(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक- 27 मे, 2022)
01. तक्रारीकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा -2019 च्या कलम-35 खाली विरुध्दपक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी आणि इतर यांचे विरुध्द मृतक शेतकरी तथा तिचे पती याचे अपघाती मृत्यू संबधात शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्यांसाठी दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिचा पती श्री गौरीशंकर रामप्रसाद पुंडे हा उपरोक्त नमुद पत्त्यावर राहत होता आणि तो व्यवसायाने शेतकरी होता. तिचे पतीचे अपघाती मृत्यू नंतर कायदेशीर वारसदार म्हणून पत्नी या नात्याने तक्रारकर्ती ही लाभार्थी आहे. दिनांक-24.08.2019 रोजी तिचा पती व ती तसेच त्यांचा मुलगा व मुलगी हे आपले मालकीचे शेतात भात रोवणीसाठी गेले गेले होते. सायंकाळी विजांसह पाऊस येत होता, त्यावेळी ते शेतात काम करीत असताना तिचे पतीचे शरिरावर विज पडून तो मृत्यू पावला. त्यानंतर तिचे पतीला तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले व तेथेच त्याचे शव विचछेदन करण्यात आले. पोलीस स्टेशन आंधळगाव येथे अकस्मात मृत्यू सूचना नोंदवून मर्ग दाखल करण्यात आला.
तिने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी आहे तर विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी असून त्यांचे कडे विमा दावा दाखल केल्या जातो व पुढे त्यांचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी यांचे मार्फतीने सदर विमा दावा प्रस्ताव विरुध्दपक्ष क्रं 4 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज यांचे कडे पाठविल्या जातो. विरुध्दपक्ष क्रं 4 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनी विमा दाव्याची छाननी करुन अटी व शर्तीची पुर्तता संबधितां कडून करवून घेऊन विमा दावा प्रस्ताव विमा निश्चीतीसाठी विमा कंपनीकडे पाठवितात. तिचे पतीचे अपघाती मृत्यू नंतर तिने विमा दावा प्रस्ताव आवश्यक सर्व दस्तऐवजांसह विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-23.09.2019 रोजी दाखल केला तसेच विरुध्दपक्षांनी वेळोवेळी मागितलेल्या दस्तऐवजाची पुर्तता केली. विरुध्दपक्ष क्रं 4 जयका इन्शुरन्स कंपनीने, विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांना असे कळविले की, विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे विम्या दाव्या बाबत दिनांक-29.01.2021 रोजी पत्र पाठवून व्हीसेरा रिपोर्ट मध्ये मृतकाने मद्दार्क (UNDER ALCOHOL) घेतलेले असल्याने दावा नामंजूर केल्याचे कळविले. वस्तुतः वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय मोहाडी जिल्हा भंडारा यांचे दिनांक-25.06.2020 रोजीचे पत्रा प्रमाणे मृत्यूचे कारण “Lightning” असे नमुद आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तिचा विमा दावा फेटाळून दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तिने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा रक्कम मिळण्यासाठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष तक्रार दाखल करुन त्याव्दारे पुढील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्यू मुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- आणि सदर रकमेवर विरुध्दपक्षा कडे विमा प्रस्ताव दिल्या पासून ते रकमेच्या अदायगी पावेतो द.सा.द.शे.18 टक्के दराने व्याज विरुध्दपक्ष यांचे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- तिला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-30,000/- तसेच सदर तक्रारीचा खर्च रुपये-20,000/-विरुध्दपक्ष यांचे कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद तीचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी विभागीय कार्यालय, पुणे यांना जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली. सदर नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1 यांना दिनांक-02.08.2021 रोजी मिळाल्याचे दाखल पोस्ट ट्रॅक रिपोर्ट वरुन दिसून येते. परंतु जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस मिळूनही विरुध्दपक्ष क्रं 1 तर्फे कोणीही जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित न झाल्यामुळे प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिनांक-10.12.2021 रोजी तक्रारी मध्ये पारीत केला.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी तर्फे लेखी उत्त्र जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करण्यात आले. विरुध्दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारीतील परिच्छेद क्रं 1 ते 4 आणि परिच्छेद क्रं 9 ते 13 यामधील मजकूर हा रेकॉर्डशी संबधित असल्याने वेगळे उत्तर देण्याची गरज नसल्याचे नमुद
