जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 196/2019. तक्रार दाखल दिनांक : 31/07/2019 तक्रार निर्णय दिनांक : 29/12/2021
कालावधी : 02 वर्षे 04 महिने 29 दिवस
दत्तात्रय राधाकिशन कटके, वय 49 वर्षे, धंदा : व्यापार,
रा. सदनिका क्र.6, तिसरा मजला, कृष्णा अपार्टमेंट,
अंबाजोगाई रोड, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.,
पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर.
(2) कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि.,
पॉवर हाऊस, साळे गल्ली, लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा आर. जाधव, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.एन. शिंदे
न्यायनिर्णय
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांच्या ग्राहक तक्रारीचा आशय असा आहे की, त्यांनी जिल्हा उद्योग केंद्राद्वारे परवानगी घेऊन उदरनिर्वाहासाठी सुरु केलेल्या बर्फ कारखान्यासाठी विरुध्द पक्ष यांच्याकडून .39 कि.वॅ. मंजूर भार असणारा विद्युत पुरवठा घेतला. त्यांचा ग्राहक क्रमांक 610557612290 व मीटर क्रमांक 05804441459 होता. विद्युत पुरवठा व्यापारी तत्वावर देण्यात आलेला होता आणि विद्युत देयकांचा भरणा वेळोवेळी करण्यात आला होता.
(2) तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, जानेवारी 2018 मध्ये व्यवसायिक स्पर्धेमुळे त्यांनी बर्फ कारखाना बंद केला. तक्रारकर्ता यांच्या सूचनेनंतर विरुध्द पक्ष यांनी बर्फ कारखान्याचा विद्युत पुरवठा बंद केला आणि मीटर काढून नेले. तक्रारकर्ता यांनी बर्फ कारखान्याच्या विद्युत पुरवठयाचे संपूर्ण देयक भरणा केले. तक्रारकर्ता यांनी त्यांचे मीटर व विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु ठेवण्याची विनंती केली आणि त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरु ठेवण्यात आला.
(3) तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, एप्रिल 2018 पासून त्यांचे मीटर बंद पडल्याचे निदर्शनास आले. दि.14/6/2018 रोजी विरुध्द पक्ष क्र.2 यांना मीटर बंद पडल्याचे व त्या ठिकाणी नवीन मीटर बसविण्याबाबत कळविले. परंतु विरुध्द पक्ष यांनी कार्यवाही न करता सरासरी देयक दिले. संपूर्ण देयकाचा भरणा तक्रारकर्ता यांनी केलेला आहे.
(4) तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांनी बर्फ कारखान्याच्या ठिकाणी हॉटेल व्यवसायाकरिता परवानगी घेतली. त्याकरिता त्यांनी जुने सौर उर्जेचे युनीट बसविले. हॉटेल सुरु केल्यानंतर हॉटेल बाहेरील पार्कींग, स्टोअर रुम व मोकळ्या जागेसाठी विद्युत पुरवठयाचा वापर करण्यात येत होता. सप्टेंबर 2018 पासून सिंगल फेज मीटर बंद असतानाही व तक्रारकर्ता यांचा वापर नसतानाही विरुध्द पक्ष यांनी अंदाजे देयके दिली. दि.2/6/2019 रोजी विद्युत पुरवठा खंडीत करुन विद्युत मीटर काढून नेण्यात आले. तसेच नवीन मीटर न बसवता विद्युत देयक दिले. विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्यांनी रु.360/- भरणा केले. विरुध्द पक्ष यांनी विद्युत मीटर न बसवून सेवेमध्ये त्रुटी केलेली आहे. उक्त वादकथनाच्या अनुषंगाने सप्टेंबर 2018 पासून देयके रद्द करण्याचा, चूक देयकांची वसुली न करण्याचा, विद्युत पुरवठा खंडीत न करण्याचा, नवीन मीटर बसवून विद्युत पुरवठा सुरु करण्याचा, मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.20,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.20,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ता यांनी केली आहे.
