Maharashtra

Latur

CC/30/2021

सोनेराव गुंडेराव पाटील - Complainant(s)

Versus

प्रो. प्रा., भक्ती ट्रेडिंग कंपनी - Opp.Party(s)

अ‍ॅड. ए. के. जवळकर

09 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES RESDRESSAL COMMISSION LATUR
Old Collector Office Premises, Beside Z. P. Gate No. 1 , Latur - 413512
 
Complaint Case No. CC/30/2021
( Date of Filing : 27 Jan 2021 )
 
1. सोनेराव गुंडेराव पाटील
d
...........Complainant(s)
Versus
1. प्रो. प्रा., भक्ती ट्रेडिंग कंपनी
d
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Kamalakar A. Kothekar PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 09 Dec 2021
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 30/2021.                           तक्रार दाखल दिनांक : 25/01/2021                                                                       तक्रार निर्णय दिनांक : 09/12/2021.

                                                                                          कालावधी :  00 वर्षे 10 महिने 15 दिवस

 

सोनेराव गुंडेराव पाटील, वय 32 वर्षे, व्यवसाय : शेती,

रा. येरोळ, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर.                                          तक्रारकर्ता

 

                   विरुध्द

 

(1) प्रोप्रायटर, भक्ती ट्रेडींग कंपनी,

     79/अ, मार्केट यार्ड, कव्हा रोड, लातूर.    

(2) व्यवस्थापक, महाराष्ट्र स्टेट सिडस् कार्पोरेशन लि.,

     महाबीज भवन, कृषी नगर, अकोला - 444 104.                                विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :       मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष

                             मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                             मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य

 

तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अनिल के. जवळकर

विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- अमित आर. बाहेती

विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकरिता विधिज्ञ :- तापडिया एस.व्ही.

न्‍यायनिर्णय

 

मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचे द्वारा :-

 

(1)      तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडून सदोष बियाण्याबाबत व नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ही तक्रार सादर केली आहे. त्याचे निवेदन असे की, गट नं. 247 व 261 मध्ये त्याची शेतजमीन आहे. या जमिनीमध्ये त्याने 2020 साली सोयाबीन पीक घेण्यासाठी नियोजन केले. त्याप्रमाणे दि.13/6/2020 रोजी त्याने विरुध्द पक्ष क्र.1 च्या सांगण्यावरुन व त्याच्यावर विश्वास ठेवून 30 किलो वजनाच्या 11 सोयाबीन बियाण्याच्या बॅग प्रतिबॅग रु.2,460/- या दराने खरेदी केल्या. तसेच दि.16/6/2020 रोजी 5 सोयाबीन बियाण्याच्या बॅग प्रतिबॅग रु.2,460/- या दराने खरेदी केल्या. या बियाण्याची त्याने आपल्या शेतामध्ये लागवड केली. दि.14/6/2020 व 16/6/2020 रोजी योग्यप्रकारे लागवड, खते, मशागत केली.  परंतु बियाणे 7-8 दिवस वाट पाहून देखील उगवले नाही. फार तुरळक उगवण आढळून आली. त्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 ला भेटून सांगितले असता त्याने सांगितले की, तुम्ही कृषि अधिका-यांकडे लेखी तक्रार करा. त्याप्रमाणे कृषि अधिकारी यांना कळविण्यात आले. सर्व संबंधीतांना नोटीस देऊन पंचनामा केला. त्या पंचनाम्यावरुन असे आढळून आले की, सदोष बियाण्यामुळे बियाण्याची उगवण झाली नाही व तक्रारकर्त्याला दुबार पेरणी करावी लागली. तक्रारकर्त्याने या बियाण्याचा खर्च प्रतिबॅग प्रतिएकर रु.2,460/-, ट्रॅक्टरने नांगरणीसाठी रु.1,500/-, मोगडणीसाठी रु.1,000/-, पाळीसाठी रु.800/-, ट्रॅक्टर पेरणी रु.1,000/- व खते रु.1,260/- अशाप्रकारे प्रतिएकर रु.8,020/- खर्च केला; जो वाया गेला. विरुध्द पक्षाने मागणी करुन देखील या नुकसानीची भरपाई दिली नाही.  त्याला सर्व क्षेत्रामध्ये दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणीसाठी रु.8,020/- खर्च आला. जर मुळ बियाणे योग्यप्रकारे उगवले असते तर दुबार पेरणीचे काम पडले नसते. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने चुकीची व दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे त्याचे जे नुकसान झाले, त्या नुकसानीच्या भरपाईपोटी मुळ बियाणे खरेदी करताना दिलेली किंमत व त्याने केलेला खर्च रु.1,28,320/- 15 टक्के व्याजासह मिळावा; नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- मिळावेत; शारीरिक त्रासापोटी रु.50,000/- व खर्चापोटी रु.20,000/- मिळावेत, अशाप्रकारची मागणी केलेली आहे.

