जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 91/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 17/04/2023.
तक्रार दाखल दिनांक : 24/04/2023. तक्रार निर्णय दिनांक : 19/12/2024.
कालावधी : 01 वर्षे 08 महिने 02 दिवस
धनाजी पिता नामदेव गायकवाड, वय 50 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. आष्टा, ता. चाकूर, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
बालाजी ॲग्रो स्टील इंडस्ट्रीज, नांदेड रोड, गरुड चौक,
लातूर, प्रोप्रा. गोविंद पिता विठ्ठल लोहार, धंदा : व्यापार. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. शिवाजी एस. कोयले
विरुध्द पक्ष :- अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांना मळणी यंत्र खरेदी करावयाचे असल्यामुळे विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधला आणि विरुध्द पक्ष यांनी "पंजाब एस मॉडेल-910" मळणी यंत्राच्या उत्तम कार्यक्षमतेबद्दल दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून ते खरेदी करण्यासाठी रु.3,21,000/- मुल्य निश्चित करण्यात आले. नोंदणी शुल्क रु.50,000/- भरण्याबद्दल विरुध्द पक्ष यांनी सूचना केल्यानंतर दि.24/8/2022 रोजी रु.5,000/- व दि.12/9/2022 रोजी उर्वरीत रु.40,000/- जमा केले. दि.15/10/2022 पर्यंत मळणी यंत्राचा ताबा देण्यात येईल, असे विरुध्द पक्ष यांनी सांगितले. त्यानंतर दि.1/10/2022 रोजी उर्वरीत रक्कम तयार असल्याबद्दल तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना सूचित केले.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, मळणी यंत्राबद्दल विरुध्द पक्ष यांच्याकडे चौकशी केली असता टाळाटाळ करणारी उत्तरे देऊन दिशभूल करु लागले आणि विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना ठरल्याप्रमाणे मळणी यंत्राचा ताबा दिला नाही. विरुध्द पक्ष यांच्याकडे मळणी यंत्र उपलब्ध नसल्यामुळे तक्रारकर्ता यांची फसवणूक झाली. उत्पादकाने मळणी यंत्र तयार करण्याचे बंद केल्यामुळे मळणी यंत्राचा ताबा देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी नोंदणी शुल्क रु.45,000/- परत मागितले असता विरुध्द पक्ष यांनी त्यांना उध्दट व धमकीवजा बोलून रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. पाठपुराव्यानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कोटक महिंद्रा बँक, शाखा लातूर यांचा धनादेश क्र. 000046, रु.45,000/-, दि.20/10/2022 दिला. तक्रारकर्ता यांनी तो धनादेश त्यांच्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा आष्टा मोड, चाकूर येथे जमा केला असता स्वाक्षरी विसंगत असल्यामुळे परत करण्यात आला.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन असे की, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्याशी मळणी यंत्र विक्री करण्याचा व्यवहार करुनही मळणी यंत्र दिले नसल्यामुळे भाडे तत्वावर मळणी यंत्र घेऊन शेती मालाची मळणी करुन घ्यावी लागली आणि त्याकरिता रु.20,000/- खर्च आला. तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठवून नोंदणी शुल्क परत मागितले असता विरुध्द पक्ष यांनी सूचनापत्र लिफाफा स्वीकारण्यास नकार दिला. अशाप्रकारे, विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करुन नोंदणी शुल्क रु.45,000/- परत करण्याचा; रु.1,00,000/- नुकसान भरपाई देण्याचा; रु.50,000/- दंड रक्कम देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.25,000/- देण्याचा व ग्राहक तक्रार खर्च रु.5,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(4) विरुध्द पक्ष यांनी जिल्हा आयोगाचे सूचनापत्र स्वीकारण्यास टाळाटाळ केली आणि जिल्हा आयोगापुढे अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात आले.
(5) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
(6) ग्राहक तक्रारीमध्ये नमूद वाद-तथ्याच्या अनुषंगाने अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांच्यामध्ये रु.3,21,000/- रकमेस 'पंजाब एस मॉडेल 910' खरेदी-विक्री करण्यासाठी दि.24/8/2022 रोजी ठराव होऊन तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.5,000/- रोख जमा केल्याबद्दल पावती क्र. 938 दिसून येते. तसेच दि.12/9/2022 रोजी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.40,000/- रोख जमा केल्याबद्दल पावती दाखल आहे. कोटक महिंद्रा बँक, शाखा लातूर यांचा धनादेश क्र. 000046 पाहता लोहार गोविंद विठ्ठल यांनी तक्रारकर्ता यांच्या नांवे दि.20/10/2022 रोजी रु.45,000/- रकमेचा धनादेश दिल्याचे दिसून येते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर यांनी दिलेला Return Memo पाहता DRAWERS SIGNATURE DIFFER कारणास्तव धनादेश परत केल्याचे दिसून येते. तक्रारकर्ता यांनी रक्कम परत मिळण्याकरिता विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत पाठविलेल्या सूचनापत्राचा लिफाफा स्वीकारण्यास विरुध्द पक्ष यांनी नकार दिल्याचे दिसून येते.