(5) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी अभिलेखावर लेखी उत्तरपत्र सादर केले. त्यांनी ग्राहक तक्रारीतील परिच्छेदनिहाय मजकूर अमान्य करुन पुराव्याद्वारे सिध्द करण्यात यावा, असे निवेदन केले. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांच्या बर्फ कारखान्यास दि.5/4/2011 रोजी उद्योगासाठी त्यांनी 50 अश्व शक्ती विद्युत जोडणी दिलेली होती. त्यांचा ग्राहक क्रमांक 610551303490 होता आणि तो विद्युत पुरवठा दि.5/4/2011 ते 8/10/2018 पर्यंत वापरात होता. त्यांचे पुढे कथन आहे की, वेगवेगळ्या वर्गवारीच्या अनुषंगाने नियमानुसार विद्युत देयकाची आकारणी केली जाते. तक्रारकर्ता यांच्याकडे दोन वेगवेगळे मीटर वेगवेगळ्या वापरासाठी देण्यात आलेले होते. दोन्ही मीटर तक्रारकर्ता यांच्या नांवे जमीन गट नं. 7/अ/2, महाराणाप्रताप नगर येथे दिलेले होते. त्यानुसार दि.5/4/2011 रोजी ग्राहक क्र. 610551303490 हे उद्योग वापरासाठी 50 अश्वशक्ती व दि.22/8/2015 रोजी ग्राहक क्र. 610557612290 हे व्यापारी तत्वावर 0.39 कि. वॅ. याप्रमाणे विद्युत पुरवठा दिलेला होता. परंतु तक्रारकर्ता यांच्याकडून मीटरचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले.
(6) विरुध्द पक्ष यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ता यांनी ग्राहक क्र. 610551303490 ह्या उद्योग प्रवर्गातील विद्युत पुरवठ्याचा नियमीत भरणा केला. परंतु मार्च 2018 ते ऑक्टोंबर 2018 पर्यंत त्यांनी देयकाचा भरणा केला नाही आणि त्यांच्याकडे रु.8,38,020/- रक्कम थकीत राहिली. सूचना देऊनही त्या रकमेचा भरणा न केल्यामुळे जुलै 2018 मध्ये विद्युत पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात व ऑक्टोंबर 2018 मध्ये कायमस्वरुपी स्वरुपात बंद करण्यात आला. परंतु तक्रारकर्ता यांच्या दुस-या मीटरचा विद्युत पुरवठा सुरु होता आणि नियमानुसार एकापेक्षा जास्त विद्युत पुरवठ्यापैकी कुठल्याही विद्युत पुरवठ्याची थकबाकी येणे असल्यास प्रथमत: तात्पुरते व नंतर मुदत देऊन कायमस्वरुपी विद्युत पुरठा बंद करण्यात येतो. त्यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केलेली नाही. तक्रारकर्ता यांनी थकबाकी रक्कम व नियमानुसार देयकाचा भरणा केल्यास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. अंतिमत: तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केली आहे.
(7) उभय पक्षांचे निवेदन, अभिलेखावर दाखल कागदपत्रे व युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर खालील मुद्दे निश्चित करण्यात येतात आणि त्याचा निर्णय कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे देण्यात येतो.
मुद्दे उत्तर
(1) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्ता यांना त्रुटीयुक्त
सेवा दिल्याचे सिध्द होते ? होय.
(2) तक्राकर्ता अनुतोषास पात्र आहेत काय ? होय (अंशत:)
(3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमीमांसा
(8) मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून .39 कि.वॅ. मंजूर भार असणारा व व्यापारी उद्देशाने ग्राहक क्रमांक 610557612290 अन्वये विद्युत पुरवठा घेतलेला होता, ही बाब विवादीत नाही. तसेच तो विद्युत पुरवठा विरुध्द पक्ष यांनी बंद केलेला आहे, ही बाब विवादीत नाही.