 

(2)      या प्रकरणात विरुध्द पक्ष क्र.1 याने लेखी उत्तरपत्र दाखल करुन तक्रारकर्ता ग्राहक संज्ञेत येत नसल्याचे नमूद केले. तो किरकोळ बियाणे विक्री करणारा व्यापारी असून विवादीत बियाण्याचा उत्पादक नाही. विक्री करताना कंपनीकडून आलेली सिलबंद पिशवी जशीच्या तशी विक्री केली आहे. तथाकथित पंचनामा त्याच्या समक्ष झालेला नाही आणि तो त्यास मान्य नाही. शेतीमधील उत्पन्न विविध गोष्टीवर अवलंबून असते. सदर हंगामामध्ये महाराष्ट्रात व मराठवाड्यात कोठेही पाऊस योग्य प्रमाणात पडलेला नाही. महाराष्ट्र शासनाने सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई म्हणून अनुदान दिलेले आहे. शेवटी तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

 

(3)      विरुध्द पक्ष क्र.2 ने आपल्या उत्तरपत्रात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने नफा मिळविण्याच्या उद्देशाने व व्यापारी हेतुने बियाणे लागवड केले; म्हणून आयोगासमोर ही तक्रार चालू शकत नाही. बियाणे सदोष होते; त्यामुळे उगवण कमी झाली; त्यामुळे तक्रारकर्त्याला अनुषंगिक खर्च व भुर्दंड लागला इ. सर्व मजकूर खोटा आहे. कृषि अधिका-यांनी त्यांना पाहणीच्या वेळी पंचनाम्यासंबंधी कुठलीही नोटीस दिली नाही. तो पंचनामा देखील त्यांना मान्य नाही. झालेले नुकसान, त्यासंबंधीची आकडेवारी इ. तपशील देखील त्यांनी नाकारला आहे. आपल्या विशेष उत्तरात ते असे निवेदन करतात की, तक्रारकर्त्यानेच पेरणीपूर्व योग्य मशागत केली नाही. पेरणी योग्यप्रकारे केली नाही. जमिनीचा पोत, जमिनीची प्रत, पावसाचे प्रमाण, पेरणीसाठी अवलंबलेली पध्दती, मशागत, खते, हवामान, जमिनीतील लागवड इ. अनेक कारणे बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम करीत असतात. तक्रारकर्त्याने स्वत: योग्य पध्दती न अवलंबल्यामुळे बियाण्याची उगवण कमी येऊ शकते. विरुध्द पक्षाने यासंबंधी योग्य पध्दती अवलंबून रितसर बियाणे विक्रीला काढले. त्याची यापूर्वीच तपासणी इ. झालेली आहे. हे बियाणे सदोष होते याबद्दल कुठलाही सक्षम अहवाल व पुरावा, शासकीय प्रयोगशाळेचा अहवाल नाही. तक्रारकर्त्याने हे बियाणे प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले नाही. योग्य पध्दतीचा अवलंब केला नाही. चुकीची व खोटी तक्रार केली आहे; ती फेटाळण्यात यावी.

 

(4)      उभय बाजुंचे निवेदन, पुरावे इ. विचारात घेता निकालासाठी मी खालील मुद्दे निश्चित करतो व त्‍यावरील माझा निर्णय कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे देत आहे.

                  

मुद्दे                                                                        उत्तर

 

(1) तक्रारकर्त्‍याने हे सिध्‍द केले काय की, विरुध्द पक्षाने त्‍याला

     चुकीची व  दोषपूर्ण सेवा पुरविली ?                                             अंशत: होकारार्थी

(2) काय आदेश  ?                                                                   अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(5)      मुद्दा क्र. 1 व 2 :- या प्रकरणात ज्या गोष्टी विशेष वादग्रस्त नाहीत त्या अशा की, तक्रारकर्त्याने 2020 साली आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी विरुध्द पक्ष क्र.1 मार्फत विरुध्द पक्ष क्र.2 यांचे सोयाबीनचे बियाणे खरेदी केले. या बियाण्याची त्याने आपल्या शेतात पेरणी देखील केली. परंतु उगवण व्यवस्थित झाली नाही. त्याबाबत कृषि अधिका-यांनी पंचनामा केला. त्या पंचनाम्यात अशी बाब नमूद आहे की, सदोष बियाण्यामुळे उगवण चांगली झाली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला दुबार पेरणी करावी लागली. पंचनाम्याच्या वेळी दुबार पेरणी झालेली होती.

