जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 54/2019. तक्रार दाखल दिनांक : 18/02/2019. तक्रार निर्णय दिनांक : 08/03/2022.
कालावधी : 03 वर्षे 00 महिने 18 दिवस
सौ. जयश्री संभाजीराव पाटील, वय 61 वर्षे, व्यवसाय : वकिली,
रा. जिल्हा न्यायालयाजवळ, टिळक नगर, मेन रोड, लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) मे. सुयोग डिजीटल तर्फे प्रोप्रा. / अधिकृत व्यक्ती,
सोनी एक्सक्लुजीव शोरुम, न्यू आदर्श कॉलनी,
औसा रोड, लातूर - 413 512.
(2) सोनी मोबाईल कम्युनिकेशन (इंडिया) प्रा.लि.,
002, तळमजला, मारवाह हाऊस, क्रिशनलाल मारवाह मार्ग,
अंधेरी (पूर्व), मुंबई - 400 072. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- मयुर डी. कोटलवार
विरुध्द पक्ष क्र.1 स्वत:
विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.ओ. जाधव
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी दि.11/11/2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून विरुध्द पक्ष क्र.2 कंपनीचा Sony Xperia-XA 1 Plus-G3416/ Black भ्रमणध्वनी संच रु.26,990/- मुल्य देऊन खरेदी केला. भ्रमणध्वनी संचाचा IMEI No. 359906080712511 असून पावती क्र. 822 आहे.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, खरेदीनंतर भ्रमणध्वनी संच 7-8 दिवस व्यवस्थित चालला. परंतु त्यानंतर आवाज खरखर येणे; कॉल आल्यानंतर स्क्रीनवर न दिसणे; भ्रमणध्वनी आपोआप सायलेंट होणे; बॅटरी चार्ज न होणे, भ्रमणध्वनी गरम होणे इ. त्रुटी आढळून आल्या. त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याशी संपर्क साधला असता सॉफ्टवेअर अद्ययावत करुन दिले. परंतु त्यामुळे तक्रारकर्ती यांचे फोन नंबर, फोटो, डॉक्युमेंट फाईल्स इ. नष्ट झाले.
(3) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, 15 दिवस भ्रमणध्वनी व्यवस्थित चालल्यानंतर पुन्हा त्याच त्रुटी उद्भवल्या. विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे लेखी तक्रार करुन भ्रमणध्वनी संच बदलून देण्याची विनंती केली असता त्यास नकार देऊन ग्राहक सुविधा केंद्राकडे पाठविण्यात आला. त्यावेळीही तक्रारकर्ती यांचा महत्वपूर्ण डाटा नष्ट झाला. त्यानंतर भ्रमणध्वनी संच 2-3 महिने व्यवस्थित चालल्यानंतर त्याच त्रुटी उद्भवल्या. तक्रारकर्ती यांच्या भ्रमणध्वनी संच पुन्हा सॉफ्टवेअर अद्ययावत करुन दिला; परंतु तो बदलून दिला नाही.
(4) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, त्यांनी विधिज्ञांमार्फत नोटीस पाठविली असता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी नोटीस स्वीकारली नाही आणि विरुध्द पक्ष क्र.2 यांनी भ्रमणध्वनी तपासणीसाठी अधिकृत ग्राहक सुविधा केंद्रामध्ये पाठविण्यास सांगितले. प्रयत्नाअंती तक्रारकर्ती यांनी दि.29/12/2018 रोजी पुणे येथील न्यू साई इलेक्ट्रॉनिक्स ह्या ग्राहक सुविधा केंद्रामध्ये भ्रमणध्वनी संच जमा केला असता त्याची केवळ बॅटरी बदलून दिली आणि वॉरंटी कालावधीमध्ये त्याकरिता रु.1,635/- वसूल केले. भ्रमणध्वनीच्या संपर्काअभावी त्यांचे व्यवसायिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय नुकसान झाले आणि त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने Sony Xperia-XA 1 Plus-G3416/Black, IMEI No. 359906080712511 भ्रमणध्वनी संच बदलून देण्याचा अथवा त्याचे मुल्य रु.26,990/- परत करण्याचा; मानसिक व आर्थिक त्रासाकरिता रु.50,000/- देण्याचा; तक्रार खर्च व इतर शुल्य रु.15,000/- देण्याचा व भ्रमणध्वनी संचाचा दुरुस्ती खर्च रु.1,635/- याप्रमाणे एकूण रु.66,635/- देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 हे जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले; परंतु त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द विनालेखी निवेदनपत्र आदेश करुन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
(6) विरुध्द पक्ष क्र.2 यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. ग्राहक तक्रारीतील निवेदने त्यांनी अमान्य केली आहेत. त्यांचे कथन आहे की, वस्तुकरिता अटी व शर्तीस अधीन राहून एक वर्षाची वॉरंटी दिलेली होती आणि त्याच्या कक्षेबाहेर उद्भवलेला दाव्याकरिता ते जबाबदार नाहीत. तक्रारकर्तीने दि.6/12/2017 रोजी ग्राहक सेवा केंद्राकडे भ्रमणध्वनीमध्ये खरखर आवाजासंबंधी तक्रार केली असता सॉफ्टवेअर अद्ययावत करुन योग्य कार्यस्थितीमध्ये तक्रारकर्ती यांना परत करण्यात आला. तसेच तक्रारकर्ती यांच्या नोटीसला त्यांनी उत्तर दिलेले आहे.