(9) प्रामुख्याने, तक्रारकर्ता यांनी त्यांच्या ग्राहक क्रमांक 610557612290 अन्वये दिलेल्या विद्युत देयकांचा विवाद उपस्थित केलेला आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचा प्रतिवाद आहे की, तक्रारकर्ता यांच्या बर्फ कारखान्यास दि.5/4/2011 रोजी ग्राहक क्र. 610551303490 अन्वये उद्योग उद्देशाकरिता 50 अश्व शक्ती विद्युत जोडणी दिलेली होती. तो विद्युत पुरवठा दि.5/4/2011 ते 8/10/2018 पर्यंत वापरात होता आणि तक्रारकर्ता यांच्याकडे रु.8,38,020/- रक्कम थकीत राहिली. विरुध्द पक्ष असेही निवेदन करतात की, तक्रारकर्ता यांच्या दुस-या मीटरचा विद्युत पुरवठा सुरु होता आणि नियमानुसार एकापेक्षा जास्त विद्युत पुरवठ्यापैकी कुठल्याही विद्युत पुरवठ्याची थकबाकी येणे असल्यास प्रथमत: तात्पुरता व नंतर मुदत देऊन कायमस्वरुपी विद्युत पुरठा बंद करण्यात येतो. तक्रारकर्ता यांनी थकबाकी रक्कम व नियमानुसार देयकाचा भरणा केल्यास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल.
(10) उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता यांनी ग्राहक क्र. 610551303490 अन्वये उद्योग उद्देशाकरिता 50 अश्व शक्ती विद्युत जोडणी घेतलेली होती, ही बाब अमान्य केलेली नाही. मुख्य वादाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांच्या ग्राहक क्रमांक 610557612290 चा विद्युत पुरवठा हा ग्राहक क्र. 610551303490 अन्वये थकीत असणा-या रकमेकरिता बंद करता येऊ शकतो काय, हा मुद्दा विचारार्थ येतो. असे निदर्शनास येते की, विरुध्द पक्ष यांनी अभिलेखावर दि.6/7/2013 चे कायमस्वरुपी बंद कलेल्या ग्राहकांकडून थकबाकीच्या वसुलीसंदर्भात दिशामार्गदर्शक पत्र दाखल केलेले आहे. पत्रातील अनुक्रमांक 4 खालीलप्रमाणे नमूद करण्यात येतो.
4) In premises of any PD consumer in arrears, if there is other live connection of same PD consumer or of his legal successor found, then entire PD arrears with interest & DPC should be divereted on such live connection.
(11) तक्रारकर्ता यांचा ग्राहक क्र. 610551303490 चा विद्युत पुरवठा थकीत असल्याचे विद्युत देयकावरुन निदर्शनास येते. अशा स्थितीमध्ये विरुध्द पक्ष यांना पत्रातील दिशामार्गदर्शकानुसार कार्यवाही करणे क्रमप्राप्त होते. परिपत्राकातील तरतुदीनुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या थकीत विद्युत पुरवठ्याची येणेबाकी सुरु असणा-या विद्युत जोडणीवर वर्ग करावयास पाहिजे. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांचा ग्राहक क्रमांक 610557612290 अन्वये सुरु असणारा विद्युत पुरवठा बंद केलेला असून जे अनुचित व अयोग्य आहे. यावरुन विरुध्द पक्ष यांनी परिपत्रकातील दिशामार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केलेले आहे आणि तक्रारकर्ता यांचा ग्राहक क्रमांक 610557612290 चा विद्युत पुरवठा बंद करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होते.
