जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 31/2021. तक्रार दाखल दिनांक : 01/02/2021. तक्रार निर्णय दिनांक : 12/04/2022.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 12 दिवस
(1) सौ. उषाबाई भ्र. गुणवंत रामतिर्थे, वय 50 वर्षे,
व्यवसाय : घरकाम व शेती.
(2) गुणवंत पि. माणिक रामतिर्थे, वय 58 वर्षे, व्यवसाय : शेती,
दोघे रा. भुतमुगळी, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ते
विरुध्द
(1) विभागीय व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., डी.ओ.-17,
बेलापूर डिव्हीजन, विंध्या कमर्शिअल कॉम्प्लेक्स, पाचवा मजला,
प्लॉट नं.1, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400 614.
(2) शाखा व्यवस्थापक, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.,
बस स्टॅन्डसमोर, मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(3) शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, उस्तुरी, ता. निलंगा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ते यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- सुरेश जी. डोईजोडे
विरुध्द पक्ष क्र.3 अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ते यांच्या तक्रारीचा आशय आहे की, त्यांचा मुलगा विष्णू गुणवंत रामतिर्थे (यापुढे "मयत विष्णू") यांचे विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "बँक") यांच्याकडे बचत खाते क्र. 62346839532 होते. बँकेने विष्णू यांना एस.बी.आय. रुपे डेबीट कार्ड क्र.6079 0100 1303 4535 निर्गमीत केलेले होते. डेबीट कार्ड वैधतेच्या कालावधीमध्ये कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास विरुध्द पक्ष क्र.1 व 2 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याद्वारे कार्डधारकास रु.20,00,000/- चे विमा संरक्षण दिलेले आहे. विमा कंपनीच्या विमा पॉलिसीचा क्रमांक 240700421810000101 आहे आणि मयत विष्णू यांच्या डेबीट कार्डच्या अनुषंगाने तक्रारकर्ते हे रु.4,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र आहेत.
(2) तक्रारकर्ते यांचे पुढे कथन आहे की, दि.1/12/2019 रोजी मयत विष्णू हे दुचाकीवरुन जात असताना बसने धडक दिल्यामुळे अपघात झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारकर्ते यांनी दि.9/1/2020 रोजी बँकेकडे कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर केला. परंतु त्यांना विमा रक्कम देण्यात आलेली नाही. प्रस्तुत ग्राहक तक्रारीद्वारे रु.4,00,000/- विमा रक्कम अपघात तारखेपासून द.सा.द.शे.15 टक्के व्याज दराने देण्याचा; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- देण्याचा विमा कंपनी व बँकेस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केलेली आहे.
(3) विमा कंपनीने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले असून ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. विमा कंपनीचे कथन आहे की, तक्रारकर्ते यांचा विमा प्रस्ताव त्यांच्याकडे प्राप्त झालेला नाही. त्यांनी निर्गमीत केलेल्या विमापत्रामध्ये एस.बी.आय. गोल्ड, प्लॅटिनीयम व सिग्नेचर प्रकारच्या व्हिसा व मास्टर कार्ड हे विमा संरक्षीत आहेत. एस.बी.आय. रुपे एटीएम डेबीट कार्ड हे विमापत्राद्वारे विमा संरक्षीत नसल्यामुळे विमा रक्कम देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येत नाही. विमा कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(4) जिल्हा आयोगाद्वारे बँकेस सूचनापत्राची बजावणी होऊनही ते उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचे आदेश करण्यात आले.
(5) तक्रारकर्ते यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ते अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(6) मुद्दा क्र. 1 ते 3 :- अभिलेखावर दाखल पासबूकचे अवलोकन केले असता मयत विष्णू यांचे बँकेमध्ये बचत खाते क्रमांक 62346839532 असल्याचे निदर्शनास येते. उभयतांचा वाद-प्रतिवाद व कागदपत्रांचे अवलोकन केले असता बँकेतर्फे त्यांच्या डेबीट कार्डधारकांना विमा कंपनीकडे अपघाती विमा संरक्षण दिल्याचे निदर्शनास येते.
