जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 64/2021. तक्रार दाखल दिनांक : 25/02/2021. तक्रार निर्णय दिनांक : 23/05/2022.
कालावधी : 01 वर्षे 02 महिने 28 दिवस
एजाज सईदमिया सय्यद, वय 50 वर्षे,
व्यवसाय : व्यापार, रा. उस्मानपुरा, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) राम चिगुरे, सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण
कंपनी मर्यादीत, एम.आय.डी.सी., किर्ती ऑईल मीलच्या जवळ,
लातूर, ता. जि. लातूर.
(2) जनार्धन काशिनाथ कसपटे, अति. उप-कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
शहर उत्तर, जुना पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर.
(3) सामसे साहेब, कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत,
विभागीय कार्यालय, जुना पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एच.बी. पठाण यांनी वकीलपत्र काढून घेतले.
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- अमोल एम. निंबुर्गे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपामध्ये अशी आहे की, निवासी वापरासाठी त्यांनी विरुध्द पक्ष विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत जोडणी घेतलेली असून त्यांच ग्राहक क्रमांक 610557591225 आहे. विरुध्द पक्ष यांनी त्यांना जानेवारी 2021 चे थकबाकीसह रु.1,51,730/- रकमेचे चूक देयक दिले. मार्च 2020 मध्ये तक्रारकर्ता यांचे विद्युत मीटर जळाले आणि महावितरण कंपनीने त्या ठिकाणी नवीन मीटर बसविले. त्यानंतर मार्च 2020 ते नोव्हेंबर 2020 पर्यंत प्रतिमहा 755 युनीट वीज वापर दर्शविला आहे. सन 2019 मध्ये त्यांचा 100 ते 175 युनीट वीज वापर होता. परंतु मीटर जळाल्याचा गैरलाभ घेत महावितरण कंपनीने त्यांना रु.1,51,730/- चे देयक दिले आणि त्याचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्यांना सूचनापत्र पाठविले असता वीज आकार देयकाच्या दुरुस्तीबाबत दखल घेतलेली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने जानेवारी 2021 चे रु.1,51,730/- चे देयक रद्द करुन सन 2019 च्या वीज वापराप्रमाणे देयक देण्याचा व मानसिक त्रासाकरिता रु.1,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी तक्रारकर्ता यांनी विनंती केली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले असून तक्रारकर्ता यांची कथने त्यांनी अमान्य केली आहेत. त्यांचे कथन आहे की, मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार त्यांनी सर्वत्र अवलंबलेल्या कार्यवाहीनुसार तक्रारकर्ता यांचे जुने विद्युत मीटर बदलून एप्रिल-मे 2019 मध्ये नवीन मीटर बसविले. त्यानंतर मीटर बदलणा-या कंत्राटदाराकडून नवीन मीटरची नोंद संगणक प्रणालीवर नोंद घेतली न गेल्यामुळे तक्रारकर्ता यांना त्या कालावधीकरिता सरासरी देयके आकारली गेली. त्यानंतर मीटरची तपासणी केली असता तक्रारकर्ता यांच्या वास्तविक वीज वापराची नोंद अधिक दिसून आली आणि त्याचे छायाचित्र काढण्यात आले. त्यानंतर तक्रारकर्ता यांना देयक दिलेले आहे. देयकाचा भरणा करण्याचे टाळण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 व 3 यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदनपत्र स्वीकारत असल्याबाबत पुरसीस दाखल केली.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच विरुध्द पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वादमुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार सन 2019 मध्ये त्यांचा 100 ते 175 युनीट वीज वापर होता. परंतु मीटर जळाल्याचा गैरलाभ घेत महावितरण कंपनीने त्यांना जानेवारी 2021 चे थकबाकीसह रु.1,51,730/- रकमेचे चूक देयक दिलेले आहे. तसेच मार्च 2020 मध्ये विद्युत मीटर जळाल्यानंतर महावितरण कंपनीने त्या ठिकाणी नवीन मीटर बसविले, असे तक्रारकर्ता यांचे कथन आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांच्या निवदेनानुसार मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार सर्वत्र मीटर बदलण्यासंबंधी अवलंबलेल्या कार्यवाहीनुसार तक्रारकर्ता यांचे जुने विद्युत मीटर बदलून एप्रिल-मे 2019 मध्ये नवीन मीटर बसविले आहे.
(6) तक्रारकर्ता यांच्या विद्युत वापराबाबत ग्राहक वैयक्तिक उतारा दाखल आहे. त्यामध्ये एप्रिल 2019 ते एप्रिल 2020 पर्यंत देयक आकारणीचा तपशील आढळून येतो. त्याचे अवलोकन केले असता अनेकवेळा तक्रारकर्ता यांच्या मीटरचे वाचन न होता सरासरी देयक आकारणी केल्याचे निदर्शनास येते आणि ही बाब विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी आकारलेल्या देयकांचा सप्टेंबर 2019 अखेरपर्यंत तक्रारकर्ता यांनी भरणा केलेला असून त्यानंतर विद्युत देयकांचा भरणा केलेला नाही, असे दिसते.
(7) विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद आहे की, मीटर बदलणा-या कंत्राटदाराकडून नवीन मीटरची नोंद संगणक प्रणालीवर नोंद घेतली न गेल्यामुळे तक्रारकर्ता यांना त्या कालावधीकरिता सरासरी देयके आकारली गेली आणि मीटरची तपासणीअंती तक्रारकर्ता यांच्या वास्तविक वीज वापराची नोंद अधिक दिसून आलेली असून त्याचे छायाचित्र काढण्यात आले.
(8) विरुध्द पक्ष यांनी 9070 रिडींग दर्शविणा-या व मीटर क्रमांक 42073675 नमूद असणा-या मीटरचे छायाप्रत दाखल केलेले आहे. विरुध्द पक्ष यांनी मीटरचे वाचन न करता देयके आकारणी केले असले तरी त्या कालावधीमध्ये तक्रारकर्ता यांच्या नियमीत विद्युत वापरानुसार विद्युत मीटरमध्ये युनीटद्वारे रिडींग सुरु होती. अशा स्थितीमध्ये मीटरचे वाचन करुन मागील कालावधीच्या वापराप्रमाणे नोंदलेल्या युनीटचे देयक आकारणी केल्यास ते चूक ठरणार नाही आणि त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांच्या सेवेमध्ये त्रुटी ठरु शकत नाही.
(9) अंतरीम अर्जानुसार तक्रारकर्ता यांनी रु.75,000/- भरणा करण्याच्या अटीवर अंतरीम आदेश करण्यात आलेले होते. तक्रारकर्ता यांनी त्याप्रमाणे अनुपालन केल्यासंबंधी पुरावा सादर केलेला नाही. तसेच विरुध्द पक्ष यांच्या विधिज्ञांनी निवेदन केले की, तक्रारकर्ता यांनी अंतरीम आदेशाप्रमाणे रकमेचा भरणा केलेला नाही.
(10) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-