(पारीत व्दारा श्री भास्कर बी. योगी, मा.अध्यक्ष)
01. तक्रारकर्ती श्रीमती मिनाक्षी गजान ठाकरे यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -1986 चे कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1 ते 3 अनुक्रमे विमा कंपनी, बॅंक आणि पोलीस अधिक्षक यांचे विरुध्द तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा रक्कम मिळण्यासाठी व ईतर अनुषंगीक मागण्यांसाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे पती हे पोलीस विभागात शिपाई या पदावर विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक, गोंदीया यांचे अधिपत्याखाली पोलीस स्टेशन देवरी येथे सन 2012 पासून कार्यरत होते. सन-2012 मध्ये पोलीस विभागातील कर्मचा-यांचे मासिक वेतन हे विरुध्दपक्ष क्रं 2 एक्सीस बॅंक शाखा गोंदीया यांचे मार्फत करण्यात आले होते, त्यासाठी तक्रारकर्तीचे पती यांचे खाते विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये उघडण्यात आले होते आणि त्या खात्याचा क्रमांक-913010047419881 तसेच डेबीट/एटीएम कार्ड क्रं-5296150008190220 असा होता. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेच्या मार्फतीने पोलीस विभागातील कर्मचा-यांचे बचत खात्यावर डेबीट कॉर्डव्दारे रुपये-30,00,000/- चा वैयक्तिक अपघात विमा दिला होता. सदर विमा विरुध्दपक्ष क्रं 1 न्यु इंडीया अॅश्युरन्स कंपनी मार्फतीने दिला होता, त्यामुळे तिचे पती हे विरुध्दपक्ष बॅंक व विमा कंपनीचे ग्राहक होते.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती कर्तव्यावर असताना दिनांक-05.03.2018 रोजी गोंदीया येथील कार्यशाळेसाठी जात असताना अपघातात जखमी झाले, त्यांना सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. पतीचे मृत्यू नंतर मृतकाची पत्नी व कायदेशीर वारसदार/नॉमीनी या नात्याने तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक गोंदीया यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके कडे विमा दावा आवश्यक दस्तऐवजासह दाखल केला परंतु आज पर्यंत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून तिला विमा रक्कम मिळालेली नाही. शेवटी तिने वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 ते 3 यांना नोटीस पाठवून विमा रक्कम देण्याची विनंती केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष यांनी विमा रक्कम न देऊन तिला दोषपूर्ण सेवा दिली व त्यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन विरुध्दपक्षा विरुध्द पुढील प्रमाणे मागण्या केल्यात
1. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे विमा कंपनी व बॅंक यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा रक्कम रुपये-30,00,000/- आणि सदर विमा रकमेवर अपघाती मृत्यू दिनांक-05.03.2018 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो 18 टक्के व्याज देण्याचे आदेशित व्हावे.
2. तक्रारकर्तीला आर्थिक नुकसानीपोटी रुपये-50,000/- तसेच शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-30,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे विमा कंपनी व बॅंके कडून तक्रारकर्तीला देण्याचे आदेशित व्हावे.
3. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे विमा कंपनी व बॅंकेनी त्यांचे कडे असलेले पॉलिसीशी संबधित सर्व दस्तऐवज जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल करण्याचे आदेशित व्हावे
4. या शिवाय योग्य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया अॅश्युरन्स कंपनीने आपले लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये असे नमुद केले की, तक्रारकर्ती श्रीमती मिनाक्षी गजानन ठाकरे हिने तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा रक्कम रुपये-30,00,000/- वार्षिक 18 टक्के दराने व्याजासह मिळण्यासाठी तसेच ईतर अनुषंगीक मागण्यासांठी दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीचे पती श्री गजानन रामचंद्र ठाकरे हे पोलीस विभागात शिपाई या पदावर विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक यांचे अधिपत्याखाली कार्यरत असताना ते गोंदीया येथे कार्यशाळेत उपस्थित राहण्या करीता दिनांक-05.03.2018 रोजी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तक्रारकर्तीचे पतीचे वेतनाचे बचत खाते विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंक शाखा गोंदीया येथे उघडण्यात आले होते आणि डेबीट कॉर्डवर वैयक्तिक अपघात विमा योजना रुपये-30,00,000/- काही अटी व शर्तीचे अधीन राहून Service-Level Agreement(SLA) अनुसार देण्यात आला होता आणि सदर विम्याचा लाभ हा खातेधारकाचे मृत्यू नंतर त्याचे कायदेशीर वारसदार यांना मिळणार होता. विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीव्दारे विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेस “CREDIT CARD PACKAGE INSURANCE POLICY NO.-99000046171300000003 दिनांक-15.04.2017 रोजी जारी केली होती आणि सदर पॉलिसीचा वैध कालावधी हा दिनांक-15.04.2017 ते दिनांक-14.04.2018 असा होता. सदर पॉलिसीव्दारे वैयक्तिक अपघात (Personal Accident) & Purchase Protection for Debit Card Holders of Axix Bank all over India) विमा संरक्षण देण्यात आले होते. सदर विम्या संबधी करार विमा कंपनी, बॅंक आणि नियोक्ता यांचे मध्ये झालेला होता. विमा दावा निश्चीतीसाठी प्रक्रिया दिलेली आहे आणि त्याचे पालन सर्वानी करणे आवश्यक आहे. तक्रारकर्तीचा विमा दावा हा विफध्दपक्ष क्रं 2 बॅंके व्दारे विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडे करण्यात आला होता. त्या विमा दाव्या संबधात आवश्यक दस्तऐवज तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया अॅश्युरन्स कंपनी मध्ये दाखल करणे आवश्यक होते. दसतऐवजाची तपासणी केल्या नंतरच विमा दावा मंजूर केल्या जातो परंतु तक्रारकर्तीने आवश्यक दसतऐवज विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके मध्ये दाखल केलेले नाहीत, विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेनी तक्रारकर्तीचा विमा दावा हा Service-Level Agreement(SLA) च्या अटी व शर्ती प्रमाणे आवश्यक दसतऐवज दाखल न केल्याचे कारणा वरुन नामंजूर केला होता त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला विमा दावा नामंजूरीचे पत्र दिले नाही. तक्रारकर्तीला विमा दावा निश्चीतीसाठी करारा प्रमाणे आवश्यक दसतऐवज दाखल करणे आवश्यक होते परंतु तिने तसे केलेले नाही त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेनी केलेली कृती ही योग्य व बरोबर आहे. सबब विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आवश्यक दसतऐवजाची पुर्तता झालेली नसलयाने तक्रारकर्तीला विमा दाव्याची रक्कम न देऊन कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. परिणामी विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी ही विमा दाव्याची रक्कम, व्याज आणि ईतर मागितलेली रक्कम देण्यास जबाबदार नाही. सबब तक्रारकर्तीची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया अॅश्योरन्स कंपनी तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके तर्फे लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके तर्फे नमुद करण्यात आले की, तक्रारकर्तीचे पती हे विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक, भंडारा यांचे अधिपत्या खाली शिपाई या पदावर देवरी येथे सन-2012 मध्ये कार्यरत होते ही बाब माहिती अभावी अमान्य केली. तक्रारकर्तीचे पती यांचे खाते विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके मध्ये उघडण्यात आले होते आणि त्याचा खाते क्रं-913010047419881 होता आणि सदर खात्यावर डेबीट ए.टी.एम. कॉर्ड दिले होते या बाबी मान्य केल्यात. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके मध्ये पोलीस विभागातील कर्मचा-यांचे वेतन खाते Service-Level Agreement(SLA) प्रमाणे उघडले होते. तथापी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी कोणत्याही खाते धारकास विमा पॉलिसीची प्रत पुरविलेली नव्हती. सदर विमा पॉलिसी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने अपघाती मृत्यू आलयास रुपये-30,00,000/- रकमेची विमा जोखीम Service-Level Agreement(SLA) प्रमाणे काही अटी व शर्तीचे आधीन राहून स्विकारली होती, त्यानुसार विमा दाव्या सोबत संबधित आवश्यक दसतऐवज हे विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया अॅश्योरन्स कंपनीकडे विहित मुदतीत दाखल करणे आवश्यक होते. विमा रक्कम देण्याची जबाबदारी ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची असून विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेची विमा रक्कम देण्या बाबत कोणतीही जबाबदारी येत नाही. तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू नंतर काही दिवसा नंतर ती विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके मध्ये आली होती, त्यावेळी तक्रारकर्तीला तिचे पतीचे मृत्यू बाबत आवश्यक दसतऐवज तसेच ती मृतकाची कायदेशीर वारसदार/नॉमीनी असल्या बाबत ओळखपत्रा संबधीचे दसतएवेज हे अपघात दिनांका पासून 60 दिवसांचे आत दाखल करणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्तीने आवश्यक दसतऐवज हे दिनांक-14.06.2018 रोजी तिचे पतीचे अपघाता नंतर 100 दिवसा नंतर दाखल केलेत. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेनी तक्रारकर्ती कडून प्राप्त झालेले दसतऐवज त्वरीत विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी कडे पाठविले होते परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा हा Service-Level Agreement(SLA) प्रमाणे दस्तऐवज दाखल केले नसल्याचे कारणा वरुन नामंजूर केला. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेचा या मध्ये कोणताही दोष नाही. तक्रारकर्तीचे वकीलांनी विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेस दिनांक-14.10.2020 रोजीची नोटीस पाठविली होती, त्या नोटीसला विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेंनी दिनांक-08.12.2020 रोजी लेखी उत्तर दिलेले आहे. तक्रारकर्तीने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दिनांक-26.11.2020 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेचे तक्रारकर्तीचे नोटीसला दिनांक-08.12.2020 रोजीचे लेखी उत्तर देण्यापूर्वी दाखल केलेली आहे. सबब तक्रारकर्तीची विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
05. विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक, गोंदीया तर्फे लेखी उत्तर श्री सुजित चव्हाण पोलीस निरिक्षक, पोलीस कंट्रोल रुम गोंदीया यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरा मध्ये तक्रारकर्तीने केलेल्या मागण्या या नामंजूर केल्यात. तक्रारकर्तीचे पती हे मा. पोलीस अधिक्षक गोंदीया यांचे अधिकाराखाली पोलीस विभागात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होते. त्यांनी तक्रारकर्तीला सर्व आवश्यक दस्तऐवज पुरविलेले आहेत. विमा दावा निश्चीतीचे काम हे विमा कंपनीचे आहे. सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी असे नमुद केले.
06. तक्रारकर्तीची तक्रार, शपथे वरील पुरावा, विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीचे लेखी उत्तर व शपथे वरील पुरावा , विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेचे लेखी उत्तर विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक गोंदीया यांचे तर्फे दाखल लेखी उत्तर तसेच प्रकरणातील दाखल दस्तऐवज ईत्यादीचे जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री पी.ई.काटेखाये आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री आशिष पौनीकर यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला, त्या वरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर तक्रारीचे न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्यू संबधात विमा दाव्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न देऊन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय ? | -होय- |
3 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
:: निष्कर्ष ::
मुद्दा क्रं 1 व 2 बाबत
07. तक्रारकर्तीचे पती हे पोलीस विभागात शिपाई या पदावर विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक, गोंदीया यांचे अधिपत्याखाली पोलीस स्टेशन देवरी येथे सन 2012 पासून कार्यरत होते. सन-2012 मध्ये पोलीस विभागातील कर्मचा-यांचे मासिक वेतन हे विरुध्दपक्ष क्रं 2 एक्सीस बॅंक शाखा गोंदीया यांचे मार्फत करण्यात आले होते, त्यासाठी तक्रारकर्तीचे पती यांचे खाते विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये उघडण्यात आले होते आणि त्या खात्याचा क्रमांक-913010047419881 तसेच डेबीट/एटीएम कार्ड क्रं-5296150008190220 असा होता. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेच्या मार्फतीने पोलीस विभागातील कर्मचा-यांचे बचत खात्यावर डेबीट कॉर्डव्दारे रुपये-30,00,000/- चा वैयक्तिक अपघात विमा दिला होता. सदर विमा विरुध्दपक्ष क्रं 1 न्यु इंडीया अॅश्युरन्स कंपनी मार्फतीने दिला होता या बाबी उभय पक्षां मध्ये विवादास्पद नाहीत.
08. विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीचे लेखी उत्तरा प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेस “CREDIT CARD PACKAGE INSURANCE POLICY NO.-99000046171300000003 दिनांक-15.04.2017 रोजी जारी केली होती आणि सदर पॉलिसीचा वैध कालावधी हा दिनांक-15.04.2017 ते दिनांक-14.04.2018 असा होता. सदर पॉलिसीव्दारे वैयक्तिक अपघात (Personal Accident) & Purchase Protection for Debit Card Holders of Axix Bank all over India) विमा संरक्षण देण्यात आले होते. सदर विम्या संबधी करार विमा कंपनी, बॅंक आणि नियोक्ता यांचे मध्ये झालेला होता. सदर विमा पॉलिसी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने अपघाती मृत्यू आलयास रुपये-30,00,000/- रकमेची विमा जोखीम Service-Level Agreement(SLA) प्रमाणे काही अटी व शर्तीचे आधीन राहून स्विकारली होती, त्यानुसार विमा दाव्या सोबत संबधित तक्रारकर्तीचे पतीचे मृत्यू बाबत आवश्यक दसतऐवज तसेच ती मृतकाची कायदेशीर वारसदार/नॉमीनी असल्या बाबत ओळखपत्रा संबधीचे दसतएवेज हे अपघात दिनांका पासून 60 दिवसांचे आत दाखल करणे आवश्यक होते. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेनी तक्रारकर्तीचा विमा दावा हा Service-Level Agreement(SLA) च्या अटी व शर्ती प्रमाणे आवश्यक दसतऐवज दाखल न केल्याचे कारणा वरुन नामंजूर केला होता त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला विमा दावा नामंजूरीचे पत्र दिले नाही.
09. या उलट विरुध्दपक्ष अॅक्सीस बॅंकेचे लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीला तिचे पतीचे मृत्यू बाबत आवश्यक दसतऐवज तसेच ती मृतकाची कायदेशीर वारसदार/नॉमीनी असल्या बाबत ओळखपत्रा संबधीचे दसतएवेज हे अपघात दिनांका पासून 60 दिवसांचे आत दाखल करणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्तीने आवश्यक दसतऐवज हे दिनांक-14.06.2018 रोजी तिचे पतीचे अपघाता नंतर 100 दिवसा नंतर दाखल केलेत. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेनी तक्रारकर्ती कडून प्राप्त झालेले दसतऐवज त्वरीत विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी कडे पाठविले होते परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा हा Service-Level Agreement(SLA) प्रमाणे दस्तऐवज दाखल केले नसल्याचे कारणा वरुन नामंजूर केला.
10. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेच्या लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीने तिचे पतीचे अपघाती मृत्यू बाबतचे दसतऐवज दिनांक-14.06.2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत दाखल केले होते व ते त्यांनी तवरीत विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी कडे दाखल केले होते.
11. तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यू हा दिनांक-05.03.2018 रोजी झालेला होता आणि Service-Level Agreement(SLA) प्रमाणे मृत्यू दिनांका पासून 60 दिवसांचे आत विमा दाव्या संबधी दसतऐवज दिनांक-05.05.2018 पर्यंत दाखल करणे आवश्यक होते परंतु तक्रारकर्तीने दिनांक-14.06.2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेत विमा दावा निश्चीतीसाठी दस्तऐवज दाखल केले म्हणजेच अपघाती मृत्यू नंतर जवळपास 100 दिवस उशिराने दाखल केलेले आहेत असे दिसून येते. तक्रारकर्तीने आपले शपथे वरील पुराव्यात असे नमुद केले की, वैयक्तिक अपधात विमा दाव्या संबधात विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी व विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मध्ये Service-Level Agreement(SLA) करण्यात आले होते. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी व विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी तिचे पतीला वैयक्तिक अपघात विम्या संबधी कोणतीही विमा पॉलिसीची प्रत तसेच सर्व्हीस लेव्हल अॅग्रीमेन्टची प्रत दिली नव्हती त्यामुळे तिला सर्व्हीस लेव्हल अॅग्रीमेन्टची माहिती नव्हती. विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी आपले लेखी उत्तरात अपघात झालयाचे दिनांका पासून 60 दिवसाच्या आत सदर क्लेमची कागदपत्र विरुध्दपक्ष यांचे कडे सादर केलया वरच 100 टक्के क्लेमसाठी पात्र ठरता परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी त्यांना अशा प्रकारच्या अटी व शर्तीचे कोणतेही कागदपत्र दिले नव्हते वा त्यांना या बाबत कोणतीही माहिती नव्हती.
12. जिल्हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्ती ही एक विधवा असून ती एक घरकाम करणारी स्त्री आहे. पतीचे मृत्यू नंतर ती दुःखातून सावरल्या नंतर तिने विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेत जाऊन विमा दाव्या संबधी प्रक्रिया सुरु केली. वस्तुतः कर्मचा-याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचे कायदेशीर वारसदारांना विमा रक्कम मिळावी या उदात्त हेतूने ही कल्याणकारी योजना विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक, गोंदीया यांचे अधिपत्या खाली कार्यरत पोलीस कर्मचा-यांसाठी राबविण्यात आलेली आहे.
या संदर्भात जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे खालील मा.वरिष्ठ न्यायालयाचे निकालपत्रावर भिस्त ठेवण्यात येत आहे-
I) I (2009) CPJ 147
Hon’ble Maharashtra State Commission,Mumbai-“ National Insurance Co.Ltd.-V/s- Asha Jamdar Prasad”
प्रस्तुत अपिलीय प्रकरणात आदरणीय राज्य ग्राहक आयोग,महाराष्ट्र मुंबई यांनी विमा दावा हा विलंबाचे कारणावरुन फेटाळण्यात आला परंतु विमा दावा दाखल करण्यास जो विलंब झालेला आहे, तो का झाला? हे विशद करण्याची संधी मृतकाचे विधवा पत्नीला दिल्या गेलेली
नाही आणि तसेही मृतकाचे मृत्यूचे धक्क्यातून सावरल्या नंतर त्याचे विधवा पत्नीने विमा दावा सादर केल्याचे कारण दर्शवून विमा कंपनीचे अपिल खारीज करुन मंचाचा विमा दावा देण्याचा निर्णय कायम ठेवला.
II) I (2013) CPJ 115
Hon’ble Chhattisgarh State ConsumerDisputes Redressal Commission Raipur- “Ramayanvati –V/s-Oriential Insurance
Company Ltd.”
उपरोक्त नमुद प्रकरणातील विमा क्लेम हा ग्रुप जनता पर्सनल अक्सीडेंट पॉलिसी अंतर्गत मृत्यू दाव्या संबधीचा आहे. विमा क्लेम हा घटना घडल्या पासून पंधरा दिवसाचे आत करणे आवश्यक होते. परंतु तो सादर करण्यासाठी 03 वर्षाचा उशिर झाल्यामुळे पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झालयाने तक्रार खारीज करण्यात आली होती म्हणून अपिल करण्यात आले होते. अपिलीय आदेशात मा.आयोगाने सदर तक्रारकर्ती ही अशिक्षीत स्त्री असून, पॉलिसीचे अस्तित्वाबद्दल तिला कल्पना नव्हती. तक्रारकर्तीचे मृतक पती ज्या ठिकाणी नौकरीस होते तेथील मालकाने पॉलिसीबद्दल माहिती देणे बंधनकारक होते असे नमुद केलेले आहे.
