जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 246/2018. तक्रार दाखल दिनांक : 31/07/2018. तक्रार आदेश दिनांक : 29/01/2021. कालावधी: 02 वर्षे 05 महिने 29 दिवस
साहेबराव सदाशिव साळुंके, वय 65 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. गुजनूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.,
तुळजापूर विभाग, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
(2) उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.,
तुळजापूर विभाग, तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- अनिल डी. पाटील
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ :- विनायक बाबासाहेब देशमुख (बावीकर)
आदेश
श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारे :-
1. तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, मौजे गुजनूर, ता. तुळजापूर येथे त्यांच्या मालकी व कब्जेवहिवाटीची गट क्र.7, क्षेत्र 7 हे. 18 आर. बागायत शेतजमीन आहे. त्या क्षेत्रामध्ये विहीर / बोअरवेलमधून ते शेतीस पाणी पुरवठा करतात. त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून विद्युत पुरवठा घेतला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 593960389434 आहे. सन 2017-2018 मध्ये त्यांनी 2 हेक्टर क्षेत्रामध्ये ऊस लागवड केले. त्याकरिता रु.2,00,000/- खर्च केला. त्यांचे ऊस पीक परिपक्व झालेले होते आणि 2 हेक्टरमध्ये 340 ते 350 टन ऊस उत्पादन अपेक्षीत होते.
2. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांच्या शेतजमिनीतून साळुंके डी.पी. (63 के.व्ही.ए.) कडून येणारी 3 फेज 4 वायर लघुदाब वाहिनीच्या तारांना झोळ होता आणि त्याबाबत विरुध्द पक्ष यांच्या कर्मचा-यांकडे वारंवार तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणा केला.
3. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, दि.2/1/2018 रोजी दुपारी 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास तक्रारकर्ता यांच्या नमूद गट क्रमांकामधील दोन विद्युत खांबामधील विद्युत तारेच्या शॉटसर्कीट घर्षणामुळे तक्रारकर्ता यांच्या ऊस पिकावर पडल्या आणि ऊसाने पेट घेतला. घटनेवेळी प्रत्यक्षदर्शी शेतक-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु संपूर्ण ऊस पीक आगीने वेढले जाऊन जळाले. तक्रारकर्ता यांच्या नुकसानीस विरुध्द पक्ष जबाबदार आहेत आणि विरुध्द पक्ष यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे.
4. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, घटनेनंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्यासह त्यांचे कर्मचारी, नळदुर्ग पोलीस ठाणे, तलाठी, ग्रामसेवक यांना घटनेची माहिती दिली. नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये घटनेची आकस्मात जळीत क्र.1/2018 अन्वये नोंद झाली. तसेच पोलीस यंत्रणेने पंचनामा केला. गावकामगार तलाठी व ग्रामसेवक यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये अंदाजे 350 टन ऊस पिकाचे आठ ते नऊ लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.
5. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उस्मानाबाद यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष निरीक्षण व तपासणी केली आणि अपघाताच्या निष्कर्षाबाबत अभिप्राय दिला आहे. अभिप्रायानुसार विद्युत संचाची योग्य निगा, देखभाल न केल्यामुळे सदरील अपघाताची जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या. यांची असल्याबाबत स्पष्टपणे नमूद आहे.
6. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, ऊस जळीत घटनेनंतर कंचेश्वर शुगर लि. मंगरुळ, ता. तुळजापूर या कारखान्याकडे जळीत ऊस गाळपासाठी पाठविण्यात आला. परंतु जळीत ऊसाचे वजन निम्म्यापेक्षा जास्त वजनाने कमी होऊन 174 टन भरले. तसेच जळीत ऊसाकरिता चालू दरापेक्षा कमी दर दिला. जळीत ऊसाकरिता प्रतिटन रु.2,500/- प्रमाणे रु.3,48,378/- मंजूर करण्यात आले; परंतु त्यातून जळीत कपात शिर्षाखाली रु.77,556/- कपात करुन रु.2,70,822/- तक्रारकर्ता यांना अदा करण्यात आले. वास्तविक तक्रारकर्ता यांचे ऊस पीक हे पूर्ण वाढ झाल्यामुळे 350 टन ऊस उत्पादनानुसार रु.8,75,000/- उत्पन्न मिळाले असते. विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्ता यांचे रु.6,04,178/- चे नुकसान झालेले आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली असता दखल घेतलेली नाही.
7. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी रु.6,00,000/- नुकसान भरपाईसह मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.1,00,000/- व्याजासह देण्याचा आणि रु.5,000/- तक्रार खर्च देण्याचा आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
8. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश विधाने अमान्य केली आहेत. विरुध्द पक्ष यांचे कथन आहे की, त्यांच्या निष्काळजीपणा व हलगर्जीपणामुळे घटना घडलेली नसल्यामुळे व त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नसल्यामुळे घटनेस जबाबदार नाहीत. घटनेचे पंचनामे केल्याबाबत विरुध्द पक्ष यांना माहिती नाही. पंचनाम्याचे अवलोकन केले असता ते दोन महिन्यांनी केल्याचे दिसून येते. पंचनामा तक्रारकर्ता यांच्या सांगण्याप्रमाणे केला असल्यामुळे पुराव्यात गृहीत धरणे योग्य नाही. तसेच तलाठी पंचनामा विरुध्द पक्ष यांच्या अपरोक्ष केला आहे. तलाठी हे विद्युत तज्ञ नसताना घटना शॉर्टसर्कीटमुळे घडल्याचे व ऊस क्षेत्र जळाल्याचा त्यांनी पंचनाम्यामध्ये उल्लेख केला. तसेच विद्युत निरीक्षक, उस्मानाबाद यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष निरीक्षण व तपासणी केली, हे चूक आहे. त्यांनी सविस्तर माहिती अहवाल दिलेला नाही. त्यांच्या पत्रामध्ये वादळी वा-यामुळे तारा एकमेकांच्या संपर्कात येऊन घटना घडल्याचा उल्लेख असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे घटना घडली आहे आणि विरुध्द पक्ष यांनी विद्युत संचाची योग्य निगा देखभाल न केल्यामुळे घडलेली नाही, हे सिध्द होते.
9. विरुध्द पक्ष यांचे पुढे कथन आहे की, ऊस जळाल्यास पाचट जळते आणि संपूर्ण ऊस कधीच जळत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता यांच्या ऊसाच्या वजनामध्ये काहीही फरक झाला नाही. विरुध्द पक्ष यांनी विद्युत वाहिनीची देखभाल करण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या नेमणुका केल्या असून ते वेळोवेळी वाहिनीची देखभाल करीत असताना घटनेपूर्वी व नंतर कोणाचीही तक्रार नाही. तक्रारकर्ता हे त्यांचे ग्राहक नाहीत. शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केलेली आहे.
10. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता; तसेच तक्रारकर्ता यांचे विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अन्वये
'ग्राहक' संज्ञेत येतात काय ? होय.
2. विरुध्द पक्ष यांच्या विद्युत वाहिनीच्या तारांतील घर्षणामुळे होय.
तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळाल्याचे सिध्द होते काय ?
आणि त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना
द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ?
3. तक्रारकर्ता हे नुकसान भरपाईसह तक्रार खर्च मिळण्यास होय (अंशत:)
पात्र आहेत काय ?
4. आदेश काय ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
11. मुद्दा क्र. 1 :- तक्रारकर्ता यांचे नांवे विरुध्द पक्ष यांनी कृषी प्रयोजनार्थ 5 अश्व शक्ती विद्युत पुरवठा दिल्याचे वीज आकार देयकावरुन निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांनी मुद्दा उपस्थित केला की, तक्रारकर्ता यांना विद्युत वाहिनीवरुन विद्युत पुरवठा दिला नसल्यामुळे तक्रारकर्ता हे ‘ग्राहक’ होऊ शकत नाहीत. परंतु वीज आकार देयक पाहता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना कृषी प्रयोजनार्थ विद्युत जोडणी दिलेली आहे आणि तक्रारकर्ता हे वीज सेवा घेत असल्याचे स्पष्ट होते. त्या अनुषंगाने आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
12. मुद्दा क्र. 2 :- तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांच्या ऊस लागवड क्षेत्रातून जाणा-या लघुदाब विद्युत वाहिनीच्या तारा ढिल्या असल्यामुळे झोळ असल्याची माहिती देऊनही तो दुरुस्त करण्यासाठी विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली आणि परिणामी दि.2/1/2018 रोजी दुपारी 1.30 ते 2.00 च्या सुमारास दोन तारांचे एकमेकांस घर्षण होऊन ठिणग्या ऊस पिकावर पडल्या आणि ऊस पीक जळाले. उलटपक्षी तक्रारकर्ता यांची वादकथने अमान्य करताना विरुध्द पक्ष यांनी कथन केले की, विद्युत रोहित्र व तारा व्यवस्थित असल्यामुळे दुरुस्त करण्याचा प्रश्न उदभवत नाही आणि घटना नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेली आहे.