(7) विरुध्द पक्ष क्र.2 यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ती यांनी पुन्हा दि.28/12/2018 रोजी पुन्हा सेवा केंद्राकडे संपर्क साधला असता वॉरंटी संपल्यामुळे रु.1,635/- मुल्य स्वीकारुन बॅटरी बदलून दिली. भ्रमणध्वनी संचामध्ये वॉरंटी कालावधीमध्ये मुलभूत दोष आढळून आलेला नाही आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. अंतिमत: तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.
(8) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.2 यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना विक्री केलेला भ्रमणध्वनी
दोषयुक्त असल्याचे व विक्रीपश्चात तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या
सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते ? होय
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(9) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून पावती क्र.822 द्वारे दि.11/11/2017 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांचेद्वारे उत्पादीत वादकथित भ्रमणध्वनी संच रु.26,990/- मुल्य देऊन खरेदी केल्याचे खरेदी पावतीवरुन निदर्शनास येते. दि.6/12/2017 रोजी तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांना दिलेल्या तक्रारीमध्ये आवाज खरखर होणे, कॉलची रिंग न येणे इ. दोषाबाबत लिखीत तक्रार दिल्याचे निदर्शनास येते. त्या अर्जावर भ्रमणध्वनी स्वीकारुन दोषाचे निराकरण करण्यासाठी ग्राहक सेवा केंद्राकडे दिल्याची नोंद विरुध्द पक्ष क्र.2 यांनी नोंद केलेली दिसून येते. त्यानंतर पुन्हा दि.8/11/2018 रोजी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे भ्रमणध्वनी संच जमा करण्यात आला आणि त्यावेळी Problem : Dead अशी नोंद निदर्शनास येते. विरुध्द पक्ष क्र.2 यांच्या नोटीस उत्तरानंतर दि.29/12/2018 रोजी पुणे येथील न्यू साई इलेक्ट्रॉनिक्स ह्या ग्राहक सुविधा केंद्रामध्ये भ्रमणध्वनी संच जमा केला असता त्याची केवळ बॅटरी बदलून दिली आणि वॉरंटी कालावधीमध्ये त्याकरिता रु.1,635/- वसूल केले, असे तक्रारकर्ती यांचे कथन आहे. प्रामुख्याने ह्या बहुतांश बाबी विरुध्द पक्ष क्र.2 यांना मान्य आहेत. परंतु विरुध्द पक्ष क्र.2 यांचे बचावात्मक कथन आहे की, वॉरंटी संपल्यामुळे रु.1,635/- मुल्य स्वीकारुन बॅटरी बदलून दिलेली आहे. तसेच भ्रमणध्वनी संचामध्ये वॉरंटी कालावधीमध्ये मुलभूत दोष आढळून आलेला नाही आणि त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही.