(12) विद्युत देयकांच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांचा वाद आहे की, सप्टेंबर 2018 पासून त्यांचे सिंगल फेज मीटर बंद असताना व वापर नसताना विरुध्द पक्ष यांनी अंदाजे देयक दिले. तसेच दि.2/6/2019 रोजी त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करुन विद्युत मीटर काढून नेण्यात आले. त्यामुळे तक्रारकर्ता यांची विनंती-मागणी आहे की, सप्टेंबर 2018 पासून दिलेली संपूर्ण देयके रद्द करण्यात यावेत. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांचे निवेदन आहे की, नियमानुसार एकापेक्षा जास्त विद्युत पुरवठ्यापैकी कुठल्याही विद्युत पुरवठ्याची थकबाकी येणे असल्यास प्रथमत: तात्पुरते व त्यानंतर मुदत देऊन कायमस्वरुपी विद्युत पुरवठा बंद करण्यात येतो. तक्रारकर्ता यांनी थकबाकी रक्कम व नियमानुसार देयकाचा भरणा केल्यास विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असेही त्यांचे निवेदन आहे. उभयतांच्या वाद-प्रतिवादाच्या अनुषंगाने अभिलेखावर दाखल असणा-या तक्रारकर्ता यांच्या ग्राहक क्र. 610557612290 चे कंझुमर पर्सनल लेजरचे अवलोकन केले असता सप्टेंबर 2018 पासून मार्च 2019 पर्यंत चालू रिडींग "1253" अशी एकच दर्शवलेली आहे आणि प्रतिमहा 61 युनीट वीज वापर दर्शवून देयक आकारणी केल्याचे निदर्शनास येते. अशी स्थिती असतानाही विद्युत मीटर बंद असणा-या कालावधीचे देयक तक्रारकर्ता यांनी भरणा केल्याचे नमूद केलेले आहे. यावरुन तक्रारकर्ता यांचे ग्राहक क्रमांक 610557612290 चे विद्युत मीटर बंद असताना जे सरासरी देयक दिले ते अयोग्य व अनुचित ठरते. असे दिसून येते की, जिल्हा आयोगाने तक्रारकर्ता यांच्या अंतरीम अर्जावर दि.20/8/2019 रोजी विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्याचा आदेश केला आहे. परंतु जिल्हा आयोगाच्या आदेशानुसार विद्युत पुरवठा सुरु केला नाही, असे निवेदन करणारे प्रतिज्ञापत्र तक्रारकर्ता यांनी दाखल केले आहे. वरील विवेचनाअंती ग्राहक क्र. 610557612290 चे विद्युत मीटर बंद असल्यापासून म्हणजेच सप्टेंबर 2018 पासून तक्रारकर्ता यांना दिलेले विद्युत देयके चूक व अनुचित ठरतात आणि ते रद्द होण्यास पात्र आहेत, असे जिल्हा आयोगाचे मत आहे. तसेच सप्टेंबर 2018 पासून तक्रारकर्ता यांनी भरणा केलेल्या देयकाची रक्कम त्यांना ग्राहक क्र. 610557612290 करिता येणा-या पुढील देयकामध्ये समायोजित करणे संयुक्तिक राहील, असे जिल्हा आयोगास वाटते.
(13) वादतथ्ये पाहता तक्रारकर्ता हे मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रार खर्च मिळण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत जिल्हा आयोग येतो.
(14) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्या ग्राहक क्र. 610557612290 च्या बंद असणा-या विद्युत पुरवठ्याकरिता देयके देऊन व परिपत्रकातील तरतुदीचे उल्लंघन करुन सेवेमध्ये त्रुटी निर्माण केल्याचे सिध्द होते. त्या अनुषंगाने तक्रारकर्ता हे ग्राहक क्रमांक 610557612290 चा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु होऊन मिळण्यास पात्र आहेत. तसेच ग्राहक क्रमांक 610557612290 करिता सप्टेंबर 2018 पासून दिलेल्या देयकांची रक्कम पुढील देयकांमध्ये समायोजन होऊन मिळण्यास पात्र ठरतात. वरील विवेचनाअंती मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) तक्रार अशंत: मंजूर. करण्यात येते.
(2) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांचा ग्राहक क्रमांक 610557612290 चा विद्युत पुरवठा प्रस्तुत आदेश प्राप्तीपासून सात दिवसाच्या आत पूर्ववत सुरु करावा.
(3) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांच्या ग्राहक क्रमांक 610557612290 अन्वये असणा-या विद्युत पुरवठ्याकरिता सप्टेंबर 2018 पासून पुढे दिलेली सर्व विद्युत देयके रद्द करण्यात येतात.
तसेच विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी ग्राहक क्रमांक 610557612290 च्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी सप्टेंबर 2018 पासून भरणा केलेल्या देयकांची रक्कम त्यांना सदर विद्युत पुरवठ्याकरिता पुढे येणा-या विद्युत देयकांमध्ये समायोजित करावी.
ग्राहक तक्रार क्र. 196/2019.
(4) विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रु.3,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.2,000/- द्यावेत.
(5) उभय पक्षांना न्यायनिर्णयाची प्रथम प्रत नि:शुल्क उपलब्ध करुन द्यावी.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/241121)