13. असे दिसते की, दि.2/1/2018 रोजी तक्रारकर्ता यांच्या ऊस पीक जळीत घटनेनंतर विद्युत निरीक्षक, पोलीस खाते व महसूल यंत्रणेने पंचनामा केल्याचे आढळते.
14. पोलीस ठाणे, नळदुर्ग यांनी दि.3/1/2018 रोजी घटनास्थळ पंचनामा केलेला दिसतो. पंचनाम्यामध्ये विद्युत तारेच्या शॉटसर्कीटमुळे 2 हेक्टर ऊस जळाल्याचे नमूद केलेले आहे.
15. तलाठी, शहापूर यांनी दि.3/1/2018 रोजी पंचनामा केलेला दिसून येतो. पंचनाम्यामध्ये पूर्ण ऊसाचे क्षेत्र विजेच्या तारेमुळे जळाल्याचे दिसले व 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाले, असा उल्लेख आहे.
16. विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उस्मानाबाद यांनी तक्रारकर्ता यांच्या ऊस जळीत प्रकरणाची चौकशी करुन दि.29/1/2018 रोजी पत्राद्वारे कळविले आहे. त्या पत्रामध्ये अपघाताचा निष्कर्ष खालीलप्रमाणे नमूद आहे.
अपघाताचा निष्कर्ष :-
महावितरण कंपनी यांनी सदर अपघाताची सूचना व अहवाल, अपघातस्थळाचे प्रत्यक्ष केलेले निरीक्षण व तपासणी, नोंदविलेले जबाब, तसेच प्राप्त नमुना-अ यावरुन खालीलप्रमाणे अभिप्राय देत आहोत.
श्री. साहेबराव सदाशिव साळुंके, रा. गुजनूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद यांनी त्यांच्या मौजे गुजनूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील ग.नं. 07 मधील शेतात 02 हेक्टर क्षेत्रात ऊस पीक घेतलेले होते. श्री. साहेबराव सदाशिव साळुंके यांच्या शेतातून महावितरणची साळुंके डीपी (63 केव्हीए) कडून येणारी 3 फेज 4 वायर लघुदाब वाहिनी आहे. सदरील लघुदाब वाहिनीच्या संवाहक तारांना झोळ होता. दि.02.01.2018 रोजी दु. अंदाजे 1 ते 1.30 वा. सुमारास श्री. साहेबराव सदाशिव साळुंके यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या लघुदाब वाहिनीच्या संवाहक तारा झोळ असल्यामुळे व वादळी वा-यामुळे एकमेकांच्या संपर्कात येत होत्या. त्यामुळे तारांमुळे घर्षण होऊन त्याच्या ठिणग्या साहेबराव सदाशिव साळुंके यांच्या शेतातील ऊसावर पडल्या. वितरण पेटीत फ्युजऐवजी जाड तारांचा वापर केल्याने फ्युज वितळले नाहीत व सदर जळीत प्रकरण घडले.
ज्या अर्थी सदर अपघात आपण उपरोक्त विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल व दुरुस्ती न केल्याने व त्या विद्युत अधिनियम, 2003 व केंद्रीय प्राधिकरण (सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे उपाय) विनियम, 2010 मधील विनिमय 12 यांचे उल्लंघन झाले असल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.
त्या अर्थी सदर अपघाताची जबाबदारी म.रा.वि.वि.कं.मर्या. यांची आहे.
17. उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचे ऊस पीक आगीमुळे जळाल्याची बाब स्पष्ट आहे. परंतु वादविषयाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांच्या ऊस पिकास लागणा-या आगीचे कारण काय होते ? हा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे त्यांचे विवेचन होणे आवश्यक ठरते.
