जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 119/2021. तक्रार दाखल दिनांक : 27/05/2021. तक्रार निर्णय दिनांक : 03/06/2022.
कालावधी : 01 वर्षे 00 महिने 07 दिवस
मुद्रिकाबाई बाबुराव माने, वय 57 वर्षे,
व्यवसाय : घरकाम व शेती, रा. रामतिर्थ, ता. निलंगा, जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
(1) चेअरमन / सचिव, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी,
मदनसुरी, ता. निलंगा, जि. लातूर.
(2) मुख्य व्यवस्थापक, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
लातूर, कर्ज व नियंत्रण विभाग, मुख्य कार्यालय,
सातमजली इमारत, मेन रोड, लातूर, ता. जि. लातूर.
(3) व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- ए.एम.के. पटेल
विरुध्द पक्ष क्र.1 यांचेकरिता विधिज्ञ :- विक्रम बी. माने
विरुध्द पक्ष क्र.2 अनुपस्थित / एकतर्फा
विरुध्द पक्ष क्र.3 यांचेकरिता विधिज्ञ :- एस.एम. डोईजोडे
आदेश
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या तक्रारीचा आशय असा की, त्यांचे पती विरुध्द पक्ष क्र.1 (यापुढे "सोसायटी") यांचे कर्जदार सभासद होते. सोसायटीने सर्व कर्जदार सभासदांचा विमा हप्ता स्वीकारुन विरुध्द पक्ष क्र.2 (यापुढे "जिल्हा बँक") यांच्याकडे जमा केला. त्याप्रमाणे तक्रारकर्ती यांचे पतीकडून दि.27/2/2017 रोजी रु.150/- स्वीकारले. जिल्हा बँकेने विरुध्द पक्ष क्र.3 (यापुढे "विमा कंपनी") यांच्याकडे विमा हप्ता जमा करुन विमापत्र घेतले आणि त्याचा क्रमांक 164400/47/2018/48 आहे. विमा कालावधी दि.30/6/2017 ते 29/6/2020 होता. विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास रु.2,00,000/- देण्याची जोखीम विमा कंपनीने स्वीकारलेली होती.
(2) तक्रारकर्ती यांचे पुढे कथन आहे की, दि.18/11/2017 रोजी त्यांचे पती बसद्वारे प्रवास करीत असताना बस व ट्रकचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेबाबत पोलीस ठाणे, किल्लारी, जि. लातूर येथे गुन्हा क्र.14/2017 नोंदविण्यात आला. त्यानंतर सोसायटी, बँक व विमा कंपनी यांच्याकडे रितसर सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा दावा प्रपत्र सादर केले. तसेच विमा कंपनीने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता केली. परंतु विमा कंपनीने विमा दावा मंजूर करण्यास टाळाटाळ केलेली असून दावा प्रलंबीत ठेवला. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने विमापत्राप्रमाणे रु.2,00,000/- विमा रक्कम; शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.15,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- व्याजासह देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केली आहे.
(3) प्रस्तुत प्रकरणामध्ये सोसायटी उपस्थित झाली; परंतु त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द विना लेखी निवेदनपत्र आदेश करण्यात आले.
(4) प्रस्तुत प्रकरणामध्ये जिल्हा बँक उपस्थित झालेली नाही आणि त्यांनी लेखी निवेदनपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा सुनावणीचे आदेश करण्यात आले.
(5) विमा कंपनीने लेखी निवेदनपत्र सादर केले आहे. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ती यांचा विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर कागदपत्रांची छाननी केली असता अपघातसमयी मयताचे वय 75 वर्षे असल्याचे आढळून आले. विमापत्रातील अटी व शर्तीनुसार वयाची अट 70 वर्षे आहे. विमा दावा पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये बसत नसल्यामुळे विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना दि.17/4/2018 रोजी विमा दावा रद्द केल्याबाबत नोंदणीकृत डाकेद्वारे कळविले; परंतु डाक कार्यालयाच्या शे-यासह ते पत्र परत प्राप्त झाले. त्याबाबत जिल्हा बँकेच्या मदनसुरी शाखेस पत्राद्वारे कळविले. त्यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी केलेली नाही. अंतिमत: ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती केलेली आहे.
(6) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? होय.
(2) मुद्दा क्र.1 च्या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
असल्यास किती ? अंतिम आदेशाप्रमाणे
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(7) मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र.1 ते 3 एकमेकांना परस्परपूरक असल्यामुळे त्यांचे एकत्रित विवेचन करण्यात येते. विमापत्राचे अवलोकन केले असता जिल्हा बँकेने विमा कंपनीकडे जनता वैयक्तिक अपघात (गट) विमा विमापत्र क्र.164400/47/2018/48 अन्वये 116310 व्यक्तींना प्रत्येकी रु.2,00,000/- करिता विमा संरक्षण दिल्याचे निदर्शनास येते. आकस्मित मृत्युची खबर, मरणोत्तर पंचनामा, प्रेतासोबत पाठविण्याचा पोलीस अहवाल, पोलीस घटनास्थळ पंचनामा व शवचिकित्सा अहवाल इ. कागदपत्रे पाहता बाबुराव विश्वंभर माने यांचा वाहन अपघात झाल्याचे व रस्ता अपघातामध्ये जखमी होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते.
