जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 162/2019. तक्रार दाखल दिनांक : 14/05/2019. तक्रार आदेश दिनांक : 03/02/2021. कालावधी: 01 वर्षे 08 महिने 20 दिवस
सोमनाथ नारायण गव्हाणे, वय 34 वर्षे,
व्यवसाय : शेती, रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, उस्मानाबाद.
(2) सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य वि.वि. कंपनी मर्या.,
शाखा आठवडी बाजार, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- जी.के. नवले
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ :- विनायक बा. देशमुख (बावीकर)
आदेशे
श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य यांचे द्वारे :-
1. तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, मौजे सांजा गावचे झोपडपट्टी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ असणा-या तक्रारकर्ता यांच्या वडिलांचे नांवे जागेमध्ये पशु आहाराकरिता ठेवलेला कडबा दि.4/4/2019 रोजी दुपारी 4.00 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील विद्युत खांबावरील तारा दुरुस्त न केल्यामुळे ठिणगी पडून तक्रारकर्ता व त्यांचे शेजारी सुखदेव गव्हाणे व आगतराव मोहिते यांच्या कडब्याच्या गंजीस स्पार्कींगमधून आग लागल्याने 4000 कडब्याच्या पेंडयाचे रु.1,40,000/- चे नुकसान झाले. तक्रारकर्ता यांच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन, आनंदनगर, उस्मानाबाद येथे अकस्मात जळीत क्र.6/2019 नुसार नोंद करण्यात येऊन दि.5/4/2019 रोजी घटनास्थळ पंचनामा करुन संबंधीतांचे जबाब नोंदविलेले आहेत.
2. तक्रारकर्ता यांचे कुटुंबाचे मालकीचे खरेदी मिळकतीमध्ये तक्रारकर्ता यांनी विद्युत जोडणी घेतलेली असल्यामुळे ते विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत. विरुध्द पक्ष यांनी योग्य सेवा देण्यामध्ये त्रुटी केल्यामुळे व निष्काळजीपणामुळे विद्युत रोहित्रामधील समतोन न राखल्यामुळे विद्युत रोहित्र ढिले झाल्यामुळे एकमेकावर घासून त्यातून ठिणग्या निर्माण होऊन तक्रारकर्ता यांच्या कडब्याचे नुकसान झाले आणि त्याकरिता विरुध्द पक्ष जबाबदार आहेत. उपरोक्त कथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.1,40,000/- नुकसान भरपाईसह शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.1,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.
3. विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांच्या कथनानुसार त्यांनी नारायण चव्हाण यांचे नांवे विद्युत पुरवठा दिलेला असून तक्रारकर्ता यांच्या नांवे दिलेला नाही. तक्रारकर्ता यांनी स्वत:चे नांवे विद्युत पुरवठा करुन घेतला नसल्यामुळे ग्राहक नात्याने त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. तक्रारकर्ता यांनी घटनेबाबत विरुध्द पक्ष यांना कळविलेले नाही. त्यांची विद्युत वाहिनी व्यवस्थित असून घटनेपूर्वी किंवा घटनेनंतर कोणाची काही तक्रार नाही. विद्युत वाहिनीची देखभाल करण्यासाठी त्यांनी तज्ञ व्यक्तींच्या नेमणुका केल्या असून ते वेळोवेळी देखभाल करीत असतात. पोलीस पंचनामा त्यांच्या अपरोक्ष केलेला आहे आणि तो फेटाळून लावला आहे. घटना विद्युत तारांच्या घर्षनामुळे ठिणगी पडून घडलेली नसून अन्य कारणाने घडली असल्यामुळे विरुध्द पक्ष त्याकरिता जबाबदार नाहीत.
4. विरुध्द पक्ष यांचे पुढे कथन आहे की, सांजा गावी जिल्हा परिषद शाळेजवळील झोपडपट्टीच्या दक्षीण बाजुकडून पूर्व-पश्चिम रस्ता आहे. त्या रस्त्याच्या एका बाजुने विद्युत वाहिनी गेलेली आहे आणि वाहिनीपासून उत्तरेकडील बाजूस ब-याच अंतरावर कडब्याच्या गंजी होत्या. विद्युत तारेच्या खाली गंजी नसल्यामुळे गंजीवर ठिणग्या पडण्याचा प्रश्न उदभवत नाही. कडब्याच्या गंजीच्या पश्चिमेकडील बाजूस काही अंतरावर तक्रारकर्ता यांचे घर आहे. घराचे दक्षीणेकडील बाजुस रस्त्यावर काही अंतरावर विद्युत खांब असून खांबापासून पूर्वेकडे विद्युत वाहिनी गेलेली आहे. तक्रारकर्ता यांच्या घराच्या पूर्वेकडे गेलेल्या वाहिनीवरुन कोणासही विद्युत पुरवठा दिला नसल्यामुळे तक्रारकर्ता यांच्या घराच्या पूर्वेकडील असलेल्या वाहिनीवरील विद्युत पुरवठा खंडीत केलेला आहे. घटनेचे कारण निश्चित होण्याकरिता विद्युत निरीक्षकांचा अहवाल नाही. अंतिमत: तक्रारकर्ता यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
5. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन व उभय पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होत असून त्यांची सकारण उत्तरे त्यापुढे दिलेल्या कारणमीमांसेकरिता देत आहोत.