18. विद्युत निरीक्षकांच्या निष्कर्षानुसार श्री. साहेबराव सदाशिव साळुंके यांच्या शेतातून महावितरणची साळुंके डीपी (63 केव्हीए) कडून येणारी 3 फेज 4 वायर लघुदाब वाहिनी असून त्या लघुदाब वाहिनीच्या संवाहक तारांना झोळ होता. वादळी वा-यामुळे तारा एकमेकांच्या संपर्कात आल्या आणि तारांमुळे घर्षण होऊन त्याच्या ठिणग्या शेतातील ऊसावर पडल्या. वितरण पेटीत फ्युजऐवजी जाड तारांचा वापर केल्याने फ्युज वितळले नाहीत व सदर जळीत प्रकरण घडले. विद्युत निरीक्षकांच्या अहवालाच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष नमूद करतात की, विद्युत निरीक्षकांनी कोणते निरीक्षणे केले, कोणाचे जबाब घेतले, कोणत्या तारखेस प्रत्यक्ष पाहणी केली, याची सविस्तर माहिती देणे आवश्यक होते आणि सविस्तर अहवाल दिला नाही. मात्र विरुध्द पक्ष यांनी त्यांचे सदर आक्षेप विद्युत निरीक्षक यांच्याकडे नोंदविल्याचे किंवा त्याबाबत काही पत्रव्यवहार केल्याचे आढळत नाही. इतकेच नव्हेतर विद्युत निरीक्षक यांची साक्ष नोंदविण्याचा त्यांना संधी होती. आमच्या मते, अशा दुर्घटनाची चौकशी करण्यासाठी विद्युत निरिक्षक हे सक्षम व तज्ञ व्यक्ती आहेत. उचित पुराव्याअभावी त्यांचा चौकशी अहवाल फेटाळणे किंवा त्यावर अविश्वास करणे उचित होणार नाही, असे आम्हाला वाटते.
19. तक्रारकर्ता यांच्या ऊस जळीत घटनेची विरुध्द पक्ष यांच्यामार्फत चौकशी किंवा पंचनामा केलेला आहे, असे कागदपत्रे अभिलेखावर दाखल नाहीत.
20. तक्रारकर्ता यांच्या ऊस जळीत घटनास्थळाच्या ठिकाणी असणा-या दोन विद्युत खांबामध्ये किती अंतर होते ? खांबावरील विद्युत प्रवाही तारांमध्ये अंतर किती होते ? याचे विरुध्द पक्ष यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. दोन खांबातील अंतर व तारांमधील अंतर यासाठी कायद्याने कोणते निकष ठरवून दिलेले आहेत, याचाही ऊहापोह केलेला नाही. विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श न होण्यासाठी लाकडी काठी किंवा पी.व्ही.सी. पाईपचा वापर केलेला काय किंवा कसे, असा खुलासा केलेला नाही. विद्युत निरीक्षकांचा निष्कर्ष पाहता लघुदाब वाहिनीच्या संवाहक तारांमध्ये झोळ असल्यामुळे तारा एकमेकांच्या संपर्कात येत होत्या. अशा स्थितीमध्ये वा-यामुळे झोळ असणा-या विद्युतप्रवाही तारांचा एकमेकांशी स्पर्श झाल्यास ठिणग्या उडणे स्वाभाविक आहे.
21. विद्युत वितरण करण्यासाठी उभारलेले उपरी तारमार्ग, विद्युत खांब व विद्युत रोहित्र यास संलग्न विद्युत संच मांडणीची वेळोवेळी आवश्यक देखभाल, दुरुस्ती व ते सुरक्षीत ठेवणे ही विरुध्द पक्ष यांची जबाबदारी आहे. विद्युत दुर्घटना घडते, तेव्हा मानवी चुका, निकृष्ठ देखभाल, विद्युत उपकरणांची चूक मांडणी, अप्रशिक्षीत कर्मचारी वर्ग, त्यांच्यातील समन्वय इ. कारणे असू शकतात.
