जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 78/2021. तक्रार दाखल दिनांक : 10/03/2021. तक्रार निर्णय दिनांक : 14/12/2022.
कालावधी : 01 वर्षे 09 महिने 04 दिवस
बाळासाहेब पिता रावळू जाधव, वय 40 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. पानगाव, ता. रेणापूर, जि. लातूर, ह.मु. दिपज्योती नगर, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
विभागीय व्यवस्थापक, टाटा ए.आय.जी. जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
दुसरा मजला, "सी" विंग, कानडी टॉवर, जालना रोड,
औरंगाबाद, ता. जि. औरंगाबाद. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- पी.एन. जोशी
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सतिश जी. दिवाण
आदेश
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांनी खरेदी केलेल्या रॉयल इनफिल्ड कंपनीच्या बुलेट दुचाकी क्र. एम.एच. 24 ए.आर. 5801 साठी विरुध्द पक्ष (यापुढे "विमा कंपनी") यांनी विमापत्र क्र. 0146272277 अन्वये दि.28/4/2017 ते 27/4/2020 कालावधीकरिता विमा संरक्षण दिलेले होते. दि.29/8/2019 रोजी सकाळी 7.00 च्या सुमारास क्रीडा संकूल, लातूर येथे बाहेर बुलेट दुचाकी उभी करुन तक्रारकर्ता फिरण्यासाठी गेले आणि सकाळी परत 8.00 वाजता परत आले असता उभ्या केलेल्या ठिकाणी बुलेट आढळली नाही. सभोवती व शहर परिसरामध्ये शोध घेऊनही बुलेटचा शोध लागला नाही. त्यामुळे त्याच दिवशी 11.30 वाजता पोलीस ठाण्यामधील स्टेशन डायरीमध्ये फिर्याद नोंदविली. त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून दि.4/9/2019 रोजी प्रथम खबर अहवाल नोंदविण्यात आला. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे दावा सादर केला. परंतु पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यास 6 दिवसाचा विलंब झाल्याचे कारण देऊन विमा कंपनीने विमा दावा देय नसल्याचे दि.15/12/2020 रोजीच्या पत्राद्वारे कळविले. तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठवले असता विमा कंपनीने दखल घेतली नाही. उक्त कथनाच्या अनुषंगाने विमा रक्कम रु.95,553/- देण्याचा; शारीरिक, मानसिक त्रास व व्यवसायिक नुकसानीपोटी रु.50,000/- देण्याचा; तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा विमा कंपनीस आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र सादर केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील कथने अमान्य केले आहेत. तक्रारकर्ता यांच्या बुलेट दुचाकी क्र. एम.एच. 24 ए.आर. 5801 करिता दि.28/4/2017 ते 27/4/2020 कालावधीकरिता विमा संरक्षण दिल्याचे विमा कंपनीने मान्य केले. ते कथन करतात की, विमा दावा प्राप्त झाल्यानंतर संबंधीत प्रकरणाच्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी ॲड. एस.एम. गुरव यांची नियुक्ती केली. प्राप्त कागदपत्रांची पाहणी केली असता तक्रारकर्ता यांची बुलेट दुचाकी दि.29/8/2019 रोजी चोरीस गेलेली असताना शिवाजी नगर, पोलीस ठाणे, लातूर येथे दि.4/9/2019 रोजी तक्रार दाखल केली आणि त्या दिवशी गुन्हा क्र. 343/2019 नोंदणी झाल्याचे आढळले. तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर ज्या गोपनीय जावक नोंदवहीची प्रत दाखल केली, त्यासंबंधी प्रत मिळण्याकरिता ॲड. एस.एम. गुरव यांनी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत मागणी केली असता 'पोलीस स्टेशनचे अभिलेख पाहता अर्जदार यांनी मागणी केलेली माहिती पोलीस स्टेशन अभिलेखावर उपलब्ध नाही', असे कळविण्यात आले. विमा कंपनीचे पुढे कथन असे की, बुलेट दुचाकीच्या चोरीनंतर तक्रार करण्यासाठी 6 दिवसाचा विलंब झाल्यामुळे विमापत्राच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाले आणि त्या कारणास्तव विमा दावा नामंजूर करुन दि.15/12/2020 रोजीच्या पत्रान्वये तक्रारकर्ता यांना कळविले आहे. त्यामुळे त्यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती विमा कंपनीने केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विमा कंपनीचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(4) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 परस्परपुरक असल्यामुळे त्यांचे एकत्र विवेचन करण्यात येते. तक्रारकर्ता यांच्या रॉयल इनफिल्ड बुलेट दुचाकी क्र. एम.एच. 24 ए.आर. 5801 साठी विमा कंपनीने विमापत्र क्र. 0146272277 अन्वये दि.28/4/2017 ते 27/4/2020 कालावधीकरिता विमा संरक्षण दिले, ही बाब विवादीत नाही. दि.29/8/2019 रोजी तक्रारकर्ता यांच्या विमा संरक्षीत बुलेट दुचाकीची चोरी झाली, याबद्दल उभयतांमध्ये विवाद नाही. तक्रारकर्ता यांनी विमा कंपनीकडे विमा दावा सादर केला, हे विवादीत नाही. विमा कंपनीने तक्रारकर्ता यांच्या विमा दाव्याची रक्कम देण्याकरिता असमर्थता दर्शविली, हे विवादीत नाही.
