जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 195/2021. तक्रार दाखल दिनांक : 24/09/2021. तक्रार निर्णय दिनांक : 11/05/2022.
कालावधी : 00 वर्षे 07 महिने 17 दिवस
संतोष पिता दिगंबर कल्याणकर, वय 31 वर्षे, व्यवसाय : शिक्षक,
रा. व्यंकटेश निवास, बाभळगाव रोड, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कोहिनूर ट्रेडर्स, तर्फे : मालक(प्रोप्रायटर),
सौदागर करीम, ऑफीस : डॉ. बी.आर. आंबेडकर चौक,
नांदेड रोड, लातूर, ता.जि. लातूर.
(2) सौदागर करीम, वय सज्ञान, धंदा : व्यापार, ऑफीस : डॉ. बी.आर.
आंबेडकर चौक, नांदेड रोड, लातूर, ता.जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- भगवान व्ही. गवळी
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी आहे की, घर बांधकाम साहित्य खरेदी करण्याच्या अनुषंगाने त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून दि.20/2/2021 रोजी 4 चौकट, 16 नग होलपास, 16 नग बोल्ट खरेदी केले आणि त्याकरिता विरुध्द पक्ष यांनी रु.3,120/- रकमेची पावती क्र.1839 दिली. तक्रारकर्ता यांनी रक्कम रु.3,120/- "भिम ॲप" ह्या आर्थिक देवाण-घेवाण मोबाईल ॲप्लीकेशनद्वारे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या खात्यामध्ये पाठविली आणि त्याचा व्यवहार क्रमांक 105115357613 तयार झाला. परंतु, विरुध्द पक्ष क्र.2 यांनी खात्यामध्ये रक्कम जमा न झाल्याचे कळवून पुनश्च: रक्कम पाठविण्याची विनंती केली. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी पुन्हा "भिम ॲप" द्वारे विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या खात्यामध्ये रु.3,120/- पाठविले आणि त्याचा व्यवहार क्रमांक 105115358929 आहे.
(2) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, साहित्य खरेदीनंतर ते घरी आले आणि आर्थिक व्यवहाराची पडताळणी केली असता दोन्ही आर्थिक व्यवहाराकरिता एकूण रु.6,240/- विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी अतिरिक्त रु.3,120/- परत करण्याची विनंती केली असता ते परत करण्यासाठी विरुध्द पक्ष विलंब करु लागले आणि अंतिमत: दि.6/9/2021 रोजी रक्कम परत करण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविले असता विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. विरुध्द पक्ष यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने रु.3,120/- व्याजासह परत करण्याचा; मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाकरिता रु.1,00,000/- देण्याचा व खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केलेली आहे.
(3) तक्रारकर्ता यांनी ग्राहक तक्रारीपृष्ठयर्थ प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. तसेच कागदपत्रांच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले. तसेच तक्रारकर्ता यांच्याकरिता विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकला.
(4) पावती क्र.1839 चे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी कथन केल्याप्रमाणे दि.20/2/2021 रोजी साहित्य खरेदी केल्याचे व त्याची किंमत रु.3,120/- असल्याचे निर्दशनास येते. तक्रारकर्ता यांनी त्यांच्या बँक खात्याचा उतारा दाखल केलेला असून ज्यामध्ये दि.20/2/2021 रोजी दोनवेळा रु.3,120/- कपात झाल्याचे निदर्शनास येते. तसेच तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांमार्फत सूचनापत्र पाठविल्याचे निदर्शनास येते.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना सूचनापत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जिल्हा आयोगापुढे उपस्थित होऊन लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. वास्तविक पाहता, तक्रारकर्ता यांच्या वादकथनांचे खंडण करण्यासाठी लेखी निवेदनपत्र व पुराव्याची कागदपत्रे दाखल करण्यासाठी त्यांना उचित संधी होती. तक्रारकर्ता यांच्याकडून अतिरिक्त स्वीकारलेली रक्कम परत का केली नाही ? यांचे उत्तर देण्याचा विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी प्रयत्न केलेला नाही. अशा स्थितीत तक्रारकर्ता यांच्या वादकथनांना व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांस आव्हानात्मक निवेदन व विरोधी पुरावा उपलब्ध नसल्यामुळे तक्रारीतील वादकथने व तक्रारीपृष्ठयर्थ दाखल केलेली कागदपत्रे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना मान्य आहेत, असे अनुमान काढणे न्यायोचित आहे.
(6) निर्विवादपणे, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून खरेदी केलेल्या साहित्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रत्येकी रु.3,120/- याप्रमाणे दोनवेळा असे एकूण रु.6,240/- दिलेले आहेत. त्यापैकी रु.3,120/- परत मिळण्याकरिता पाठपुरावा केला आणि रक्कम न मिळाल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विधिज्ञांमार्फत विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविले; परंतु विरुध्द पक्ष यांनी उचित दखल घेतली नाही. वास्तविक पाहता, अतिरिक्त स्वीकारण्यात आलेले रु.3,120/- परत करणे विरुध्द पक्ष यांचे व्यवहारिक कर्तव्य व जबाबदारी होती. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम परत केलेली नाही आणि त्यांचे प्रस्तुत कृत्य सेवेमध्ये त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब ठरते. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्याकडून रु.3,120/- परत मिळण्याकरिता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत.
(7) तक्रारकर्ता यांनी दि.20/2/2021 पासून रक्कम रु.3,120/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याज दराने मिळावी, अशी विनंती केलेली आहे. निर्विवादपणे, तक्रारकर्ता यांना दि.20/2/2021 रोजी विरुध्द पक्ष यांच्याकडून रक्कम मिळणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे त्या तारखेपासून व्याजासह रक्कम मिळणे न्यायोचित आहे. परंतु सद्यस्थितीतील व्याज दर पाहता द.सा.द.शे. 6 टक्के उचित राहील.
(8) तक्रारकर्ता यांनी मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासाकरिता रु.1,00,000/- व खर्च रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीनुसार गृहीतकांचा आधार घेतला जातो. असे दिसते की, तक्रारकर्ता यांना रक्कम परत मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच विरुध्द पक्ष यांना विधिज्ञांद्वारे सूचनापत्र पाठवावे लागले. त्यामुळे तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासासह आर्थिक खर्च होणे स्वाभाविक आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम परत न केल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना होणारा त्रास, आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता व आर्थिक खर्चाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(9) वरील विवेचनाअंती खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
ग्राहक तक्रार क्र. 195/2021.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना रु.3,120/- परत करावेत.
तसेच, रु.3,120/- रकमेवर दि.20/2/2021 पासून संपूर्ण रक्कम परत करेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रास व आर्थिक खर्चाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-