22. दोन खांबातील विद्युत तारा ढिल्या असल्यामुळे विद्युत तारांमध्ये झोळ निर्माण होऊ शकतो. विद्युतभारीत तारा एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर आगीच्या ठिणग्या पडणे स्वाभाविक बाब आहे. विद्युत निरीक्षकांचा निष्कर्ष पाहता विद्युतभारीत तारांच्या घर्षनामुळे निर्माण झालेल्या ठिणग्या ऊस पिकावर पडून ऊस पीक जळाल्याचे आढळते. विद्युत तारांमुळे घडलेल्या अपघाताच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. वरील विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
23. मुद्दा क्र. 3 :- तक्रारकर्ता यांनी जळीत ऊस पिकाकरिता रु.6,00,000/- नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केली आहे. तक्रारकर्ता यांनी त्याकरिता असे स्पष्टीकरण दिले आहे की, जळीत ऊस गाळपासाठी कंचेश्वर शुगर लि. मंगरुळ कारखान्याकडे पाठविण्यात आला असता जळीत ऊसाचे वजन निम्म्यापेक्षा जास्त वजनाने कमी होऊन 174 टन भरले. तसेच जळीत ऊसाकरिता चालू दरापेक्षा कमी दर दिला. जळीत ऊसाकरिता प्रतिटन रु.2,500/- प्रमाणे रु.3,48,378/- मंजूर करण्यात आले; परंतु त्यातून जळीत कपात शिर्षाखाली रु.77,556/- कपात करुन रु.2,70,822/- तक्रारकर्ता यांना अदा करण्यात आले. तक्रारकर्ता यांचे ऊस पीक हे पूर्ण वाढ झाल्यामुळे 350 टन ऊस उत्पादनानुसार रु.8,75,000/- उत्पन्न मिळाले असते. विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्ता यांचे रु.6,04,178/- चे नुकसान झाले. उलटपक्षी विरुध्द पक्ष यांनी कथन केले की, तक्रारकर्ता यांच्या ऊस पिकाचे पाचट जळाले असून संपूर्ण ऊस कधीच जळत नाही आणि त्यामुळे ऊस वजनामध्ये फरक झाला नाही.
24. अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता कंचेश्वर शुगर लि. कारखान्याने विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या पत्रामध्ये एकूण 177.189 टन ऊसापैकी चांगला ऊस 19.077 व जळीत ऊस 155.112 टन नमूद करुन चांगल्या ऊसाकरिता रु.2,000/- व जळीत ऊसाकरिता रु.1,500/- दर दिला, असे आढळते. तसेच ऊस खरेदी देयक पाहता जळीत कपात शिर्षाखाली रु.77,556/- कपात केल्याचे आढळते. यावरुन तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळाल्यामुळे रु.77,556/- चे आर्थिक नुकसान झाले, हे स्पष्ट होते.
25. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, जळालेल्या ऊसाचे वजन निम्म्यापेक्षा जास्तीने कमी होऊन 174 टन वजन भरले. त्या अनुषंगाने प्रश्न निर्माण होतो की, ऊस पीक जळाल्यामुळे त्याच्या वजनामध्ये तफावत किंवा घट येऊ शकते काय ? हे सत्य आहे की, ऊसामध्ये द्रव स्वरुपात शर्करायुक्त रस असतो. आगीमध्ये ऊस जळाल्यानंतर ऊसातील शर्करायुक्त रसाचे बाष्पीभवन होऊ शकते काय किंवा निश्चित किती स्वरुपात वजनामध्ये तफावत येईल, हे शास्त्रीयदृष्टया पुराव्याद्वारे स्पष्ट होत नाही.
26. तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.1,00,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम ठरविताना काही गृहीत त्या–त्या परिस्थितीवर आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता हे व्यवसायाने शेतकरी आहेत. ऊस जळीत घटनेनंतर तक्रारकर्ता यांना स्वत:चे दैनंदीन व्यवहार बाजुला ठेवून शासकीय यंत्रणाकडे जावे लागले. तसेच नुकसान भरपाई मिळविण्याकरिता करावा लागलेला पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना त्रास सहन करावा लागणे स्वाभाविक आहे. तक्रारकर्ता यांची रु.1,00,000/- नुकसान भरपाईची मागणी असली तरी योग्य विचाराअंती त्याकरिता तक्रारकर्ता रु.10,000/- मिळण्यास पात्र आहेत.
26. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई न दिल्यामुळे तक्रारकर्ता यांना या जिल्हा आयोगापुढे प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला, सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती तक्रार खर्चाकरिता तक्रारकर्ता रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
28. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
ग्राहक तक्रार क्र.246/2018.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना जळीत ऊस पिकाच्या नुकसान भरपाईपोटी रु.77,556/- द्यावेत.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावी.
3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चापोटी रु.5,000/- द्यावेत.
4. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत करावी.
(श्री. किशोर द. वडणे)
(श्री. मुकुंद भ. सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक श. क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-