जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 303/2022. तक्रार नोंदणी दिनांक : 20/10/2022.
तक्रार दाखल दिनांक : 14/11/2022. तक्रार निर्णय दिनांक : 18/12/2024.
कालावधी : 02 वर्षे 01 महिने 29 दिवस
व्यंकट गोरोबा गायकवाड, वय 37 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. माकणी (थोर), ता. निलंगा, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, चोला एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
शॉप नं. 4, प्लॉट नं. 32, रोकडिया हनुमान कॉलनी,
एल.एम.एस. ज्वेलर्ससमोर, जालना रोड, औरंगाबाद.
(2) चोला एम.एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
टिळक नगर, लातूर, ता. जि. लातूर.
(3) व्यवस्थापक, इंडो मोबाईल सेल्स ॲन्ड सर्व्हीसेस मर्यादीत,
एम.आय.डी.सी. 5 नंबर चौकाजवळ, बार्शी रोड, लातूर, ता. जि. लातूर. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. वैजनाथ ए. कुंभार
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. एस.जी. डोईजोडे
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अमोल एम. निंबुर्गी
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, ते सुशिक्षीत बेरोजगार असल्यामुळे उपजीविकेसाठी दि.13/5/2019 रोजी त्यांनी नवीन बोलेरो जीप क्र. एम.एच.24 ए.एस.9982 (यापुढे "विमा संरक्षीत वाहन") खरेदी केली. दि.9/9/2020 ते दि.8/9/2021 विमा कालावधीकरिता रु.8,667/- विमा हप्ता भरणा करुन विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे विमा उतरविलेला होता. विमा संरक्षीत वाहनाचा विमापत्र क्र. 3407/00014606/000/00 आहे. दि.11/3/2021 रोजी तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत वाहनास अपघात होऊन 100 टक्के नुकसान झाले. अपघाताच्या घटनेबद्दल विमा कंपनीस माहिती दिली. विमा कंपनीचे सर्वेक्षक श्री. रवी यांनी घटनास्थळावर येऊन क्षतीग्रस्त विमा संरक्षीत वाहनाची पाहणी व तपासणी केली आणि विमा संरक्षीत वाहनाचे 100 टक्के नुकसान झाल्याचे मान्य करुन अहवाल तयार केला. त्यानंतर तक्रारकर्ता यांनी विमा संरक्षीत वाहन दुरुस्तीसाठी विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "इंडोमोबाईल") यांच्याकडे जमा करुन रु.40,000/- अनामत जमा केले.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, सर्वेक्षक श्री. रवी यांच्या सूचनेनुसार त्यांनी विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला. त्यांचा विमा दावा क्रमांक 21030/2021 आहे. तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीकरिता इंडोमोबाईल यांना मान्यता देण्याकरिता सर्वेक्षक श्री. रवी यांनी जाणीवपूर्वक 3 महिने टाळाटाळ केली. इंडोमोबाईल यांनी दि.9/10/2021 रोजी विमा संरक्षीत वाहनाची पूर्णपणे दुरुस्ती केली आणि त्याकरिता रु.4,36,823/- देयक दिले. परंतु दुरुस्तीकरिता आलेला खर्च विमा कंपनीने इंडोमोबाईल यांना देण्याकरिता टाळाटाळ केली. मात्र विमा कंपनीने विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीकरिता रु.3,25,281/- खर्च आकारला आणि त्यामधून अनेक रकमांची वजावट करुन रु.2,92,740/- निव्वळ आकारणी केली. विमा कंपनीने विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्ती खर्चाची रक्कम इंडोमोबाईल यांना अदा न केल्यामुळे तक्रारकर्ता यांचे विमा संरक्षीत वाहन जागेवर थांबून राहिल्यामुळे प्रतिमहा रु.35,000/- प्रमाणे नुकसान होत आहे. विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता विमा कंपनीने दखल घेतली नाही. विमा कंपनीने सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च रु.4,36,823/-; वाहन जागेवर थांबून राहिल्यामुळे नुकसान भरपाई रु.5,00,000/-; मानसिक त्रासाकरिता रु.40,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.20,000/- देण्याकरिता विमा कंपनीस आदेशीत करण्यात यावे, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश कथने अमान्य केले आहेत. विमा कंपनीचे कथन असे की, तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्यांनी त्रुटी निर्माण केलेली नाही आणि त्यांच्याविरुध्द बेकायदेशीर ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे. विमा कंपनीचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे विमा संरक्षीत वाहनाचा विमा उतरविला आणि त्यांनी विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार विमा संरक्षीत वाहनाची जोखीम स्वीकारलेली आहे. परंतु, तक्रारकर्ता यांनी विमापत्राच्या अटी व शर्तीचे पालन केले नसल्यामुळे नुकसान भरपाई मागणीचा तक्रारकर्ता यांना अधिकार नाही.