(5) वाद-तथ्यानुसार पोलीस ठाण्याकडे बुलेट दुचाकच्या चोरीची तक्रार करण्यासाठी तक्रारकर्ता यांना विलंब झाला काय ? हा प्रश्न निर्माण होतो. उभय पक्षांकरिता विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला. तक्रारकर्ता यांचे विधिज्ञांनी नमूद केले की, बुलेट दुचाकीच्या चोरीची सूचना पोलीस ठाण्याकडे देण्यास त्यांना विलंब झालेला नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी नोंदवहीची सत्यप्रत अभिलेखावर दाखल केली. उलटपक्षी, विमा कंपनीच्या विधिज्ञांचे निवेदन असे की, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांसंबंधी पोलीस ठाण्यामध्ये अभिलेख उपलब्ध नाही आणि चोरीची सूचना देण्यास विलंब होऊन विमापत्राच्या अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे योग्य कारणास्तव विमा दावा नामंजूर केला.
(6) निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांच्या बुलेट दुचाकीसाठी विमा कंपनीकडे विमा संरक्षण दिलेले आहे. बुलेट दुचाकी चोरीस गेल्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी गोपनीय जावक नोंदवहीची प्रत दाखल केली, ही मान्यस्थिती आहे. तसेच तक्रारकर्ता यांनी अभिलेखावर Certificate Cum Policy Schedule दाखल केले आहे. तक्रारकर्ता यांनी पोलीस ठाणे, शिवाजी नगर, लातूर यांच्या गोपनीय जावक रजिस्टरची सत्यप्रत सादर केली असून त्यामध्ये दि.29/8/2019 तारीख व 11.30 वेळ नमूद आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे मजकूर नमूद दिसतो.
"यावेळी बाळासाहेब रावळू जाधव, रा. पानगाव, ता. रेणापूर हे पो.स्टे. येऊन कळविले की, त्यांची गाडी MH 24 AR 5801 ही बुलेट क्रीडा संकूल येथून दि.29/8/2019 रोजी 07.00 ते 8.00 चे दरम्यान हरवली आहे. असे कळविल्यावरुन नोंद. मो. नं. 9767686939 हा आहे. कागदपत्रे घेऊन येताच तक्रार देत असलेबाबत कळविले."
(7) विमा कंपनीचा बचाव असा की, तक्रारकर्ता यांनी दाखल केलेला गोपनीय जावक नोंदवहीचा उतारा अयोग्य असून त्याबाबतची नोंद पोलीस स्टेशनमध्ये आढळून आलेली नाही. उभय पक्षांच्या वाद-प्रतिवादाची दखल घेतली असता प्रकर्षाने नमूद करणे भाग पडते की, विमा कंपनीतर्फे जे बचाव घेण्यात आले, त्यासंबंधी उचित व आवश्यक पुरावा नाही. प्रामुख्याने, कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी नियुक्त केलेले ॲड. एस.एम. गुरव यांचा अहवाल व त्यांनी संबंधीत यंत्रणेकडून प्राप्त केलेली कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत. शिवाय, विमा कंपनी ज्या अटी व शर्तीचा लाभ घेऊन विमा दायित्व अमान्य करीत आहे, त्यासंबंधी उचित पुरावा नाही. आमच्या मते, तक्रारकर्ता यांच्याकडून विमापत्राच्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाले, हे पुराव्याद्वारे सिध्द होत नाही. उलटपक्षी, तक्रारकर्ता यांनी गोपनीय जावक नोंदवही उता-याच्या दोन साक्षांकीत सत्यप्रती सादर केल्या आहेत. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले उतारे कसे अयोग्य ठरतात, हे विमा कंपनीने सिध्द केलेले नाही. तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या गोपनीय जावक नोंदवहीचा उता-याच्या सत्यप्रती अयोग्य असल्याचा बचाव असताना व त्याचे खंडन केलेले असताना त्या कागदपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी तक्रारकर्ता यांचा उलटतपास घेण्याची विमा कंपनीस संधी होती. अभिलेखावर दाखल कागदोपत्री पुरावे पाहता तक्रारकर्ता यांनी बुलेट दुचाकीची चोरी झाल्यानंतर 2.30 तासामध्ये पोलीस ठाण्यामध्ये सूचना दिलेली आहे, हे सिध्द होते.
(8) विमा कंपनीतर्फे दि.3/1/2022 रोजी पुरसीस दाखल केलेली आहे. त्यामध्ये लेखी निवेदनपत्रासह कागदपत्रे दाखल केले असून ते पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावेत, असे त्यांनी नमूद केले. परंतु विमा कंपनीतर्फे पुराव्यासाठी कागदपत्रे दाखल केलेले दिसून येत नाहीत. त्यानंतर विमा कंपनीस पुरावा दाखल करण्यासाठी उचित संधी देण्यात आल्याचे दिसून येते.
(9) उक्त विवेचनाअंती तक्रारकर्ता हे विमा रक्कम मिळण्यास अपात्र आहेत, हे सिध्द होऊ शकलेले नाही. विमा कंपनीने तक्रारकर्ता यांचा विमा दावा अत्यंत तांत्रिक कारणास्तव नादेय ठरवून सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते. त्यामुळे तक्रारकर्ता हे विमा संरक्षीत बुलेट दुचाकीचे विमा संरक्षीत मुल्य रु.95,553/- मिळण्याकरिता पात्र ठरतात.
(10) तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासासह व्यवसायिक नुकसानीकरिता रु.50,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- रक्कम मिळावी, अशी विनंती केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना विमा रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच त्यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. शिवाय, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत जिल्हा आयोग येत आहे.
(11) व्यवसायिक नुकसान भरपाई मंजूर करण्याची तक्रारकर्ता यांची विनंती कायदेशीरदृष्टया समर्थनिय नाही.
(12) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना रु.95,553/- विमा रक्कम द्यावी.
ग्राहक तक्रार क्र. 78/2021..
(3) विरुध्द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-