 

(6)      विरुध्द पक्ष क्र.2 तर्फे असा आक्षेप नोंदविण्यात आला आहे की, तक्रारकर्त्याने व्यापारी हेतुने सोयाबीनची लागवड केली म्हणून त्याला या आयोगासमोर दाद मागता येणार नाही. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत हे स्पष्ट केलेले आहे की, तो शेतकरी आहे. शेतावर त्याच्या कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे आणि त्याने शेती करताना स्वत:च्या कुटुंबासाठी म्हणून उदरनिर्वाहासाठी हे बियाणे स्वत:च्या शेतात पेरणी करण्यासाठी खरेदी केलेले होते. अशा सर्व बाबी विचारात घेता आयोग अशा निष्कर्षास येते की, तक्रारकर्त्याने स्वत:च्या शेतात पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी केले. ते व्यापारी उद्देशाने खरेदी केले, असे म्हणता येणार नाही व आयोगाला ही तक्रार चालविण्याचा अधिकार आहे.

 

(7)      असे दिसते की, बियाण्याची योग्य उगवण  न  झाल्यामुळे  तक्रारकर्त्याने  कृषि  अधिका-याकडे तक्रार केली. कृषि अधिका-याने जागेवर जाऊन पंचनामा केला. त्या पंचनाम्याची प्रत सादर केलेली आहे. विरुध्द पक्षाचे म्हणणे असे की, त्यांना या पंचनाम्याची सूचना नव्हती. परंतु तक्रारकर्ता शेतकरी याबद्दल जबाबदार ठरणार नाही. तक्रारकर्त्याने योग्य अधिका-यांकडे तक्रार केली. पंचनाम्यावरुन असे दिसते की, कृषि अधिका-यांनी योग्य ती पध्दत अवलंबून पंचनामा केला. या पंचनाम्यात स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, बियाणे सदोष असल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. असेही दिसून येते की, परिसरातील शेतक-यांनी पंचनामा करताना अशी माहिती सांगितली. हेही स्पष्ट आहे की, बियाणे व त्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी तक्रारकर्ता अथवा कृषि अधिकारी यांनी पाठविलेला नाही. त्यामुळे सदोष बियाण्याबद्दल शास्त्रीय अहवाल आयोगासमोर नाही. या संबंधाने विरुध्द पक्षाने मा. हरियाणा राज्य आयोगाच्या प्रथम अपिल नं. 652/2007, "मे. अन्नपुर्णा फर्टीलायझर्स /विरुध्द/ अक्षय सिडस् टेक कंपनी", निवाडा दि.16/3/2007 याचा हवाला देऊन असे निवेदन केले की, कृषि अधिकारी अथवा तक्रारकर्ता यांनी बियाण्याच्या गुणवत्तेबद्दल योग्य पुरावा दिलेला नाही. म्हणून अशी तक्रार मंजूर करता येणार नाही. याबाबत तक्रारकर्त्याच्या वकिलांनी मा. राष्ट्रीय आयोगाच्या "श्रीहरी लिंबराज करंजकर /विरुध्द/ अजीत सिडस् लि.", 2021 (1 ) सी.पी.आर. 80 (एन.सी.) या प्रकरणाचा हवाला दिला. ज्यात मा. राष्ट्रीय आयोगाने असे नमूद केले आहे की, A farmer cannot be penalized for lapse on part of concerned public servant he having done his duty by bringing the matter to notice of Agricultural Department. या निवाड्याचा विचार करता मा. राष्ट्रीय आयोगाने जे सुत्र ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणे जर कृषि अधिका-यांनी आपल्या कर्तव्यात काही कसूर केला असेल तर त्याकरिता तक्रारकर्त्याला दोषी ठरवता येणार नाही आणि त्याच्या अशा चुकीमुळे तक्रारकर्त्याचे नुकसान होऊ नये.