आमचे समोरील हातातील प्रकरणात तक्रारकर्ती ही एक घरकाम करणारी स्त्री असून पतीचे अपघाती मृत्यूचे दुःखातून सावरलया नंतर दसतऐवजाची जुळवाजुळव करुन तिने अपघाती घटनेच्या दिनांका पासून 60 दिवसाचे आत विम्या संबधी आवश्यक दस्तऐवज दाखल न करता 100 दिवस उशिराने दाखल केलेले आहेत. तक्रारकर्तीचे पुराव्या मध्ये असेही म्हणणे आहे की, तिचे पतीला विमा पॉलिसीची प्रत देण्यात आली नव्हती तसेच विमा कराराची प्रत सुध्दा तिला देण्यात आली नव्हती त्यामुळे तिला विमा अटी व शर्तीची माहिती नव्हती या तिचे म्हणण्यात जिल्हा ग्राहक आयोगास तथ्य दिसून येते आणि उपरोक्त नमुद मा. वरिष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे हातातील प्रकरणात लागू होतात असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
13. तक्रारकर्तीने तक्रारी मध्ये दसतऐवजाच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केलेल्या आहेत तयामध्ये तिचे पती श्री गजानन रामचंद्र ठाकरे यांचे अपघाती मृत्यू संबधात जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांचा दिनांक-06.03.2018 रोजीचा शवविच्छेदन अहवाल जयामध्ये मृत्यूचे कारण “HEAD INJURY ASSOCIATED WITH FRACTURE OF RIGHT HUMERUS AND RIGHT TIBLA” असे स्पष्टपणे नमुद केलेले आहे. पोलीस स्टेशन गोरेगाव, जिल्हा गोंदीया यांनी तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्यू बाबत नोंदविलेली दिनांक-05.03.2018 रोजीची एफ.आय.आर.ची प्रत दाखल केलेली असून सदर एफ.आय.आर. मध्ये अज्ञात वाहन चालकाने मृतकास धडक दिल्याचे नमुद आहे. पोलीस स्टेशन भंडारा यांचा मरणान्वेषन अहवाल तसेच मृतकाचे पोलीस विभागातील ओळखपत्राची छायाप्रत, मृतकाचे वाहन चालक परवान्याची प्रत मृतकाचे विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेतील खाते उता-याची दिनांक-01.10.2017 ते दिनांक-31.03.2018 कालावधीची प्रत अशा दस्तऐवजाचा समावेश आहे. या सर्व दसतऐवजा वरुन सिध्द होते की, मृतकाचा मृत्यू हा अपघाती झालेला आहे.
14. विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंकेच्या लेखी उत्तरा प्रमाणे तक्रारकर्तीने आवश्यक दसतऐवज हे दिनांक-14.06.2018 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंके मध्ये दाखल केले होते व विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंकेनी तक्रारकर्ती कडून प्राप्त झालेले दसतऐवज त्वरीत विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी कडे पाठविले होते परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा हा Service-Level Agreement(SLA) प्रमाणे दस्तऐवज दाखल केले नसल्याचे कारणा वरुन विमा दावा नामंजूर केला. यावरुन ही बाब सिध्द होते की, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्यूचे आवश्यक दसतऐवज मिळालेले आहेत परंतु Service-Level Agreement(SLA) प्रमाणे अपघाती मृत्यू नंतर 60 दिवसात न मिळता ते उशिराने 100 दिवसा नंतर मिळालेले आहेत परंतु एका तेवढयाच कारणासाठी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने विमा दाव्या रकमे पासून वंचीत ठेवणे ही विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. जिल्हा ग्राहक आयोगास या प्रकरणात आणखी एक बाब प्रकर्षाने दिसून येते की, तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधीचा विमा दावा नामंजूर केल्याचे पत्र दिले नसलयाची बाब विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनीने आपले लेखी उत्तरा मधून मान्य केलेली आहे आणि ही त्यांनी तक्रारकर्तीला दिलेली दोषपूर्ण सेवा आहे.
