जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 112/2019. तक्रार दाखल दिनांक : 19/03/2019. तक्रार आदेश दिनांक : 11/01/2021 कालावधी: 01 वर्षे 09 महिने 23 दिवस
सुभाष सावता औसरे, वय 48 वर्षे, व्यवसाय : नोकरी /
माजी सैनिक, रा. अनाळा, ता. परंडा, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी मर्या.,
उस्मानाबाद तर्फे कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद,
ता. व जि. उस्मानाबाद.
(2) उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी मर्या.,
उपविभाग परंडा तर्फे उपकार्यकारी अभियंता, परंडा,
ता. परंडा, जि. उस्मानाबाद.
(3) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी मर्या.,
अनाळा तर्फे कनिष्ठ अभियंता, परंडा, ता. परंडा, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- एच.एम. उमरदंड
विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ :- वि.बा. देशमुख (बावीकर)
आदेश
श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष यांचे द्वारे :-
1. तक्रारकर्ता यांचे वादकथन आहे की, त्यांच्या मौजे अनाळा, ता. परंडा येथील घर क्र.530 करिता विरुध्द पक्ष यांच्याकडून ग्राहक क्र.603380002449 अन्वये विद्युत पुरवठा घेतला आहे. तसेच त्या घरजागेमध्ये असणा-या प्रियंका क्लॉथ सेंटर या त्यांच्या दुकानासाठी ग्राहक क्र.603380403583 अन्वये विद्युत पुरवठा घेतलेला आहे. तक्रारकर्ता राहत असलेले व व्यवसाय करीत असलेली जागा पत्र्याचे शेड आहे. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांच्या व इतर शेजा-यांना एकाच खांबावरुन विद्युत जोडणी दिलेली आहे आणि त्या तारा त्यांच्या घरावरुन नेल्या आहेत. घरावरील पत्रे व विजेच्या तारा यामध्ये 1 ते 1.5 फुट अंतर आहे. वा-यामुळे तारांमध्ये स्पार्कींग होऊन ठिणग्या पडतात. तसेच पावसाळ्यामध्ये पूर्ण पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह येतो. धोकादायक तारा काढण्यासाठी विरुध्द पक्ष यांना विनंती केली असता विरुध्द पक्ष यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल करुन तक्रारकर्ता यांनी त्यांच्या घरजागेवरुन गेलेली विद्युत तारांची वाहिनी काढून टाकण्यात यावी किंवा स्थलांतरीत करण्यात यावी आणि मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्च रु.3,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांच्या दक्षीण बाजूकडून विजेच्या तारा गेलेल्या आहेत. परंतु तक्रारकर्ता यांच्या शेड पासून दक्षीणेकडून 8 ते 10 फुटापेक्षा जास्त अंतरावर खांब असून तो खांब रस्त्यावर रोवलेला आहे. त्या खांबावरुन नियमाप्रमाणे विद्युत पुरवठा दिलेला आहे. विरुध्द पक्ष यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने अमान्य केली आहेत. तक्रारकर्ता यांनी तारांचे शिफ्टींग चार्जेस भरणा केल्यास तारा स्थलांतरीत करण्यास तयार आहेत, असे विरुध्द पक्ष यांनी नमूद केले. तक्रारकर्ता यांना शिफ्टींग चार्जेस भरणा करण्यास कळवूनही ते भरणा न केल्यामुळे तारा स्थलांतरीत करता आल्या नाहीत. अंतिमत: तक्रार खर्चासह नामंजूर करण्याची विनंती विरुध्द पक्ष यांनी केलेली आहे.
3. तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होत असून त्यांची सकारण उत्तरे त्यापुढे दिलेल्या कारणमीमांसेकरिता देत आहोत.
मुद्दे उत्तर
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी
निर्माण केली आहे काय ? होय.
2. तक्रारकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय.
3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र.1 ते 3 :- ग्राहक तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांच्याकडून विद्युत पुरवठा घेत आहेत, ही बाब वादास्पद नाही. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता हे राहत व व्यवसाय करीत असलेल्या पत्र्याच्या शेडवरुन विरुध्द पक्ष यांच्या विद्युत वाहिनीच्या तारा गेलेल्या आहेत आणि त्या स्थलांतरीत करण्यासंदर्भात उभयतांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. विद्युत तारा स्थलांतरीत करण्यासाठी तक्रारकर्ता यांनी मागणी केली होती, हे विरुध्द पक्ष यांना मान्य आहे. परंतु नियमाप्रमाणे तारा स्थलांतरीत करण्यासाठी शुल्क भरणा करावे लागतात आणि सूचना करुनही तक्रारकर्ता यांनी शुल्क भरणा न केल्यामुळे विद्युत वाहिनीच्या तारा स्थलांतरीत करता आल्या नाहीत, असा विरुध्द पक्ष यांचा बचाव आहे.
5. तक्रारकर्ता हे त्यांच्या राहत व व्यवसाय करीत असलेल्या स्वत:च्या पत्र्याच्या शेडवरुन जाणा-या विद्युत प्रवाही तारा धोकादायक असल्यामुळे स्थलांतरीत करण्याची मागणी करीत आहेत. आमच्या मते, तक्रारकर्ता यांची विनंती व मागणी गैर नाही. वादकथनांच्या अनुषंगाने दखल घेतली असता एखाद्या घरजागेवरुन जाणा-या व धोकादायक ठरणा-या विद्युत तारांचे स्थलांतरण करण्याचा खर्च ग्राहकाने किंवा घरजागा मालकाने करावा, अशाप्रकारची कायदेशीर तरतूद किंवा नियम दिसून येत नाहीत. विरुध्द पक्ष यांनीही त्यांच्या बचावापृष्ठयर्थ तसे नियम असल्याचे निदर्शनास आणून दिलेले नाही. उचित तरतुदीअभावी एखाद्या घरजागेवरुन जाणा-या विद्युत प्रवाही तारा धोकादायक स्थितीमध्ये ठेवणे अयोग्य ठरेल.
6. विद्युत वितरण व पुरवठा करण्यासाठी उभारलेल्या उपरी तारमार्ग, विद्युत खांब व रोहित्रे यांच्याशी संलग्न विद्युत संच मांडणी, ग्राहकांना वीज जोडणी देण्यात येणारी सर्व्हीस वायर इ. जबाबदारी विरुध्द पक्ष यांची आहे. तक्रारकर्ता यांच्या घरजागेवरुन जाणा-या विद्युत प्रवाही तारा काढण्याचे किंवा स्थलांतरीत करण्याचे शुल्क तक्रारकर्ता यांच्यावर बंधनकारक असल्याचे कागदोपत्री सिध्द झाले नाही. अंतिमत: विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या घरजागेवरुन जाणा-या विद्युत प्रवाही तारा स्थलांतरीत न करुन सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे आणि त्या स्थलांतरीत होऊन मिळण्याच्या अनुतोषास तक्रारकर्ता पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांच्या घरजागेवरुन गेलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा स्थलांतरीत कराव्यात.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत करावी.
(श्री. किशोर द. वडणे)
(श्री. मुकुंद भ. सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक श. क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-
(संविक/स्व/7121)