 

(8)      उभय बाजुतर्फे इतर काही निवाड्यांचा हवाला देण्यात आला. ज्यामध्ये तक्रारकर्त्यातर्फे 1 (2012) सी.पी.जे. 1 (एस.सी.) नॅशनल सिडस् कार्पोरेशन लि. /विरुध्‍द/ एम. मधुसुदन रेड्डी’; 2018 (3) सी.पी.आर. 172 (एन.सी.) ‘इंडियान फार्मर्स फर्टीलायझर्स को-ऑप. लि. /विरुध्‍द/ विजयकुमार"; 3 (2018) सी.पी.जे. 126 (एम.पी.) नॅशनल सिडस् कार्पोरेशन लि. /विरुध्‍द/ रविच्रंद्रा’;  2017 (3) सी.पी.आर. 279 (एन.सी.) ‘सिंजेटा  इंडिया लि. /विरुध्‍द/  टी. सलन्‍मा’; 2017 (2) सी.पी.आर. 645 (एन.सी.) ‘कांता कांथा राव /विरुध्‍द/ वाय. सूर्य नारायण’;  2 (2011) सी.पी.जे. 124 (एन.सी.) 'थिरुवल्लूवर ट्रान्सपोर्ट कं.लि. /विरुध्‍द/ ए. मरिमुथू या प्रकरणांचा हवाला देण्‍यात आला आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष क्र.2 याने 2013 3 सी.पी.आर. (एन.सी.) 386 "सिंजेटा इंडिया लि. /विरुध्द/ पी. चौवदिहा"; 2013 3 सी.पी.आर. (एन.सी.) 'ससी पी.के. /विरुध्‍द/ एच ॲन्ड जे इन्फोमार्क’; 2 (2012) सी.पी.जे. 373 (एन.सी.) 'महिको सिडस् /विरुध्‍द/ शरद मोतीराव कंकाळे’;  2 (2012) सी.पी.जे. 170 (एन.सी.) 'सुरेश कुमार /विरुध्‍द/ इंडियन फार्मर्स फर्टीलायझर्स को-ऑप. लि.’;  2 (2013) सी.पी.जे. 617 (एन.सी.) 'बंता राम /विरुध्‍द/ जय भारत बीज कंपनी’;  2 (2012) सी.पी.जे. 436 (एन.सी.) 'महिको मॉन्सेंटो बायोटेक इंडिया लि. /विरुध्‍द/ डीसीडी दाबसप्पा’;  2006 1 सी.एल.टी. (एन.सी.) 223 'हिंदुस्थान इन्सेक्टीसाईडस् लि. /विरुध्‍द/ कोपोलू संबासिवा राव’;  4 (2013) सी.पी.जे. 186 (एन.सी.) 'समशेर सिंग /विरुध्‍द/ मे. बागरी बीज भांडार’; 2 (2012) सी.पी.जे. 350 (एन.सी.) 'गुरबक्ष लॉजिस्टीक इंडिया /विरुध्‍द/ ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्वीपमेंट लि.’;  3 (2012) सी.पी.जे. 434 (एन.सी.) 'श्री अली मोहमद /विरुध्‍द/ स्वास्तिक सिमेंट सप्लायर्स’;  2 (2013) सी.पी.जे. 193 (एन.सी.) 'संकरणकुट्टी /विरुध्‍द/ डेव्हलपमेंट ऑफीसर’;  2014 (3) सी.पी.आर. 376 (एन.सी.) 'नुझिविडू सिडस् लि. /विरुध्‍द/ श्री. प्रकाशराव गुलाबराव डोमकी’;  2011 एन.सी.जे. 181(एन.सी.) 'सिंजेटा इंडिया लि. /विरुध्‍द/ वेलागा नरसिंहा राव’;  मा.महाराष्ट्र राज्य आयोगाच्या नागपूर खंडपिठाचा प्रथम अपिल नं.1508/2001, "महाराष्ट्र स्टेट सिडस् कार्पोरेशन लि. /विरुध्द/ प्रेमचंद मानेकचंद नहार" निर्णय दि.1/4/2013 या निवाड्यांचा हवाला दिला आहे. या सर्व निवाड्यांमधील सुत्राचा विचार केला.