15. अशा परिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी मर्यादित तर्फे विभागीय व्यवस्थापक, रिजजन ऑफीस, नागपूर यांनी तक्रारकर्तीला तिचे पती श्री गजानन रामचंद्र ठाकरे यांचे अपघाती मृत्यू संबधात दिनांक-15.04.2017 जारी विरुध्दपक्ष क्रं 2 अॅक्सीस बॅंक शाखा गोंदीया यांना दिलेल्या “CREDIT CARD PACKAGE INSURANCE POLICY NO.-99000046171300000003 अनुसार तसेच तक्रारकर्तीचे पती यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मधील खाते क्रमांक-913010047419881 तसेच डेबीट/एटीएम कार्ड क्रं-5296150008190220 अनुसार विमा रक्कम रुपये-30,00,000/- अदा करावी आणि सदर विमा रकमेवर तक्रारकर्तीने दिनांक-14.06.2018 रोजी विमा दाव्या संबधात दस्तऐवजाची पुर्तता केलेली असल्यामुळे पुर्तता केल्याचे दिनांका पासून विमा दावा निश्चीतीसाठी 30 दिवसांचा कालावधी सोडलया नंतर म्हणजे दिनांक-14.07.2018 पासून ते रकमेच्या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द. शे.-9 टक्के दराने व्याज मंजूर करणे त्याच बरोबर तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड यांनी दिलेल्या दोषपूर्ण सेवेमुळे झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 2 एक्सीस बॅंक लिमिटेड, गोंदीया तसेच विरुध्दपक्ष क्रं 3 पोलीस अधिक्षक, गोंदीया यांचा विमा दावा निश्चीती संबधात कोणताही संबध नसल्याने व त्यांनी तक्रारकर्तीला योग्य प्रकारची सेवा दिलेली असल्याने तसेच ते औपचारीक प्रतीपक्ष असल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
16. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्ती श्रीमती मिनाक्षी गजानन ठाकरे यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, नागपूर यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, नागपूर यांना आदेशित करण्यात येते की,त्यांनी विरुध्दपक्ष क्रं 2 एक्सीस बॅंक लिमिटेड शाखा गोंदीया यांना जारी केलेल्या “CREDIT CARD PACKAGE INSURANCE POLICY NO.-99000046171300000003 पॉलिसी प्रमाणे तसेच तक्रारकर्तीचे मृतक पती श्री गजानन रामचंद्र ठाकरे यांचे विरुध्दपक्ष क्रं 2 बॅंके मधील खाते क्रमांक-913010047419881 तसेच डेबीट/एटीएम कार्ड क्रं-5296150008190220 पमाणे विमा रक्कम रुपये-30,00,000/- (अक्षरी रुपये तीस लक्ष फक्त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर दिनांक-14.07.2018 पासून ते रकमेच्या प्रतयक्ष अदायगी पावेतो द.सा.द. शे.-9 टक्के दराने व्याज तक्रारकर्तीला दयावे.
- तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल भरपाई म्हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, नागपूर तक्रारकर्तीला अदा कराव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं-2 एक्सीस बॅंक लिमिटेड शाखा गोंदीया तर्फे शाखा व्यवस्थापक यांचा विमा दावा निश्चीती संबधात कोणताही संबध नसल्याने व त्यांनी तक्रारकर्तीला योग्य प्रकारची सेवा दिलेली असल्याने तसेच ते औपचारीक प्रति̍ࠀपक्ष असल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं-3 पोलीस अधिक्षक, गोंदीया यांचा विमा दावा निश्चीती संबधात कोणताही संबध नसल्याने व त्यांनी तक्रारकर्तीला योग्य प्रकारची सेवा दिलेली असल्याने तसेच ते औपचारीक प्रतिपक्ष असल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- सदर अंतीम आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 दि न्यु इंडीया एश्योरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, नागपूर यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त संच त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.