(4) विमा कंपनीचे पुढे कथन असे की, तक्रारकर्ता यांना वाहनाच्या नुकसान भरपाईसंदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या असता दखल न घेतल्यामुळे तक्रारकर्ता यांचा विमा दावा बंद करण्यात आला. त्यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारकर्ता यांनी खोटी ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे. अंतिमत: विमा कंपनीद्वारे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
(5) इंडोमोबाईल यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले आणि त्यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली नसल्याचे नमूद केले. त्यांचे कथन असे की, तक्रारकर्ता यांनी विमा संरक्षीत वाहन दुरुस्तीकरिता त्यांच्याकडे जमा केले; परंतु दुरुस्तीचे शुल्क मिळाले नसल्यामुळे त्यांच्याकडे जमा आहे. विमा संरक्षीत वाहन नेण्यात न आल्यामुळे तक्रारकर्ता यांच्याकडून प्रतिदिन रु.200/- प्रमाणे दि.9/10/2021 पासून भाडे अप्राप्त आहे. तक्रारकर्ता यांच्याकडून रु.40,000/- व्यतिरिक्त अन्य रक्कम प्राप्त झालेली नाही. विमा कंपनीकडून विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीची देयक रक्कम प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्ता यांना दुरुस्ती देयक देण्यात आले. इंडोमोबाईल यांच्या विरुध्द ग्राहक तक्रारीचे कारण निर्माण झालेले नाही आणि विनाकारण ग्राहक तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्याची विनंती इंडोमोबाईल यांच्यातर्फे करण्यात आली.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनी व इंडो मोबाईल यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी होय
केल्याचे सिध्द होते काय ? (विमा कंपनीने)
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन संयुक्तपणे करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत वाहनाचा विमा कंपनीकडे विमापत्र क्र. 3407/00015606/000/00 अन्वये दि.9/9/2020 ते दि.8/9/2021 कालावधीकरिता विमा उतरविलेला होता, याबद्दल उभय पक्षांमध्ये मान्यस्थिती आहे. दि.11/3/2021 रोजी तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत वाहनास अन्य वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला, असे दर्शविणारे पोलीस कागदपत्रे अभिलेखावर दाखल आहेत.
(8) तक्रारकर्ता यांचे कथन असे की, त्यांनी इंडोमोबाईल यांच्याकडे विमा संरक्षीत वाहन दुरुस्तीकरिता जमा केले आणि इंडोमोबाईल यांनी दि.9/10/2021 रोजी विमा संरक्षीत वाहनाची पूर्णपणे दुरुस्ती करुन रु.4,36,823/- देयक दिले; परंतु विमा कंपनीने तो खर्च विमा कंपनीने इंडोमोबाईल यांना देण्याकरिता टाळाटाळ केली. शिवाय, विमा कंपनीने अनेक रकमांची वजावट करुन दुरुस्ती खर्चाकरिता रु.2,92,740/- निव्वळ आकारणी केली. उलटपक्षी, विमा कंपनीचे कथन असे की, त्यांनी विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार विमा संरक्षीत वाहनाची जोखीम स्वीकारलेली आहे आणि तक्रारकर्ता यांनी विमापत्राच्या अटी व शर्तीचे पालन केले नसल्यामुळे नुकसान भरपाई मागणी करण्याचा त्यांना अधिकार नाही.