(7) बँकेने मयत विष्णू यांना एस.बी.आय. रुपे डेबीट कार्ड क्र.6079 0100 1303 4535 निर्गमीत केल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरुन निदर्शनास येते. डेबीट कार्ड वैधता कालावधीमध्ये मयत विष्णू यांचा वाहन अपघातामध्ये मृत्यू झाला आणि विमा रक्कम मिळविण्यासाठी विमा दावा सादर केला असता विमा रक्कम अदा केलेली नाही, असा तक्रारकर्ते यांचा मुख्य विवाद आहे. उलटपक्षी, विमा कंपनीचा प्रतिवाद आहे की, तक्रारकर्ते यांचा विमा प्रस्ताव त्यांच्याकडे प्राप्त झालेला नाही आणि त्यांनी निर्गमीत केलेल्या विमापत्रामध्ये एस.बी.आय. गोल्ड, प्लॅटिनीयम व सिग्नेचर प्रकारच्या व्हिसा व मास्टर कार्ड हे विमा संरक्षीत असून एस.बी.आय. रुपे एटीएम डेबीट कार्ड हे विमापत्राद्वारे विमा संरक्षीत नसल्यामुळे विमा रक्कम देण्याची जबाबदारी विमा कंपनीवर येत नाही.
(8) तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये "परिशिष्ट-अ" मध्ये पॉलिसी क्रमांक 240700421810000101 नमूद असून त्यामध्ये SBI Gold/Yuva/Pride/Platinum/ Premium/Signature Debit Card (Visa/Master Card) असा उल्लेख आढळतो. तसेच विमा कंपनीने दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये विमापत्र अनुसूचीनुसार विमापत्र क्रमांक 240700421910000081 निदर्शनास येत असून Coverage Description मध्ये Death cover only to International Debit Card holders (Gold Variant, Platinum Variant & Signature/World Variant) incl. sub variants of SBI असे नमूद आहे.
(9) जिल्हा आयोगाद्वारे पाठविलेल्या सूचनापत्राची बँकेस बजावणी झालेली आहे. परंतु बँक जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिली नाही आणि उचित संधी प्राप्त होऊनही लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे खंडण करण्यासाठी लेखी निवेदनपत्र व पुराव्याची कागदपत्रे सादर करण्याकरिता बँकेस उचित संधी होती. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांना व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस आव्हानात्मक निवेदन व विरोधी पुरावा उपलब्ध नाही.
(10) तक्रारकर्ते यांनी ज्या विमा पॉलिसी क्र.240700421810000101 संबंधी कागदपत्रे दाखल केलेली आहेत, त्यासंबंधीचे विमापत्र अभिलेखावर दाखल नाही. बँकेने त्यांच्या एटीएम खातेधारकांचा अपघाती विमा उतरविला असल्यामुळे त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे बँकेकडेच उपलब्ध असणार आहेत. परंतु बँकेने अभिलेखावर लेखी निवेदनपत्र किंवा उचित कागदपत्रे सादर केलेली नाहीत. मयत विष्णू धारण करीत असलेल्या रुपे कार्डकरिता बँकेने विमा कंपनीद्वारे विमा संरक्षण दिले किंवा कसे, याचे स्पष्टीकरण बँकेने सादर करावयास पाहिजे होते. परंतु बँकेने अपघाती मृत्यू पावलेल्या ग्राहकाप्रती अनास्था दर्शविलेली आहे.
(11) काहीही असले तरी प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांच्या अवलोकनाअंती मयत विष्णू यांच्या एस.बी.आय. रुपे डेबीट कार्ड क्र.6079 0100 1303 4535 करिता विमा कंपनीकडे अपघाती विमा संरक्षण असल्याबाबत उचित व पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. त्या अनुषंगाने मयत विष्णू हे विमा कंपनीकडून विमा सेवा घेत असल्याचे सिध्द होऊ शकत नाही. तक्रारकर्ते हे अनुतोषास पात्र नसल्यामुळे मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ते यांची ग्राहक नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-