जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 12/2021. तक्रार दाखल दिनांक : 06/01/2021. तक्रार निर्णय दिनांक : 04/05/2022.
कालावधी : 01 वर्षे 03 महिने 29 दिवस
परमेश्वर मारुती चामरगे / चांभारगे, वय 60 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. भादा, ता. औसा, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) यशोदा हॅब्रीड सिडस् प्रा.लि.,
246, लक्ष्मी टॉकीजजवळ, हिंगणघाट, जि. वर्धा - 442 301.
(2) मुरारी कृषि सेवा केंद्र,
एस.टी. स्टॅन्डजवळ, औसा, ता. औसा, जि. लातूर.
(3) तालुका कृषि अधिकारी,
पंचायत समिती, औसा, ता. औसा, जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- प्रकाश गं. भुरे
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांचेकरिता विधिज्ञ :- अंगद बी. बिडवे
विरुध्द पक्ष क्र.3 स्वत:
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीमध्ये संक्षिप्त निवेदन असे आहे की, ते शेतकरी असून त्यांनी सौ. रजनी दिलीप सोरडगे यांच्याकडून मौजे भादा, ता. औसा, जि. लातूर येथील सर्व्हे नं. 136-अ, क्षेत्र 1 हे. 62 आर. शेतजमीन दि.25/3/2020 पासून कसण्यासाठी घेतलेली आहे. त्या क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी दि.15/6/2020 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.1 कंपनीचे "335 सोयाबीन यशोदा" बियाणे ज्याचा बॅच नं. YPK20-17158 पावती क्र. MG-1286 अन्वये प्रतिपिशवी रु.2,150/- प्रमाणे 3 पिशव्या रु.6,450/- मुल्य देवून खरेदी केल्या. पावतीवर बॅच नं. YPK20-17158 नमूद असताना विरुध्द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्ता यांच्या निरक्षरतेचा लाभ घेऊन बियाण्याचा बॅच नं. YAK20-17048 व Truthful Lable No. 076327, 0763269 व 0763032 दिले.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, त्यांनी शेतजमिनीची नांगरणी व पाळ्या देऊन मशागत केली आणि दि.15/6/2020 रोजी बियाण्याची पेरणी केली. परंतु बियाण्याची उगवण न झाल्यामुळे विरुध्द पक्ष क्र.2 यांना कळविले असता दखल न घेता नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.3 यांना कळविले असता त्यांनी पंचनामा केलेला नाही.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, प्रतिएकर 10 ते 12 क्विंटल याप्रमाणे 36 क्विंटल अपेक्षीत सोयाबीन उत्पादनाकरिता महाराष्ट्र शासनाचा हमी भाव रु.4,050/- याप्रमाणे रु.1,45,800/- उत्पन्नापासून वंचित रहावे लागले. बियाणे मुल्य, मशागत खर्च, सोयाबीन गुळी, नोटीस खर्च, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई याप्रमाणे एकूण रु.2,60,250/- नुकसान भरपाई देण्याकरिता विरुध्द पक्ष क्र.1 व 2 हे जबाबदार आहेत. विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता नुकसान भरपाई दिलेली नाही. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.2,60,250/- नुकसान भरपाई द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्याचा व रु.10,000/- तक्रार खर्च देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर करुन तक्रारीमध्ये नमूद मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे पुढे निवेदन आहे की, जमीन कसण्यासबंधी तक्रारकर्ता यांच्याकडे कायद्यानुसार नोंदणीकृत करारनामा असावयास पाहिजे. तसेच पावसाअभावी पेरणी न झाल्यास बियाणे कंपनीस जबाबदार धरले जाते. बियाणे पेरणीच्या दिवशी ओलावा असल्याचे सिध्द होणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता यांची तक्रार खोटी असल्यामुळे खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.3 यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यामध्ये त्यांनी तालुका तक्रार निवारण समितीची रचना व गठण यासंबंधी ऊहापोह केला आहे. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीनुसार तक्रार निवारण समितीकडून पंचनामा करण्यात आलेला आहे.
(6) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वादमुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दोषयुक्त बियाणे विक्री
केल्याचे व सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते ? नाही.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- सर्व मुद्दे एकमेकाशी संलग्न असल्यामुळे एकत्रित विचारात घेण्यात येत आहेत. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून वादकथित बियाणे खरेदी केल्याचे अभिलेखावर दाखल पावतीवरुन निदर्शनास येते. प्रामुख्याने, बियाण्याची पेरणी केली असता त्याची उगवण झाली नाही, असा तक्रारकर्ता यांचा मुख्य विवाद आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांची तक्रार अमान्य केलेली आहे आणि विरुध्द पक्ष क्र.3 यांच्या कथनानुसार त्यांच्या कार्यालयाद्वारे पिकाचा पंचनामा करण्यात आलेला आहे.
(8) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.2 यांच्याकडून दि.15/6/2020 रोजी वादकथित बियाणे खरेदी केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार दि.25/3/2020 पासून त्यांनी सौ. रजनी दिलीप सोरडगे यांच्याकडून मौजे भादा, ता. औसा, जि. लातूर येथील सर्व्हे नं. 136-अ, क्षेत्र 1 हे. 62 आर. शेतजमीन कसण्यासाठी घेतलेली होती आणि त्या क्षेत्रामध्ये वादकथित बियाणे पेरणी केले. अभिलेखावर दाखल करारपत्राचे अवलोकन केले असता दि.30/6/2020 रोजी मुद्रांक स्टॅम्प खरेदी केल्याचे निदर्शनास येते. परंतु बियाणे हे दि.15/6/2020 रोजी खरेदी केलेले आहे. म्हणजेच बियाणे खरेदी केल्याच्या तारखेनंतर करारापत्र तयार केल्याचे आढळून येते. तसेच करारपत्र ज्या दिवशी तयार केले, ती तारीख नमूद नाही. अशा स्थितीत ज्या दिवशी तक्रारकर्ता यांनी वादकथित बियाणे पेरणी केले, त्या दिवशी तक्रारकर्ता यांनी कथित शेतजमीन कसण्यासाठी घेतलेली होती, हे सिध्द होत नाही.
(9) मुख्य वादविषयाकडे जाता तक्रारकर्ता यांनी जो तालुका तक्रार निवारण समितीने केलेला क्षेत्रीय भेटीचा अहवाल व पंचनामा दाखल केला आहे, अहवालानुसार पाहणी दिनांक 14/7/2020 नमूद असून समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे नमूद आहे.
"उगवण न झालेले सोयाबीन मोडून परत पेरल्याने उगवणीबाबतचे निरीक्षणे नोंद करता आले नाहीत."
(10) तालुका तक्रार निवारण समितीच्या अहवाल व पंचनाम्यावर तक्रारकर्ता यांची साक्ष व स्वाक्षरी दिसून येते.
(11) अभिलेखावर दाखल पुरावे विचारात घेतले असता तक्रारकर्ता यांनी खरेदी केलेले वादकथित बियाणे दोषयुक्त होते, असे सिध्द होण्याकरिता पुरेसा व उचित पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे व त्या अनुषंगाने तक्रारकर्ता अनुतोषास पात्र असल्याचे सिध्द होत नाही. तक्रारकर्ता यांची तक्रार नामंजूर होण्यास पात्र आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(12) विरुध्द पक्ष क्र.3 हे शासकीय यंत्रणेचा भाग आहेत. त्यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही. अंतिमत: मुद्दा क्र. 1 व 2 यांचे उत्तर नकारार्थी देण्यात येऊन मुद्दा क्र.3 च्या अनुषंगाने खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार नामंजूर करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-