(9) विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीबद्दल इंडोमोबाईल यांचे देयक क्र. INS22A000116 दि. 9/10/2021 रु.4,23,423/- व देयक क्र. RBR22A001875 दि. 9/10/2021 रु.1,395/- तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर दाखल केले आहे. विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्ती खर्चाचे मुल्यांकन करणारा सर्वेक्षक श्री. रवी किशोर आकाशकोरे यांचा सर्वेक्षण अहवाल विमा कंपनीतर्फे अभिलेखावर दाखल केलेला आहे. त्या सर्वेक्षण अहवालामध्ये एकूण रु.3,24,972.06 दुरुस्ती खर्चाबद्दल रु.2,85,772.06 चे निव्वळ मुल्यनिर्धारण केलेले दिसून येते.
(10) सकृतदर्शनी, देयक क्र. INS22A000116 अन्वये विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीकरिता रु.4,23,423/- खर्च आलेला असून ते देयक अभिलेखावर दाखल आहे. असे असताना, सर्वेक्षक श्री. रवी किशोर आकाशकोरे यांनी देयक क्र. INS22A000116 चा आधार घेऊन रु.3,24,972.06 अशा अल्प रकमेचे मुल्यांकन का केले ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सर्वेक्षण अहवालामध्ये देयक क्र. INS22A000116 चा उल्लेख केला असताना त्यामध्ये नमूद देयक रक्कम रु.4,23,423/- प्रमाणे सर्वेक्षकांनी दुरुस्ती खर्चाचे मुल्यांकन केलेले नाही आणि त्या कृतीबद्दल सर्वेक्षण अहवालामध्ये आवश्यक व उचित स्पष्टीकरण नाही. अशा स्थितीत, निश्चितपणे सर्वेक्षकांचा अहवाल दोषपूर्ण मानावा लागेल. विमा दावा निर्णयीत करताना सर्वेक्षकांचा अहवाल आवश्यक व महत्वपूर्ण दस्त असला तरी तो अंतिम नाही, हे स्थापित तत्व आहे. करिता, सर्वेक्षक श्री. रवी किशोर आकाशकोरे यांचा सर्वेक्षण अहवाल दोषपूर्ण असल्यामुळे स्वीकारार्ह नाही, या निष्कर्षास आम्ही येत आहोत.
(11) विमा कंपनीचा प्रतिवाद असा की, तक्रारकर्ता यांनी विमापत्राच्या अटी व शर्तीचे पालन केले नसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मागणी करण्याचा अधिकार नाही. तसेच, तक्रारकर्ता यांना वाहनाच्या नुकसान भरपाईसंदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या असता दखल न घेतल्यामुळे विमा दावा बंद करण्यात आला. विमा कंपनीच्या प्रतिवादाची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी विमापत्राच्या कोणत्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले किंवा अनुपालन केले नाही, याबद्दल उचित स्पष्टीकरण नाही किंवा पुरावा नाही. तसेच, विमा कंपनीने विमा दावा बंद करुन तक्रारकर्ता यांना तसे सूचित केले, असाही पुरावा नाही. विमा कंपनीने दि.21/10/2021 रोजीचे DO/Liability Letter अभिलेखावर दाखल केले आहे आणि ज्यामध्ये उर्वरीत रक्कम भरणा करुन वाहनाचा ताबा घेणे व रु.2,92,701.58 मंजूर केलेली असून रक्कम देण्यासंदर्भात Original Invoice, Satisfaction Voucher & Discharge Voucher जमा करण्याबद्दल उल्लेख आढळतो. परंतु ते पत्र किंवा दस्त तक्रारकर्ता यांना पाठविल्याबद्दल पुरावा नाही.