(10) वादकथने, बचावात्मक कथने व पुरावे पाहता तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडून खरेदी केलेल्या भ्रमणध्वनी संचामध्ये सुरुवातीपासून सातत्यपूर्ण दोष होता आणि त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांना विरुध्द पक्ष क्र.1 यांच्याकडे व ग्राहक सेवा केंद्राकडे जावे लागल्याचे सिध्द होते. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी ज्या अटी व शर्तीचे छायांकीत पत्रक सादर केले आहे, त्यानुसार तक्रारकर्ती ह्या भ्रमणध्वनी बदलून मिळण्यास अपात्र आहेत, हे सिध्द होऊ शकत नाही. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी न्यू साई इलेक्ट्रॉनिक्स, पुणे येथील ग्राहक सेवा केंद्राचा तपशील दाखल केलेला आहे. वास्तविक तक्रारकर्ती यांनी वॉरंटी कालावधीमध्ये ज्यावेळी दुरुस्ती केली, त्याबाबत विरुध्द पक्ष क्र.2 यांनी उचित स्पष्टीकरण व पुरावा सादर केलेला नाही. आमच्या मते, ज्यावेळी एखादा दोष त्याचे निराकरण करुनही उद्भवत असेल किंवा त्या दोषाचे निराकरण केल्यानंतर दुसरा दोष उद्भवत असेल तर त्या वस्तुतील तो दोष उत्पादकीय दोष ठरतो. भ्रमणध्वनी संचाच्या वॉरंटी कालावधीमध्ये दोष नियमीत व कायम राहिलेला आहे आणि वॉरंटी कालावधीमध्ये त्या दोषाचे निराकरण झालेले नसल्यामुळे तक्रारकर्ती यांचा भ्रमणध्वनी खरेदी करण्याचा हेतू विफल झाल्याचे मान्य करावे लागते.
(11) तक्रारकर्ती यांचेद्वारे मा. दिल्ली राज्य आयोगाच्या "सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. /विरुध्द/ ए.एस. इंडस्ट्रीज", 3 (2007) सी.पी.जे. 319; सर्वोच्च न्यायालयाच्या "मोमना गौरी /विरुध्द/ रिजनल मॅनेजर", (2014) 13 एस.सी.सी. 307 व "शेबिका अत्तीरे /विरुध्द/ न्यू इंडिया अश्युरन्स कं.लि.", (2006) ए.सी.जे. 2547 या निवाड्यांचा संदर्भ सादर केला. वास्तविक प्रस्तुत निवाड्यांमध्ये नमूद तत्वे या प्रकरणातील वस्तुस्थिती व कायदेशीर प्रश्नांशी सुसंगत असल्याचे आढळून येते. त्यामुळे त्या निवाड्यांचा विचार करता येणार आहे.
(12) असे दिसून येते की, विरुध्द पक्ष क्र.1 यांना जिल्हा आयोगाच्या सूचनापत्राची बजावणी झालेली आहे. परंतु उचित संधी देऊनही त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केलेले नाही. तक्रारीमध्ये नमूद वादकथनांचे खंडण करण्यासाठी लेखी निवेदनपत्र व पुराव्याची कागदपत्रे सादर करण्याकरिता विरुध्द पक्ष यांना संधी होती. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 हे जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिले. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांना व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस आव्हानात्मक निवेदन व विरोधी पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे तक्रारीतील वादकथने व तक्रारीपृष्ठयर्थ दाखल केलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.1 यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित वाटते.
(13) वादकथित भ्रमणध्वनी संच खरेदी केल्यानंतर सुरुवातीपासून वॉरंटी कालावधीमध्ये दोष निर्माण झाला आणि त्यातील दोषाचे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडे किंवा त्यांच्या सेवा केंद्राद्वारे दोषाचे निराकरण झालेले नाही, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत. सातत्याने दुरुस्ती करुनही भ्रमणध्वनी संचातील दोष कायम राहिला असल्यामुळे तो उत्पादकीय दोष ठरतो. तसेच तक्रारकर्ती यांचा वादकथित भ्रमणध्वनी संच दुरुस्त न करुन विक्रीपश्चात विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. अंतिमत: वादकथित भ्रमणध्वनी नवीन बदलून मिळण्यास अथवा त्याचे मुल्य परत मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांचा वादकथित Sony Xperia-XA 1 Plus-G3416/Black, IMEI No. 359906080712511 भ्रमणध्वनी संच परत स्वीकारुन त्याच प्रतिकृतीचा नवीन भ्रमणध्वनी द्यावा.
अथवा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांचा वादकथित Sony Xperia-XA 1 Plus-G3416/Black, IMEI No. 359906080712511 भ्रमणध्वनी संच परत स्वीकारुन त्याचे मुल्य रु.26,990/- परत करावे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती यांना भ्रमणध्वनी संचाच्या दुरुस्तीकरिता स्वीकारलेले रु.1,635/- परत करावेत.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/2322)