(8) विमा कंपनीद्वारे दि. 17/4/2018 रोजी तक्रारकर्ती यांना पाठविलेले पत्र पाहता मयत व्यक्तीचे वय 75 असल्याचे व विमापत्राच्या अटी व शर्तीनुसार विमाधारकाचे वय 70 वर्षाच्या मर्यादेमध्ये असणे आवश्यक असल्याचे नमूद करुन विमा दावा नामंजूर केल्याचे निदर्शनास येते. त्या पत्रामध्ये बाबुराव विश्वंभर माने यांच्या गट जनता वैयक्तिक अपघात दाव्याच्या अनुषंगाने दावा क्रमांक : 164400/47/2018/000033 व पॉलिसी क्र.164400/47/2018/48 उल्लेख आढळतो. मयत बाबुराव विश्वंभर माने यांच्या जनता वैयक्तिक अपघात विमा दाव्यासंबंधी विमा कंपनीची स्वीकृती / कबुली (Admission) तथ्ये पाहता विमा कंपनीने मयत बाबुराव विश्वंभर माने यांना गट जनता वैयक्तिक अपघात विमापत्राच्या अनुषंगाने विमा संरक्षण दिल्याचे व तक्रारकर्ती यांनी विमा दावा सादर केल्याचे सिध्द होते.
(9) विमा दावा नामंजूर करण्याच्या कृत्याचे समर्थन करताना विमा कंपनीचा बचाव आहे की, विमापत्रातील अटी व शर्तीनुसार वयाची अट 70 वर्षे आहे आणि अपघातसमयी मयताचे वय 75 वर्षे असल्याचे आढळून आल्यामुळे व विमा दावा पॉलिसीच्या अटी व शर्तीमध्ये बसत नसल्यामुळे विमा दावा नामंजूर केला आहे.
(10) विमा कंपनीतर्फे विधिज्ञांनी पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवाल यांचा आधार घेऊन मयत बाबुराव विश्वंभर माने यांचे वय 75 असल्याचे निवेदन केले. उलटपक्षी, तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांनी मयत बाबुराव यांचे वय 70 पेक्षा कमी असल्याचे निवेदन केले.
(11) विमा कंपनीने जनता व्यक्तिगत विमा अपघात विमापत्राच्या अटी व शर्तीचे पत्रक दाखल केले आहे. ते पत्रक स्वतंत्र कागदपत्र असून विमापत्र क्र.164400/47/2018/48 याच्याशी संलग्न असल्याचे दिसून येत नाही. त्या पत्रामध्ये विमा रक्कम रु.25,000/- ते रु.5,00,000/- असा हस्तलिखीत नमूद केलेले दिसते. परंतु प्रस्तुत प्रकरणामध्ये रु.2,00,000/- चे विमा संरक्षण आहे. त्या पत्रकावर विमापत्राचा क्रमांक नमूद नाही. अशा स्थितीमध्ये अटी व शर्तीचे पत्रक विमापत्राचा अविभाज्य घटक असल्याचे ग्राह्य धरता येणार नाही.
(12) काही क्षणाकरिता विमा कंपनीच्या अटी व शर्तीच्या पत्रकाप्रमाणे विमाधारकाचे वय 70 वर्षाच्या आत असावयास पाहिजे, ही अट मान्य केली तरी मयत बाबुराव यांचे वय 75 असल्याचे सिध्द करण्यासाठी विमा कंपनीने ज्या कागदपत्रांचा आधार घेतला आहे, त्या पोलीस कागदपत्रे व शवचिकित्सा अहवालामध्ये नमूद केलेले वय ऐकीव माहितीच्या आधारे नमूद केलेले दिसते. तक्रारकर्ता यांनी मयत बाबुराव यांचे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र दाखल केले असून ज्यामध्ये दि.1/1/1994 रोजी त्यांचे वय 30 वर्षे असल्याचे आढळते. उक्त स्थितीमध्ये मयत बाबुराव यांचे मृत्यूसमयी 70 पेक्षा अधिक असल्याचा उचित व कायदेशीर पुरावा दिसून येत नाही.
(13) उक्त विवेचनाअंती विमा कंपनीने तक्रारकर्ती यांचा विमा दावा आयोग्य व अनुचित कारणास्तव नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ती ह्या रु.2,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारकर्ती यांनी अपघात तारखेपासून विमा रक्कम द.सा.द.शे. 12 टक्के व्याज दराने मिळावी, अशी विनंती केलेली आहे. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.17/4/2018 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विमा कंपनीस आदेश करणे न्यायोचित होईल.
(14) तक्रारकर्ती यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.15,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करताना त्या–त्या परिस्थितीवर गृहीतक आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ती यांना विमा रक्कम मिळविण्याकरिता पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ती यांना मानसिक व शारीरिक त्रास होणे नैसर्गिक व स्वाभाविक आहे. तसेच विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रक्कम न दिल्यामुळे जिल्हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले, ही बाब स्पष्ट आहे. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला व सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्यास तक्रारकर्ती पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत येत आहोत.
(15) वादविषयाच्या अनुषंगाने जिल्हा बँक व सोसायटी यांनी तक्रारकर्ती यांना सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे तक्रारकर्ती यांची त्यांच्याविरुध्द अनुतोषाची मागणी मान्य करता येणार नाही.
(16) उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
ग्राहक तक्रार क्र. 119/2021.
आदेश
(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- विमा रक्कम द्यावी.
तसेच, विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना रु.2,00,000/- रकमेवर दि.17/4/2018 पासून संपूर्ण रक्कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज द्यावे. (3) विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने तक्रारकर्ती यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.3 विमा कंपनीने प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-