(12) सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांचा विमा दावा निर्णयीत करताना विमा कंपनीने नियुक्त केलेल्या सर्वेक्षकांद्वारे विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्ती खर्चाचे उचित मुल्यनिर्धारण करण्यात आलेले नाही आणि त्याच दोषयुक्त सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा निर्णयीत करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. तसेच, तक्रारकर्ता यांना विमा रक्कम अदा करण्याबद्दल विमा कंपनीने आवश्यक प्रयत्न केलेला नाही, हे सिध्द होते. तक्रारकर्ता यांना कोणत्याही प्रकारे विमा रक्कम दिली जाऊ नये, हा गैरउद्देश विमा कंपनीद्वारे अवलंबलेला आहे. तक्रारकर्ता यांना योग्य विमा रक्कम न देण्याचे विमा कंपनीचे कृत्य सेवेमध्ये त्रुटी ठरते आणि तक्रारकर्ता हे विमा कंपनीकडून विमा रक्कम मिळण्याकरिता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(13) तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडून रु.4,36,823/- रकमेची मागणी केलेली आहे. वस्तुत: रु.2,92,701/- विमा रक्कम मंजूर केल्याबद्दल तक्रारकर्ता यांना माहिती होती, हे तक्रारकर्ता यांच्या कथनावरुन स्पष्ट होते. इंडोमोबाईल यांनी विमा संरक्षीत वाहन दुरुस्तीबद्दल दिलेले रु.4,23,423/- चे देयक अभिलेखावर दाखल आहे. विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीकरिता करण्यात आलेला तो प्रत्यक्ष खर्च आहे आणि ते देयक अमान्य करण्यास अन्य कारण नाही. असे दिसते की, विमा संरक्षीत वाहनाचे उत्पादन फेब्रुवारी 2019 मध्ये झाले आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये दि.13/5/2019 रोजी नोंदणी करण्यात आली. दि.11/3/2021 रोजी विमा संरक्षीत वाहनास अपघात झालेला आहे. यावरुन विमा संरक्षीत वाहनाच्या नोंदणीनंतर 2 वर्षाच्या आत अपघात झाल्याचे स्पष्ट होते. विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्ती खर्चाचे मुल्यनिर्धारण करीत असताना 1 वर्षापेक्षा जास्त व 2 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या वाहनाकरिता 10 टक्के घसारा वजावट होतो. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे विमा संरक्षीत वाहनाच्या दुरुस्तीकरिता कराव्या लागलेल्या रु.4,23,423/- खर्चाच्या 90 टक्के रक्कम रु.3,81,080.70/- विमा नुकसान भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात.
(14) तक्रारकर्ता यांनी विमा संरक्षीत वाहनाच्या टायरबद्दल रु.13,400/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. परंतु तक्रारकर्ता किंवा इंडोमोबाईल यांच्याद्वारे त्याबद्दल आवश्यक पुरावा दाखल केलेला नाही आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांची प्रस्तुत विनंती ग्राह्य धरता येत नाही.
(15) विमा कंपनीने इंडोमोबाईल यांना विमा रक्कम न दिल्यामुळे 15 महिन्यांपासून विमा संरक्षीत वाहनाचा वापर करता आला नाही आणि त्याकरिता रु.5,00,000/- नुकसान भरपाईची मागणी तक्रारकर्ता यांनी केलेली आहे. वस्तुत: तक्रारकर्ता यांचे विमा संरक्षीत वाहन व्यवसायिक वाहन होते आणि त्याचा व्यवसायिक किंवा भाडे तत्वावर वापर केला जात होता, असा पुरावा नाही. शिवाय, तक्रारकर्ता यांची मागणी अनुषंगिक नुकसान भरपाई असल्यामुळे मान्य करण्यास पात्र नाही.
(16) तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडून मानसिक त्रासाकरिता रु.40,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना परिस्थितीनुरुप गृहतिके आधारलेले असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना विमा रक्कम मिळविण्याकरिता विमा कंपनीकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. विमा रक्कम प्राप्त न झाल्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व त्रासाकरिता रु.7,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(17) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.3,81,080.70/- विमा नुकसान भरपाई द्यावी.
ग्राहक तक्रार क्र. 303/2022.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने आदेश क्र.2 अन्वये देय रक्कम आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत अदा न केल्यास प्रस्तुत आदेश तारखेपासून उक्त रक्कम अदा करेपर्यंत त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज देय राहील.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.7,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-