जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 23/2019. तक्रार दाखल दिनांक : 04/02/2019. तक्रार निर्णय दिनांक : 29/04/2022.
कालावधी : 03 वर्षे 02 महिने 25 दिवस
समाधान पिता बळीराम गोरे, वय 28 वर्षे,
रा. बिरवली, ता. औसा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट ॲन्ड फायनान्स कं.लि.,
दुसरा मजला, ब्लॉक नं. 209, यश प्लाझा, शिवनेरी गेटसमोर,
कव्हा रोड, लातूर.
(2) व्यवस्थापक, टाटा ए आय जी लाईफ इन्शुरन्स कं.लि.,
दुसरा मजला, युनीट नं. बी-303, निर्मल हाईटस्,
नंदी स्टॉप, औसा रोड, लातूर.
(3) व्यवस्थापक, टाटा ए आय जी लाईफ इन्शुरन्स कं.लि.,
रजि. नं. 110, चौदावा मजला, टॉवर "ए", पेननसुला, बिझानेस
पार्क, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - 400 013. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- महेश ए. बामणकर
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- नागेश आर. माने / एस.जी. डोईजोडे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "फायनान्स कंपनी") यांच्याकडून रु.2,77,875/- कर्ज घेऊन दि.31/12/2012 रोजी अशोक लिलॅन्ड कंपनीची ए.एल. दोस्त पिक-अप जीप खरेदी केलेली आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक एम.एच. 24 / जे. 9349 आहे. फायनान्स कंपनीने सूचविल्यानुसार त्यांनी फायनान्स कंपनीमार्फत विरुध्द पक्ष क्र. 2 व 3 (यापुढे "विमा कंपनी") यांची टाटा एआयए लाईफ ग्रुप सिंगल प्रिमियम पर्सनल लोन रिड्युसिंग टर्म इन्शुरन्स प्रोटेक्शन प्लॅन पॉलिसी क्र. डीजीसीएल 000023 पॉलिसी घेतली. फायनान्स कंपनीच्या हमीनुसार कर्जाची करारान्वये परतफेड होईपर्यंत अपघाती दुर्घटना घडल्यास कर्जाची संपूर्ण रक्कम विमा कंपनीने विमाधारकास तथा त्याच्या वारसास देण्याची जोखीम स्वीकारलेली आहे. तक्रारकर्ता यांनी दि.31/12/2012 रोजी फायनान्स कंपनीकडे रु.3,499.99 विमा हप्ता भरणा केलेला आहे. पॉलिसी प्रमाणपत्र क्रमांक 1000041635 असून दि.31/12/2012 ते 30/12/2015 या तीन वर्षाचा कालावधीसाठी पॉलिसी वैधतेचा अंमल आहे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, दि.31/3/2014 रोजी तक्रारकर्ता हे गोपाळ दिलीप पवार यांच्या शेती मळ्यातील भाजीपाला वाहतूक करीत असताना मालट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये गोपाळ दिलीप पवार यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आणि तक्रारकर्ता गंभीर जखमी झाले. अपघातामध्ये तक्रारकर्ता यांना 70.73 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आले. तसेच अपघातामध्ये त्यांच्या वाहनाचे 100 टक्के नुकसान झाले. घटनेची नोंद पोलीस ठाणे, पाचोड, ता. पैठण, जि. औरंगाबाद येथे गुन्हा नोंद क्र. 54/2014 अन्वये करण्यात आली.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, पॉलिसीनुसार लाभाची रक्कम मिळण्याकरिता फायनान्स कंपनीकडे विमा दावा दाखल केला. फायनान्स कंपनीने तो विमा दावा विमा कंपनीकडे पाठविला, असे सांगितले. परंतु अद्यापपर्यंत फायनान्स कंपनी व विमा कंपनीकडे त्यांचा विमा दावा प्रलंबीत आहे. विमा कंपनीने तक्रारकर्ता किंवा फायनान्स कंपनी यांच्याकडे रकमेचा भरणा केला नाही आणि फायनान्स कंपनीने तक्रारकर्ता यांच्याविरुध्द दरखास्त दाखल केली. अशाप्रकारे विमा कंपनी व फायनान्स कंपनीने त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे. अंतिमत: टाटा एआयए लाईफ ग्रुप सिंगल प्रिमियम पर्सनल लोन रिड्युसिंग टर्म इन्शुरन्स प्रोटेक्शन प्लॅन पॉलिसी क्र. डीजीसीएल 000023 अंतर्गत रु.2,77,885.78 पैसे रकमेचा व्याजासह लाभ देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.7,000/- देण्याचा विमा कंपनी व फायनान्स कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) फायनान्स कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले असून ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. तसेच परिच्छेदनिहाय तक्रारीतील मजकूर अमान्य करुन त्याच्याविरुध्द तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(5) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले असून ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. फायनान्स कंपनीकडून कर्ज घेताना विमा कंपनीने फायनान्स कंपनीच्या हक्कामध्ये वादकथित विमा पॉलिसी दिलेली होती. पॉलिसीनुसार विमा कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम देय होती. तक्रारकर्ता हे जीवित आहेत. विमा दाव्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा ऊहापोह करुन तक्रारकर्ता यांची तक्रार खोटी व काल्पनिक असल्यामुळे खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वादमुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्ता यांनी फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जास विमा संरक्षण देण्याकरिता विमा कंपनीने फायनान्स कंपनीच्या हक्कामध्ये टाटा एआयए लाईफ ग्रुप सिंगल प्रिमियम पर्सनल लोन रिड्युसिंग टर्म इन्शुरन्स प्रोटेक्शन प्लॅन पॉलिसी क्र. डीजीसीएल 000023 विमापत्र निर्गमीत केले, ही बाब विवादीत नाही.
(8) प्रामुख्याने, अपघातामुळे तक्रारकर्ता यांना 70.73 टक्के कायमस्वरुपी अपंगत्व आले आणि विमा कंपनीने विमा पॉलिसीनुसार त्यांना लाभ दिला नाही, अशी त्यांची मुख्य तक्रार आहे. विमा कंपनीच्या प्रतिवादानुसार पॉलिसीनुसार विमा कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम देय असून तक्रारकर्ता हे जीवित आहेत आणि त्यांना विमा लाभ देय होऊ शकत नाहीत.
(9) उभयतांच्या वाद-प्रतिवादाच्या अनुषंगाने दखल घेतली असता पॉलिसीच्या तरतुदीनुसार केवळ विमाधारकाचा मृत्यू झाल्यास पॉलिसीनुसार लाभ देय असल्याचे निदर्शनास येते. प्रस्तुत प्रकरणामध्ये विमाधारक म्हणजे तक्रारकर्ता हे जीवित असल्यामुळे विमा पॉलिसीनुसार लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाहीत. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये विमा कंपनी किंवा फायनान्स कंपनी यांनी त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही आणि त्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे अनुतोषास पात्र ठरत नाहीत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे नकारार्थी उत्तर देण्यात येऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/27522)