जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 302/2019. तक्रार दाखल दिनांक : 20/09/2019. तक्रार आदेश दिनांक : 04/02/2021. कालावधी: 01 वर्षे 04 महिने 15 दिवस
अजयकुमार अशोकराव सावंत, वय सज्ञान, व्यवसाय : शेती,
रा. बावी (वडगांव), ता.जि. उस्मानाबाद, ह.मु. पाटील अॅक्सीडेंट
हॉस्पिटलजवळ, नाईकवाडी नगर, समता कॉलनी, उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि.,
विभागीय कार्यालय, उस्मानाबाद.
(2) उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण
कं.लि., उपविभाग (ग्रामीण), उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- देविदास वडगांवकर
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेतर्फे विधिज्ञ :- विनायक बा. देशमुख (बावीकर)
आदेश
श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य यांचे द्वारे :-
1. तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी मौजे बावी (वडगांव), ता.जि. उस्मानाबाद येथील गट क्र.202 मधील क्षेत्र 40 आर. शेतजमीन महंमद सादिक अब्दूल गफार कुरेशी व महंमद इसाक अब्दूल गफार कुरेश यांच्याकडून नोंदणीकृत खरेदीखत क्र.1896/7/26 नुसार दि.21/4/2015 रोजी खरेदी केली. शेतजमिनीमध्ये असणारे स्वतंत्र बोअरवेल व त्याच्या विद्युत पुरवठयासाठी भरलेले डिमांड तक्रारकर्ता यांच्या हक्कामध्ये खरेदी दिले आणि तशी नोंद खरेदी दस्तामध्ये आहे. विद्युत पुरवठा घेण्याच्या पावती क्रमांक 3227768, दि.23/8/2012 अन्वये डिमांड रु.4,950/- भरणा केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे लाभार्थी नात्याने ग्राहक आहेत.
2. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, खरेदीखत झाल्यानंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयाकडे वारंवार संपर्क साधून डिमांडप्रमाणे विद्युत पुरवठा देण्याची मागणी केली. परंतु विरुध्द पक्ष यांनी उडवाउडवीची व टाळाटाळीची उत्तरे दिली. शिक्षणानंतर नोकरी व विवाह यामुळे विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयाशी संपर्क करुन विद्युत पुरवठ्याची लेखी स्वरुपामध्ये मागणी करता आली नाही. दि.24/4/2019 रोजी त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 यांच्या कार्यालयाकडे लेखी अर्ज देऊन विद्युत पुरवठ्याची मागणी केली. तत्कालीन कार्यकारी अभियंत्याची त्यांनी भेट घेतली. सन 2012 नंतर तक्रारकर्ता यांच्या गावामध्ये व परिसरात अनेकांना विद्युत पुरवठा दिलेला आहे; परंतु तक्रारकर्ता यांना विद्युत पुरवठा दिलेला नाही.
3. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांच्या बोअरवेलला भरपूर पाणी असूनही शेतीतून उत्पन्न काढण्याकरिता त्याचा उपयोग झाला नाही आणि त्या नुकसानीकरिता विरुध्द पक्ष जबाबदार आहेत. शेतजमीन खरेदीपूर्वी महंमद सादिक अब्दूल गफार यांनी डिमांड भरल्यानंतर विद्युत पुरवठा मिळण्याकरिता वारंवार पाठपुरावा केला, असे त्यांनी तक्रारकर्ता सांगितले होते. विरुध्द पक्ष यांनी विद्युत पुरवठा न दिल्यामुळे दि.20/4/2019 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांना लेखी अर्ज दिला. तसेच दि.2/8/2019 रोजी विधिज्ञांमार्फत नोटीस पाठवून विद्युत पुरवठा व नुकसान भरपाईची मागणी केली असता नोटीस प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही.
4. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने विद्युत पुरवठा देण्याचा व मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- नुकसान भरपाईसह रु.20,000/- खर्च देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
5. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांच्या कथनानुसार तक्रारकर्ता यांना त्यांनी विद्युत पुरवठा दिलेला नसल्यामुळे तक्रारकर्ता त्यांचे ‘ग्राहक’ होऊ शकत नाहीत. तसेच तक्रारकर्ता हे लाभार्थी ग्राहक असल्याचे त्यांनी अमान्य केले आहे. महमद सादीक अब्दूल गफार कुरेशी यांनी बोअरवेलकरिता विद्युत पुरवठा घेण्यासाठी त्यांच्याकडून पावती क्र.3227768, दि.23/8/2012 अन्वये डिमांड रु.4,950/- भरणा केला. बोअरवेलकरिता विद्युत पुरवठा देण्याकरिता कंत्राटदार गेले असता महमद सादीक अब्दूल गफार कुरेशी उपस्थित नसल्यामुळे विद्युत पुरवठा देता आला नाही. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्या कार्यालयाकडे संपर्क करुन विद्युत पुरवठ्याची मागणी केली असली तरी डिमांडशी त्यांचा संबंध नाही आणि त्यांना अधिकार नाही. तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. शेवटी तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
6. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन व उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होत असून त्यांची सकारण उत्तरे त्यापुढे दिलेल्या कारणमीमांसेकरिता देत आहोत.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे ‘ग्राहक’ आहेत काय ? होय.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये
त्रुटी केल्याचे सिध्द होते काय ? होय.
3. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय (अंशत:)
4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
7. मुद्दा क्र.1 :- विरुध्द पक्ष यांनी हरकत घेतली आहे की, त्यांनी तक्रारकर्ता यांना विद्युत पुरवठा दिलेला नसल्यामुळे तक्रारकर्ता त्यांचे ‘ग्राहक’ होऊ शकत नाहीत. शिवाय तक्रारकर्ता हे लाभार्थी ग्राहक असल्याचे त्यांनी अमान्य केले आहे. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, शेतजमिनीमध्ये असणारे स्वतंत्र बोअरवेल व त्याच्या विद्युत पुरवठयासाठी भरलेले डिमांड तक्रारकर्ता यांच्या हक्कामध्ये खरेदी दिले आणि तशी नोंद खरेदी दस्तामध्ये आहे. विद्युत पुरवठा घेण्याच्या पावती क्रमांक 3227768, दि.23/8/2012 अन्वये डिमांड रु.4,950/- भरणा केलेली असल्यामुळे ते विरुध्द पक्ष यांचे लाभार्थी नात्याने ग्राहक आहेत.
8. उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व युक्तिवाद पाहता; तसेच दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी महंमद सादीक अब्दुल गफार कुरेशी व महंमद इरशाद अब्दुल गफार कुरेशी यांच्याकडून शेतजमीन खरेदी करण्यापूर्वी महंमद सादीक अब्दुल गफार कुरेशी यांनी विद्युत पुरवठा मिळण्याकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडे रु.4,950/- डिमांड रक्कम भरणा केलेली आहे, याबद्दल उभयतांमध्ये विवाद नाही. शेतजमिनीमध्ये असणारे बोअरवेल व भरणा केलेल्या डिमांडचा उल्लेख खरेदीखतामध्ये आहे. खरेदीखत करण्यापूर्वी डिमांड रक्कम भरलेली असल्यामुळे त्यावर तक्रारकर्ता यांचे नांव दिसून येत नाही. असे दिसते की, विरुध्द पक्ष यांनी दि.23/9/2012 रोजी डिमांड रक्कम स्वीकारल्यानंतर शेतजमिनीचे दि.21/4/2015 रोजी खरेदीखत होईपर्यंत विद्युत पुरवठा दिलेला नव्हता.
