जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 83/2021. तक्रार दाखल दिनांक : 10/03/2021. तक्रार निर्णय दिनांक : 06/06/2022.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 27 दिवस
बालाजी पि. किसनराव पाटील, वय 53 वर्षे,
रा. बोळेगाव (स.चि.), ता. निलंगा, जि. लातूर,
ह.मु. अब्दूल रहेमान शेख चाळ, देवजी नगर,
नारपोली, भिवंडी, जि. ठाणे. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कं.लि.,
दुसरा मजला, DARE हाऊस 2, एन.एस.सी. बोस रोड,
चेन्नई - 600 001.
(2) व्यवस्थापक, चोलामंडलम एम.एस. जनरल इन्शुरन्स कं.लि.,
अशोक हॉटेल बिल्डींग, तळमजला, लातूर, ता. जि. लातूर - 413 512.
(3) व्यवस्थापक, इन्डसलॅड बँक लि., तळमजला, कोरल स्क्वेअर, विजय गार्डन
नाका, सुरज वॉटर पार्कसमोर, घोडबंदर रोड, ठाणे - 400 607.
(4) व्यवस्थापक, इन्डसलॅड बँक लि., निर्मल हाईटस्,
नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर - 413 512. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- सुरेश जी. डोईजोडे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांचा अविवाहीत मुलगा वैभव बालाजी पाटील (यापुढे "मयत वैभव") यांचा दि.24/5/2020 रोजी रात्री झोपेमध्ये खुन झाला आहे. मयत वैभव यांच्या ट्रक क्र. एम.एच.04/जी.आर.0884 करिता विरुध्द पक्ष क्र.3 व 4 (यापुढे "इंडस् इंड बँक") यांच्याकडून कर्ज घेतलेले होते आणि इंडस् इंड बँकेने विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे "चोलामंडलम इन्शुरन्स") यांच्याकडे अपघाती मृत्यूकरिता रु.10,00,000/- चे विमा संरक्षण घेतलेले होते. मयत वैभव यांच्या विमापत्राचा क्रमांक 2884/00000008/ 0859/000/00 असून विमा संरक्षण कालावधी दि.31/8/2018 ते 30/8/2022 होता. मयत वैभव यांचा खुन झाल्यानंतर पोलीस ठाणे, कासारशिरसी, ता. निलंगा येथे गुन्हा क्र.126/2020 नोंदविण्यात आला. त्यानंतर मयत वैभव यांच्या विम्याची रक्कम मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी इंडस् इंड बँकेमार्फत चोलामंडलम इन्शुरन्स यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केला असता त्यावर निर्णय न घेता प्रलंबीत ठेवण्यात आला. इंडस् इंड बँक व चोलामंडलम इन्शुरन्स यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी रु.10,00,000/- विमा रक्कम; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- असे एकूण रु.10,55,000/- व्याजासह देण्याचा इंडस् इंड बँक व चोलामंडलम इन्शुरन्स यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(2) चोलामंडलम इन्शुरन्सने लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर त्यांनी अमान्य केला आहे. त्यांचे कथन आहे की, मयत वैभव यांचा खुन / घात झालेला नसून त्यांच्यावर लोखंडी सळईने, फायबरच्या दांड्याने व डोक्यामध्ये लाकडी दांडा मारल्यामुळे त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. दि.24/5/2020 रोजी आरोपी गणेश दत्ता माने व इतर आरोपींनी मयत वैभव यांच्या छातीत मारुन जखमी करुन त्यांचा खुन केला. पोलिसांनी आरोपी यांच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले असून भा.द.वि. कलम 302, 307 इ. अन्वये आरोपीविरुध्द निलंगा न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे. मयत वैभव यांचा खुन झालेला असून तो अपघाती मृत्यू म्हणता येणार नाही. विमापत्राच्या अटी व शर्तीमध्ये खुन अंतर्भाव होऊ शकत नाही. तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केलेला नाही. तक्रारकर्ता यांची तक्रार अपरिपक्व आहे आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(3) इंडस् इंड बँकेने लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द 'विना लेखी निवेदनपत्र' आदेश करण्यात आले.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 एकमेकांशी पुरक असल्यामुळे त्यांचे विवेचन एकत्र देण्यात येते. चोलामंडलम इन्शुरन्स यांनी अभिलेखावर विमापत्र क्र. 2884/00000008/ 0859/000/00 दाखल केले आहे. त्याचे अवलोकन केले असता मयत वैभव हे विमाधारक होते आणि चोलामंडलम इन्शुरन्सने मयत वैभव यांच्या अपघाती मृत्यूकरिता रु.10,00,000/- ची जोखीम स्वीकारल्याचे दिसून येते.
(6) अभिलेखावर दाखल पोलीस दोषारोप, प्रथम खबर अहवाल, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवचिकित्सा अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र इ. कागदपत्रांचे अवलोकन केले असता विदेवान तातेराव बरमदे यांनी मयत वैभव यांच्या छातीत चाकुने मारुन जखमी करुन खुन केला, असे आढळून येते. आरोपी यांच्याविरुध्द भारतीय दंड विधान, कलम 302 व अन्य कलमांद्वारे गुन्हा केल्याबाबत दोषरोप दाखल करण्यात आलेले आहे.
(7) प्रामुख्याने, मयत वैभव यांच्या विम्याची रक्कम मिळण्याकरिता इंडस् इंडस् बँकेमार्फत चोलामंडलम इन्शुरन्स यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केला असता त्यावर निर्णय न घेता प्रलंबीत ठेवण्यात आला, असा तक्रारकर्ता यांचे कथन आहे. उलटपक्षी, चोलामंडलम इन्शुरन्स यांचा प्रतिवाद आहे की, तक्रारकर्ता यांनी त्यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केलेला नाही आणि तक्रारकर्ता यांची तक्रार अपरिपक्व आहे. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता इंडस् इंड बँकेकडे कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांच्या विमा प्रस्तावास विमा दावा क्रमांक 5381260 देण्यात आला, असे तक्रारकर्ता यांचे निवेदनल आहे. वास्तविक पाहता, विमा दावा क्रमांक 5381260 च्या अनुषंगाने त्यांनी उचित कागदपत्रे सादर केलेली नाहीत. असे असले तरी, तक्रारकर्ता यांचा विमा दावा चोलामंडलम इन्शुरन्स यांना अप्राप्त आहे, असे काही क्षणाकरिता ग्राह्य धरले तरी प्रस्तुत ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची त्यांच्याकडे पूर्तता झालेली आहे. विमापत्राचे अवलोकन केले असता विमा दाव्याच्या अनुषंगाने प्रथम खबर अहवाल, शवचिकित्सा अहवाल, मरणोत्तर पंचनामा व मृत्यू प्रमाणपत्र हे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. निर्विवादपणे, प्रथम खबर अहवाल, शवचिकित्सा अहवाल, मरणोत्तर पंचनामा व मृत्यू प्रमाणपत्र हे कागदपत्रे प्रस्तुत ग्राहक तक्रारीसोबत दाखल करण्यात आलेले असून जे चोलामंडलम इन्शुरन्स यांना प्राप्त झालेले आहेत.
(8) विमा कंपनीचा पुढे बचाव असा की, मयत वैभव यांचा खुन झालेला असून तो अपघाती मृत्यू म्हणता येणार नाही आणि विमापत्राच्या अटी व शर्तीमध्ये खुन अंतर्भाव होऊ शकत नाही. विमापत्रामध्ये "अपघात" शब्दाची संज्ञा नमूद आहे. त्यानुसार Accident means sudden, unforeseen and involuntary event caused by external, visible and violent means. असे नमूद आहे. म्हणजेच "अपघात" ही बाह्य, दृश्यमान व हिंसक मार्गामुळे घडणारी अचानक, अनपेक्षीत व अनैच्छिक घटना होय. तक्रारकर्ता यांनी मा. राष्ट्रीय आयोगाच्या "रॉयल सुंदरम अलायन्स /विरुध्द/ पवन बलराम मुलचंदानी", आदेश दि. 25/9/2018 आदेशाचा संदर्भ घेतला. वास्तविक पाहता, तो निर्णय कोणत्या प्रकरणामध्ये दिला, हे स्पष्ट होत नाही. न्यायाच्या दृष्टीने आम्ही कन्फोनेट संकेतस्थळाद्वारे त्या प्रकरणाचे अवलोकन केले असता "रॉयल सुंदरम अलायन्स इन्शुरन्स कं.लि. /विरुध्द/ पवन बलराम मुलचंदानी", प्रथम अपिल क्र. 1357/2016, आदेश दि.25 सप्टेंबर, 2018 असा न्यायनिर्णय दिसून येतो. त्या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन "खुन" हा "अपघात" होतो, असे तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचे निवेदन आहे. त्या न्यायनिर्णयातील तत्व विचारात घेतले.
(9) उक्त विवेचनाअंती मयत वैभव यांचा खुन झालेला असून पॉलिसीमध्ये नमूद "अपघात" संज्ञेनुसार वैभव यांचा झालेला खुन हा अपघात ठरतो. विमापत्रानुसार इंडस् इंड बँक यांच्या नांवे नामनिर्देशन केलेले आहे. परंतु वित्तसंस्था या नात्याने इंडस् इंड बँकेने मयत वैभव यांच्या विमापत्रासंबंधी भुमिका स्पष्ट केली नाही. अशा स्थितीमध्ये विमापत्राच्या अनुषंगाने असणारे विमा लाभ मिळण्याकरिता तक्रारकर्ता पात्र ठरतात. चोलामंडलम इन्शुरन्स यांनी तक्रारकर्ता यांना मयत वैभव यांच्या विम्याची रक्कम न देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे आणि तक्रारकर्ता विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(10) तक्रारकर्ता यांनी मयत वैभव यांच्या मृत्यू तारखेपासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने रकमेची मागणी केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन ग्राहक तक्रार जिल्हा आयोगामध्ये दाखल केल्याच्या तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विमा कंपनीस आदेश करणे न्यायोचित राहील, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(11) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना विमा रक्कम मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना विमा रक्कम न दिल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहोत.
(12) तक्रारकर्ता यांचा मुख्य वाद विमा रकमेसंबंधी आहे. त्या अनुषंगाने इंडस् इंड बँकेने तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही.
(13) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चोलामंडलम इन्शुरन्स यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना रु.10,00,000/- (रुपये दहा लक्ष फक्त) द्यावेत.
तसेच, उक्त रकमेवर दि.10/3/2021 पासून रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चोलामंडलम इन्शुरन्स यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 चोलामंडलम इन्शुरन्स यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-