केले. परिच्छेद क्रं 6 ते 8 मधील मजकूर नामंजूर केला. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे विमा दाव्या बाबत दिनांक-29.01.2021 रोजी पत्र पाठवून व्हीसेरा रिपोर्ट मध्ये मृतकाने मद्दार्क घेतलेले असल्याने (under alcohol) दावा नामंजूर असे तक्रारकर्तीला कळविल्याची बाब मान्य केली मात्र ही बाब नामंजूर केली की, वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय मोहाडी यांचे दिनांक-25.06.2020 रोजीचे पत्रा प्रमाणे मृत्यूचे कारण “Lightning” हेच आहे. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, अपघाताचे दिवशी मृतकाने मद्दार्काचे सेवन केले होते. मृतकाचा व्हीसेरा व हिस्ट्रोपथॉलॉजी करीता नमुने परिक्षण कामी रासायनिक प्रयोगशाळा नागपूर (Regional Forensic Science Laboratory Nagpur) येथे पाठविले असता व्हीसेरा अहवाला मध्ये “Alcohol” चे प्रमाण आढळून आले. व्हीसेरा अहवाला मध्ये मृतकाचे पोटात व फुप्फुसात 103 mgs and 99 mgs of Ethyl Alcohol per 100 grams असे नमुद केले व मृतकाचे रक्ता मध्ये सुध्दा 101 mgs of Ethyl Alcohol per 100 grams असे नमुद आहे त्यामुळे मृतकाचा मृत्यू हा मद्दार्काचे सेवन केल्यामुळे झालेला आहे आणि त्यावरुन तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्दपक्ष विमा कंपनीने नामंजूर केलेला आहे. मृतकाने मद्दार्काचे सेवन केलेले असल्यामुळे विमा अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले आहे करीता तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी असे नमुद केले.
05. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांनी लेखी उत्तर जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले, त्यांनी लेखी उत्तरात तक्रारकर्तीचे पती श्री गौरीशंकर रामप्रसाद पुंडे यांचा विज पडून मृत्यू दिनांक-24.08.2019 रोजी झाला. त्यांचे मृत्यू नंतर तक्रारकर्तीने त्यांचे कार्यालयात आवक क्रं-178 अनुसार दिनांक-23.09.2019 रोजी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्या करीता
विमा दावा दाखल केला होता आणि त्यांनी सदर विमा दावा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात जावक क्रं-1010 , दिनांक-23.09.2019 अन्वये सादर केला होता. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयीन दिनांक-11.12.2020 रोजीचे ई मेल संदेशा नुसार पोलीस अंतीम अहवाल या त्रृटीची पुर्तता करण्या बाबत कळविले, त्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकरी यांचे कार्यालयातून उपविभागीय पोलीस अधिकरी, तुमसर यांना दिनांक-21.12.2020 रोजी पत्र देण्यात आले असता उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर यांनी दिनांक-18.01.2021 अनुसार पोलीस अंतीम अहवाल तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर केला. सदर पोलीस अंतीम अहवाल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिनांक-20.01.2021 रोजीचे पत्रान्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात सादर केला होता. त्या नंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयातून प्राप्त ई मेल संदेश दिनांक-01.03.2021 अनुसार मृतकाने मद्दार्काचे सेवन केले असल्यामुळे विमा दावा प्रस्ताव नामंजूर केल्याचे कळविले असे नमुद केले.
06. विरुध्दपक्ष क्रं 4 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांनी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष लेखी उत्तर दाखल केले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, मृतक शेतक-याचा विमा दावा प्रस्ताव दस्तऐवजासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कडून त्यांना दिनांक-07.02.20210 रोजी प्राप्त झाला होता आणि त्यांनी सदर विमा दाव्याची छाननी करुन पुढे तो विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडे दिनांक-21.02.2020 रोजी पाठविला होता. विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने व्हीसेरा रिपोर्ट अनुसार अपघाताचे वेळी मृतक हा मद्दार्काचे अमला खाली असल्याने दिनांक-29.10.2021 रोजीचे पत्राव्दारे विमा दावा नामंजूर केला. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 4 यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
07. तक्रारकर्तीची तक्रार व दाखल दस्तