विरुध्द पक्ष क्र.3 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे घेतलेल्या विमा पॉलिसीकरिता त्यांनी प्रपत्र सादर करुन वैयक्तिक विम्याकरिता रु.552/- व वैद्यकीय विम्याकरिता रु.3,968/- हप्ता भरणा केला. तक्रारकर्ता यांची शस्त्रक्रिया करण्यात येऊन दि.23 ते 26/7/2017 कालावधीमध्ये वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर विमा रक्कम मिळण्याकरिता दि.15/11/2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडे विमा दावा सादर केला. परंतु तक्रारकर्ता यांना विमा रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे रु.2,62,000/- वैद्यकीय खर्च व इतर नुकसान भरपाईसह एकूण रु.4,02,000/- विरुध्द पक्ष यांच्याकडून मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
(4) तक्रारकर्ता यांचे ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने व तक्रारीसोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. सकृतदर्शनी, प्रस्तुत ग्राहक तक्रार जिल्हा आयोगामध्ये दाखल करण्यासाठी विलंब झाला काय ? हा मुद्दा उपस्थित होतो. तक्रारकर्ता यांनी दि.15/11/2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याकडे विमा दावा प्रपत्र सादर केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार दि.21/9/2021 रोजी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले आहे आणि ग्राहक तक्रार योग्य त्या मुदतीमध्ये दाखल केलेली आहे.
(5) तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दि.26/11/2021 रोजी दाखल केलेली आहे. वास्तविक, दि.15/11/2017 पासून विहीत मुदतीमध्ये म्हणजेच 2 वर्षाच्या आत ग्राहक तक्रार दाखल केलेली नाही. तसेच पत्रव्यवहार करुन मुदतीच्या कालावधीमध्ये वाढ केली जाऊ शकत नाही, असे वरिष्ठ आयोगाचे न्यायिक प्रमाण आढळून येते. ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 69 अन्वये प्रस्तुत ग्राहक तक्रार मुदतीच्या आत दाखल केलेली नसल्यामुळे तक्रार दाखल करुन घेण्यास पात्र नाही. त्यामुळे तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/20422)