जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 70/2020. तक्रार दाखल दिनांक : 16/03/2020. तक्रार निर्णय दिनांक : 24/01/2024.
कालावधी : 03 वर्षे 10 महिने 08 दिवस
डॉ. श्री. संजय शिवराम बेंबडे, वय 50 वर्षे, धंदा : वैद्यकीय व्यवसाय,
रा. रो.हा.क्र.6, नरेंद्र धाम, कातपूर रोड, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) मे. ऋषभ बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स,
प्रोप्रा. आशिष ललीतकुमार कामदार, वय 48 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. कामदार बिल्डींग, कामदार रोड, लातूर.
प्रोप्रा. शोएब वाहेद पटेल, वय 30 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. महेबूब नगर, अंबाजोगाई रोड, लातूर.
प्रोप्रा. नितीन रमेश भताने, वय 36 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. भताने ज्वेलर्स, सराफ लाईन, लातूर.
(2) राजाराम रावसाहेब गंभीरे, वय 55 वर्षे,
धंदा : शेती, रा. सिकंदरपूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती रेखा जाधव, सदस्य
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. महादेव पी. झुंजे
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. श्रीकांत दिगंबरराव टाकळीकर
विरुध्द पक्ष क्र.2 :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, विरुध्द पक्ष क्र.1 हे विकासक व विक्रेते असणा-या व विरुध्द पक्ष क्र.2 हे जमीन मालक असणा-या नरेंद्रधाम वसाहतीमध्ये त्यांनी रो-हाऊस क्र.6 खरेदी केले आणि त्याचे मुल्य रु.13,00,000/- अदा केले. त्यांचा खरेदीखत दस्त क्र. 5887/2014, दिनांक 18/10/2014 आहे. रो-हाऊसमध्ये वास्तव्यास आल्यानंतर खरेदीखत, माहितीपुस्तिका, घोषणापत्र व विकास करारनाम्याप्रमाणे सुविधा नसल्याचे व बांधकाम निकृष्ठ असल्याचे निदर्शनास आले. प्रामुख्याने, रो-हाऊसमध्ये नांवासह पत्रपेटी बसविलेली नव्हती आणि माहितीपत्रकानुसार कंपाऊंड वॉल नव्हते. नरेंद्रधाम वसाहतीमध्ये कार वॉशिंग सुविधा, सुरक्षा रक्षक केबीन, पथदिवे, निकृष्ठ बांधकामामुळे पडलेली सुरक्षा भिंत, बगीचा बैठकी व्यवस्था, 5 विंधन विहिरी व साहित्यासह त्यावर सबमर्सिबल पंप, 2 थ्रिफेज विद्युत मीटर, स्वतंत्र डी.पी., सुरुवातीचा देखरेख खर्च, रेन हार्वेस्टींग सुविधा, बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र व ताबा प्रमाणपत्र, सोसायटी नोंदणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र इ. उणिवा व सुविधांचा अभाव आढळून आला. त्यामुळे तक्रारकर्ता यांना रु.5,00,000/- खर्च झाला असून अद्याप खर्च होत आहे. त्या अनुषंगाने कायदेशीर नोटीस पाठविली असता विरुध्द पक्ष क्र.1 यांनी तथ्यहीन उत्तर दिले. विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन उक्त नमूद सुविधा उपलब्ध करुन देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.2,00,000/- व्याजासह देण्याचा; आर्थिक त्रासाकरिता रु.5,00,000/- व्याजासह देण्याचा व ग्राहक तक्रार खर्च रु.15,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. त्यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने अमान्य केले आहेत. रेरा कायद्यांतर्गत तक्रारीचे निराकरण करण्याची तरतूद असल्यामुळे जिल्हा आयोगास प्रकरण निर्णयीत करण्याचा अधिकार नाही. त्यांचे कथन असे की, त्यांनी तक्रारकर्ता यांच्या हक्कामध्ये रो-हाऊस क्र.6 चे खरेदीखत करुन दिले. तक्रारकर्ता यांनी नमूद केलेल्या कार वॉशिंग सुविधा, 5 सबमर्सिबल पंप, रेन हार्वेस्टींग सुविधा, स्वतंत्र डी.पी. इ. बाबी अवास्तव आहेत. वस्तुत:, मान्य केल्याप्रमाणे त्यांनी रो-हाऊसचे बांधकाम करुन दिलेले आहे आणि गृहप्रकल्पामध्ये सामाईक सुख-सुविधा पुरविलेल्या आहेत. त्यासंबंधी विरुध्द पक्ष यांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला आहे. तसेच रो-हाऊस क्र.6 चा ताबा घेतला असताना तक्रारकर्ता यांनी बांधकाम व सुख-सुविधेबद्दल समाधानी असल्याचे व तक्रार नसल्याचे मान्य केले होते. खरेदीखत घेऊन व ताबा घेऊन 6 वर्षाचा अवधी झाल्यानंतर तक्रारकर्ता यांचा कायदेशीर अधिकार संपुष्टात आलेला आहे आणि तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे. अंतिमत: ग्राहक तक्रार रद्द करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.1 यांनी केलेली आहे.