(7) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने व अभिलेखावर दाखल कागदपत्रांकरिता विरुध्द पक्ष यांच्याद्वारे खंडन, प्रतिकथन व पुरावा नाही.
(8) तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद असा की, तक्रारकर्ता यांनी वादकथित मळणी यंत्र खरेदी करण्यासाठी अनामत रक्कम जमा करुनही व उर्वरीत रक्कम जमा करण्यास तयार असतानाही विरुध्द पक्ष यांनी मळणी यंत्र खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण केला नाही आणि अनामत शुल्क परत करण्यास टाळाटाळ केली. तसेच अनामत रक्कम परत करण्याबद्दल दिलेला धनादेश विरुध्द पक्ष यांनी जाणीवपूर्वक अनादरीत केला. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांची फसवणूक करुन त्यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे.
(9) वाद-तथ्ये, अभिलेखावर दाखल केलेली कागदपत्रे व विधिज्ञांचा युक्तिवाद यांची दखल घेतली असता तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वादकथित मळणी यंत्र खरेदी करण्यासाठी रु.45,000/- जमा केले, हे कागदोपत्री पुराव्यांवरुन निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना दिलेल्या रु.45,000/- रकमेच्या धनादेशाचे अवलोकन केले असता मळणी यंत्र खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण करण्यास विरुध्द पक्ष असमर्थ ठरले, याची सिध्दता होते. तक्रारकर्ता यांना दिलेला धनादेश अनादरीत झाल्यामुळे रक्कम परत मागणी करणारे सूचनापत्र विधिज्ञांमार्फत पाठविले असता सूचनापत्र स्वीकारण्यात विरुध्द पक्ष यांनी नकार दिलेला आहे. यावरुन स्पष्ट अर्थाने, तक्रारकर्ता यांची अनामत रक्कम परत करण्याच्या कर्तव्य व जबाबदारीची विरुध्द पक्ष यांना माहिती व जाणीव होती आणि हेतु:पुरस्सर सूचनापत्र लिफाफा स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला, हे मान्य करावे लागेल. उक्त स्थिती पाहता, मळणी यंत्र खरेदी-विक्री व्यवहार पूर्ण न करणे आणि तक्रारकर्ता यांच्याकडून स्वीकारलेले अनामत शुल्क रु.45,000/- परत न करणे, हाच विरुध्द पक्ष यांचा गैरउद्देश असल्याचे अनुमान निघते. उक्त विवेचनाअंती, विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केली, असा निष्कर्ष काढण्यात येतो आणि तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 39 अंतर्गत अनुतोष मिळण्यास तक्रारकर्ता पात्र ठरतात. त्या अन्वये मळणी यंत्राकरिता स्वीकारलेले अनामत शुल्क परत करण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करणे न्यायोचित आहे.
(10) तक्रारकर्ता यांनी मानसिक त्रासाकरिता रु.25,000/-, आर्थिक नुकसान भरपाई रु.1,00,000/-, दंड रु.50,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- रकमेची विरुध्द पक्ष यांच्याकडून मागणी केलेली आहे. नुकसान भरपाई निश्चित करताना त्या–त्या वस्तुस्थितीनुसार गृहीतके निश्चित झाले पाहिजेत. अनामत शुल्क जमा करुनही विरुध्द पक्ष यांनी मळणी यंत्राबद्दल व्यवहार पूर्ण केला नाही आणि त्यानंतर रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. विरुध्द पक्ष यांच्याकडे तक्रारकर्ता यांना पाठपुरावा करावा लागलेला आहे. शिवाय, कायदेशीर कार्यवाहीकरिता सूचनापत्र पाठविणे, विधिज्ञांचा सल्ला व सहायता, विधिज्ञांचे शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच, ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. उक्त स्थिती पाहता, तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. योग्य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.10,000/- व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- मंजूर करणे न्यायोचित राहील. उर्वरीत मागण्या म्हणजेच आर्थिक नुकसान भरपाई व दंड रक्कम याबद्दल आवश्यक पुरावा उपलब्ध नसल्यामुळे त्याची दखल घेता येणार नाही. उक्त विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रु.45,000/- परत करावेत.
(3) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.5,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-