9. कोणताही विद्युत पुरवठा स्थळ व व्यक्तीशी संबंधीत असतो. प्रस्तुत प्रकरणामध्ये स्थळ एकच असून मालकीहक्काने व्यक्ती बदललेली आहे. शेतजमीन मालकीहक्काने तक्रारकर्ता यांच्याकडे हस्तांतरीत झालेली आहे आणि शेतजमिनीमध्ये विद्युत पुरवठा देण्याकरिता महंमद सादीक अब्दुल गफार कुरेशी यांची हरकत आहे, असे दिसून येत नाही. ज्या स्थळी विद्युत पुरवठा द्यावयाचा आहे, त्या स्थळाची मालकी तक्रारकर्ता यांच्याकडे आहे. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता हे विद्युत पुरवठा मिळण्याकरिता लाभार्थी ठरतात आणि ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2(7) अन्वये ‘ग्राहक’ संज्ञेच्या कक्षेमध्ये येतात. उपरोक्त विवेचनाकरिता आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
10. मुद्दा क्र.2 ते 4 :- महंमद सादीक अब्दूल गफार कुरेशी यांनी बोअरवेलकरिता विद्युत पुरवठा मिळण्यासाठी पावती क्र.3227568, दि.23/8/2012 रोजी डिमांड रु.4,950/- भरणा केले, हे विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. विरुध्द पक्ष यांचे कथन आहे की, विद्युत पुरवठा देण्याकरिता कंत्राटदार गेले असता महमद सादीक अब्दूल गफार कुरेशी उपस्थित नसल्यामुळे विद्युत पुरवठा देता आला नाही. प्रस्तुत कथनापृष्ठयर्थ विरुध्द पक्ष यांनी पुरावा किंवा कंत्राटदाराचे शपथपत्र दाखल केलेले नाही. विरुध्द पक्ष यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांनी विद्युत पुरवठ्याची मागणी केली असली तरी डिमांडशी त्यांचा संबंध नाही आणि त्यांना अधिकार नाही. वास्तविक पाहता, महंमद सादीक अब्दूल गफार कुरेशी यांना डिमांड रक्कम परत केलेली आहे, असे विरुध्द पक्ष यांचे कथन नाही. आमच्या मते, ज्या शेतजमिनीमध्ये विद्युत पुरवठा देण्याकरिता डिमांड रक्कम स्वीकारलेली आहे, त्या ठिकाणी विद्युत पुरवठा देणे विरुध्द पक्ष यांची जबाबदारी व कर्तव्य होते. विरुध्द पक्ष यांनी शेतजमिनीमध्ये विद्युत पुरवठा न देऊन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, असे जिल्हा आयोगाचे मत आहे.
11. विरुध्द पक्ष यांनी डिमांड रक्कम स्वीकारल्यानंतर महंमद सादीक अब्दूल गफार कुरेशी यांना किंवा तक्रारकर्ता यांना विद्युत पुरवठा दिलेला नाही. तसेच विद्युत पुरवठा न देण्याचे त्यांचे समर्थन हे पुराव्याअभावी दिसून येते. ज्या शेतजमिनीमध्ये विद्युत पुरवठा द्यावयाचा आहे, त्या शेतजमिनीकरिता विद्युत पुरवठा देण्याकरिता विरुध्द पक्ष यांनी डिमांड रक्कम स्वीकारलेली आहे. अशा स्थितीमध्ये विद्युत पुरवठा देण्याकरिता तक्रारकर्ता यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे स्वीकारुन तक्रारकर्ता यांचे नांवे विद्युत पुरवठा देणे न्यायोचित होईल.
12. तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम ठरविताना काही गृहीत त्या–त्या परिस्थितीवर आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता हे विद्युत पुरवठा मिळविण्याकरिता प्रयत्नशील राहिलेले आहेत. त्याकरिता तक्रारकर्ता यांना स्वत:चे दैनंदीन व्यवहार बाजुला ठेवावे लागले, हे ग्राह्य धरावे लागेल. त्यामुळे तक्रारकर्ता यांना त्रास सहन करावा लागणे स्वाभाविक आहे. तक्रारकर्ता यांची रु.50,000/- नुकसान भरपाईची मागणी असली तरी योग्य विचाराअंती त्याकरिता तक्रारकर्ता रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत.
13. विरुध्द पक्ष यांनी विद्युत पुरवठा न दिल्यामुळे तक्रारकर्ता यांना जिल्हा आयोगापुढे प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला, सहायता, नोटीस खर्च, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती तक्रार खर्चाकरिता तक्रारकर्ता रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
14. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
ग्राहक तक्रार क्र.302/2019.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना विद्युत पुरवठा देण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी आणि त्याकरिता तक्रारकर्ता यांनी सहकार्य करावे.
2. कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीमध्ये विद्युत पुरवठा द्यावा.
3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.3,000/- नुकसान भरपाई द्यावी.
4. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- द्यावेत.
5. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत करावी.
(श्री. किशोर द. वडणे)
(श्री. मुकुंद भ. सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक श. क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-