मुद्दे उत्तर
1. वादकथित घटनेच्या अनुषंगाने तक्रारकर्ता विरुध्द पक्ष यांचे
ग्राहक असल्याचे सिध्द होते काय ? नाही.
2. तक्रारकर्ता यांना सेवा देण्यामध्ये विरुध्द पक्ष यांनी त्रुटी
केल्याचे सिध्द होते काय ? नाही.
3. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? नाही.
4. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
6. मुद्दा क्र.1 ते 4 :- विरुध्द पक्ष यांचा आक्षेप आहे की, त्यांनी नारायण चव्हाण यांचे नांवे विद्युत पुरवठा दिलेला आहे आणि तो तक्रारकर्ता यांच्या नांवे दिलेला नाही. तक्रारकर्ता यांनी स्वत:चे नांवे विद्युत पुरवठा करुन घेतला नसल्यामुळे ग्राहक नात्याने त्यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. त्या अनुषंगाने अभिलेखावर दाखल वीज पुरवठा देयकाचे अवलोकन केले असता श्री. नारायण एन. गव्हाणे यांचे नांवे विद्युत पुरवठा असल्याचे आढळून येते.
7. तक्रारकर्ता यांच्या कथनानुसार जिल्हा परिषद शाळेजवळील त्यांच्या वडिलांचे नांवे असणा-या जागेमध्ये कडबा जमा केला होता. विरुध्द पक्ष यांचे कथन आहे की, घटना विद्युत तारांच्या घर्षनामुळे ठिणगी पडून घडलेली नसून अन्य कारणाने घडली असल्यामुळे विरुध्द पक्ष त्याकरिता जबाबदार नाहीत. त्यांचे असेही कथन आहे की, विद्युत तारेच्या खाली गंजी नसल्यामुळे गंजीवर ठिणग्या पडण्याचा प्रश्न उदभवत नाही.
8. तक्रारकर्ता यांनी घटनेनंतर पोलीस ठाण्याकडे अर्ज दिलेला दिसून येतो. त्या अर्जामध्ये त्यांनी त्यांचा 4000 पेंढया कडबा गावात जिल्हा परिषद शाळेशेजारी लावला होता आणि त्यांचे कडब्याचे बनमीशेजारी त्यांचे गावातील सुखदव लक्ष्मण गव्हाणे यांचा 2000 पेंढया कडबा व आगतराव मारुती मोहिते यांचा 1500 पेंढया कडबा होता, असे नमूद केले आहे.
9. पोलीस पंचनाम्याचे अवलोकन केले असता कडब्याच्या 3 गंजी जळून 7500 पेंढया कडबा जळाल्याचा उल्लेख आहे.
10. उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रे पाहता तक्रारकर्ता यांची कडब्याची गंजी त्यांच्या जागेमध्ये होती, हे सिध्द होण्यासाठी उचित पुरावा अभिलेखावर दाखल नाही. तसेच विरुध्द पक्ष यांच्या विद्युत ताराच्या घर्षणामुळे निर्माण झालेल्या ठिणग्या पडून तक्रारकर्ता यांची कडब्याची गंजी जळाल्याचे सिध्द होण्याइतपत पुरावा अभिलेखावर दाखल नाही. तसेच तक्रारकर्ता यांचे नांवे विरुध्द पक्ष यांनी विद्युत पुरवठा दिल्याचे सिध्द होत नाही. एकंदर तक्रारकर्ता हे ग्राहक नाहीत; विरुध्द पक्ष यांनी सेवा देण्यामध्ये त्रुटी निर्माण केलेली नाही आणि तक्रारकर्ता अनुतोषास पात्र नाहीत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. त्या अनुषंगाने मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(2) खर्चासंबंधी आदेश नाहीत.
(श्री. किशोर द. वडणे)
(श्री. मुकुंद भ. सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक श. क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-