(3) विरुध्द पक्ष क्र.2 यांना जिल्हा आयोगाचे सूचनापत्र प्राप्त झाले; परंतु ते जिल्हा आयोगापुढे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(4) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच युक्तिवादाची दखल घेतल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे काय ? होय.
(2) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(5) मुद्दा क्र. 1 :- सर्वप्रथम विरुध्द पक्ष यांची हरकत अशी की, तक्रारकर्ता यांनी खरेदीखत घेऊन व ताबा घेऊन 6 वर्षाचा अवधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा कायदेशीर अधिकार संपुष्टात आलेला आहे आणि त्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार मुदतबाह्य आहे. मुख्य वादविषयाकडे जाण्यापूर्वी न्यायाच्या दृष्टीने उक्त हरकतीची दखल घेणे आवश्यक ठरते.
(6) विरुध्द पक्ष यांच्या प्रतिवादानुसार वादकथित रो-हाऊस क्र.6 संबंधी तक्रारकर्ता यांनी दि.11/11/2014 रोजीच्या खरेदीखताआधारे दि.10/1/2020 रोजी सूचनापत्र पाठविले आहे आणि ग्राहक तक्रार मुदतबाह्य ठरते. निर्विवादपणे, ग्राहक तक्रार दि.16/3/2020 रोजी दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता यांचे कथन असे की, रो-हाऊस क्र. 6 चे खरेदीखत दस्त क्र. 5887/2014 अन्वये दि.18/10/2014 रोजी त्यांच्या हक्कामध्ये करण्यात येऊन त्याच दिवशी ताबा प्राप्त झाला. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार त्यांच्या ग्राहक तक्रारीचे वादकारण सातत्यपूर्ण ठरते. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता ज्या उणिवा व सुविधांबद्दल तक्रार करतात, त्या अनुषंगाने वादकारण निश्चितच सन 2014 मध्ये निर्माण झालेले आहे. वादकारण सातत्यपूर्ण असण्याकरिता उचित स्पष्टीकरण नाही आणि वाद-तथ्यानुसार तक्रारकर्ता यांचे कथन स्वीकारार्ह नाही. तसेच दि.10/1/2020 रोजी विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठवून वादकारणामध्ये वाढ करता येणार नाही.
(7) ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 69 अन्वये जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांना कोणताही तक्रार अर्ज त्या अर्जास कारण घडल्यापासून दोन वर्षाच्या आत सादर केल्याशिवाय दाखल करुन घेता येत नाही. प्रस्तुत प्रकरणामध्ये वादकारण सन 2014 मध्ये निर्माण झाल्यानंतर तक्रारकर्ता यांनी दि.16/3/2020 रोजी ग्राहक तक्रार दाखल केली आणि विहीत मुदतीमध्ये ग्राहक तक्रार दाखल केलेली नसल्यामुळे मुदतबाह्य ठरते. न्यायाच्या दृष्टीने प्रकरणातील अन्य कायदेशीर मुद्दे, वाद-प्रश्नांना स्पर्श न करता ग्राहक तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त आहे. मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.2 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-