 

(9)      एकंदरीत प्रकरणावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.1 कडून विरुध्द पक्ष क्र.2 चे बियाणे खरेदी केले. त्याने आपल्या तक्रारीत व पुराव्यात हे स्पष्ट केले आहे की, त्याने योग्यप्रकारे मशागत करुन बियाण्याची पेरणी केली; परंतु ते बियाणे उगवले नाही. त्यामुळे त्याने त्याबद्दल विरुध्द पक्ष क्र.1 व कृषि अधिका-यांकडे तक्रार केली. त्याला दुबार पेरणी करावी लागली. कृषि अधिका-यांनी पंचनामा केला. पंचनामा केला तेव्हा त्याला असे आढळून आले की, निकृष्ठ प्रतीच्या बियाण्यामुळे उगवण कमी झाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. अशा सर्व बाबी विचारात घेता आयोग या निष्कर्षास येते की, विरुध्द पक्षाने निकृष्ठ प्रतीचे बियाणे तक्रारकर्त्याला दिल्यामुळे त्याचे नुकसान झाले; त्याला त्रास झाला. अशाप्रकारे विरुध्द पक्षाने चुकीची व दोषपूर्ण सेवा पुरविली.

 

(10)    विरुध्द पक्ष क्र.1 चे निवेदन आहे की, त्याने विरुध्द पक्ष क्र.1 चा प्रतिनिधी म्हणून प्रकरणात त्याने स्वत: जशाप्रकारे बॅग सिलबंद विरुध्द पक्ष क्र.2 कडून मिळाली, तशाप्रकारे तक्रारकर्त्याला दिली. त्यामुळे त्याचा काही दोष नाही. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 ने विरुध्द पक्ष क्र.2 चा प्रतिनिधी म्हणून हे बियाणे तक्रारकर्त्याला विकले आणि म्हणून त्याला देखील जबाबदारीतून अंग काढून घेता येणार नाही.

 

(11)    तक्रारकर्त्याच्या नुकसान भरपाईबाबत असे दिसते की, तक्रारकर्त्याने जे बियाणे खरेदी केले ते बियाणे निकृष्ठ असल्यामुळे त्याला परत दुबार पेरणी करावी लागली. सदोष बियाण्याची किंमत व लागवडीसाठी झालेला खर्च तो या प्रकरणात विरुध्द पक्षांकडून मागणी करीत आहे. तशी इतरही मागणी करीत आहे.

 

(12)    उभय बाजुतर्फे ज्या निवाड्यांचा हवाला देण्यात आला, त्यापैकी बहुतांश प्रकरणातील वस्तुस्थिती व आपल्या प्रकरणातील वस्तुस्थिती वेगवेगळी आहे. आपल्या प्रकरणात तक्रारकर्ता हा उत्पन्नाचे नुकसान इ. मागणी करीत नाही. तो केवळ बियाण्याची किंमत व मशागत व दुबार पेरणीसाठी लागलेला खर्च मागत आहे. तसेच आपल्या प्रकरणात तक्रारकर्त्याने असा पुरावाही दिला आहे की, त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो शेती व्यवसाय करतो आणि त्यासाठी त्याने हे बियाणे खरेदी केले होते. विरुध्द पक्षातर्फे केवळ शपथपत्र असाच पुरावा देण्यात आला आहे. परंतु तक्रारकर्त्याने योग्य मशागत इ. केली नाही, हे सिध्द करण्याइतपत पुरेसा अधिकचा पुरावा विरुध्द पक्षाने आपल्या बचावापृष्ठयर्थ सादर केलेला नाही. या उलट तक्रारकर्त्याने आपल्या शपथपत्रात हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे की, त्याने योग्यप्रकारे मशागत करुनच पेरणी केली होती; परंतु उगवण बरोबर झाली नाही. अशा सर्व बाबी विचारात घेता हा निष्कर्ष काढण्यात येत आहे की, जरी बियाण्यास विक्रीसाठी परवानगी दिली असली तरी हे बियाणे केवळ प्रत्यक्षात शेतात पेरणी करण्यात आले तेव्हा त्याची उगवणक्षमता फारच कमी आढळून आली. तक्रारकर्ता व इतर शेतकरी यांनी त्याबद्दल पंचनामा करताना संबंधीत अधिका-यांना तशी माहिती दिली आणि अशा सर्व बाबी विचारात घेऊन असा निष्कर्ष काढण्यात येत आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला अयोग्य प्रतीचे बियाणे पुरविल्यामुळे तक्रारकर्त्याचे नुकसान झाले व त्याला दुबार पेरणी करावी लागली.

 

(13)    सुरुवातीची पेरणी करताना त्याने मशागत केली, खते इ. वापरली त्याबाबतचा खर्च व नंतर दुबार पेरणीच्या वेळी वेगळा त्याला मशागत इ. साठी खर्च करावा लागला, अशा प्रकारची मागणी तक्रारकत्यातर्फे करण्यात आलेली आहे. परंतु तक्रारकर्त्याला अशा दोन्ही वेळी खर्च अथवा मशागत इ. साठीची रक्कम मागता येणार नाही. एकवेळ तरी त्याला खर्च करावाच लागला असता. फक्त त्याला कमी उगवण आल्यामुळे परत खर्च करावा लागला, एवढाच मुद्दा विचारार्थ योग्य ठरतो. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत त्याला झालेल्या खर्चाबाबत तपशील दिला आहे व शपथपत्रातही तसे नमूद केले आहे. परंतु तक्रारकर्त्याने या खर्चाबाबत इतर स्पष्ट पुरावा दिलेला नाही. तक्रारकर्त्याने जरी खते खरेदी केले तरी संपूर्ण खत वाया जात नाही. त्याने ट्रॅक्टर वापरले तर त्या ट्रॅक्टरबाबतची पावती किंवा पुरावा तक्रारकर्त्याने या प्रकरणात सादर केलेला नाही आणि म्हणून त्याने जो मशागत इ. साठी सांगितलेला व दुबार पेरणीसाठी सांगितलेला खर्च आहे तो तेवढाच खर्च झाला असावा, हे सिध्द करण्याइतपत पुरेसा पुरावा आयोगासमोर सादर करण्यात आलेला नाही. तरीही आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्त्याने निश्चितपणे साधारण शेतकरी जो खर्च करतो तो खर्च करुन पेरणी केली. जी पहिली पेरणी वाया गेली त्यासाठी दुबार पेरणीसाठी त्याला परत खर्च करावा लागला. अशा सर्व बाबी विचारात घेता साधारणत: तक्रारकर्त्याचे निवेदन व विरुध्द पक्षाचे निवेदन इ. विचारात घेऊन आयोगाचे असे मत आहे की, बियाण्याची किंमत व दरएकरी तक्रारकर्त्याला अधिकचा झालेला खर्च अशी एकंदरीत नुकसान भरपाईची रक्कम तक्रारकर्त्याला दिली जाऊ शकते. उपलब्ध पुराव्यावरुन व काहीसे अनुमान लक्षात घेता आयोग अशा निष्कर्षास येत आहे की, बियाण्याच्या किंमतीव्यतिरिक्त तक्रारकर्त्याला एकरी रु.2,500/- खर्च करावा लागला आणि त्याप्रमाणे बियाण्याची किंमत अधिक रु.2,500/- असा एकरी जो त्याचा अधिकचा खर्च झाला, तो त्याला विरुध्द पक्षाकडून देवविणे योग्य आहे.

 

(14)    या प्रकरणात तक्रारकर्त्याने 16 एकर क्षेत्रावर पेरणी केली होती. त्यामुळे 16 एकर पेरणीसाठी एकरी रु.2,500/- याप्रमाणे त्याला रु.40,000/- मशागतीचा खर्च; तसेच त्याने 16 बॅग वापरल्या म्हणून 16 बॅगची किंमत प्रतिबॅग रु.2,460/- या दराने रु.39,360/- याप्रमाणे रु.40,000/- + रु.39,360/-  =  रु.79,360/- एवढी एकूण रक्कम तक्रारकर्त्याला दिली जाऊ शकते. मी मुद्दा त्याप्रमाणे निर्णीत करुन खालीलप्रमाणे आदेश करतो.

 

आदेश

 

(1) तक्रार खालीलप्रमाणे मंजूर करण्यात येते.

(2) विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या एकूण रु.79,360/- या आदेशापासून 30 दिवसाच्‍या आत अदा करावेत. सदर रक्कम या मुदतीत अदा केली नाही तर विरुध्‍द पक्षांना या रकमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज देखील द्यावे लागेल.      

ग्राहक तक्रार क्र. 30/2021.

 

(3) विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व या कार्यवाहीच्‍या खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत.

(4) उभय पक्षकारांना या निवाड्यांच्‍या प्रती विनामुल्‍य त्‍वरीत देण्‍यात याव्‍यात.  

 

 

(श्रीमती रेखा  जाधव)         (श्री. रविंद्र शे. राठोडकर)        (श्री. कमलाकर अ. कोठेकर)

         सदस्‍य                               सदस्‍य                                        अध्‍यक्ष                

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 (संविक/श्रु/81221)

 

 

 
 
[HON'BLE MR. Kamalakar A. Kothekar]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.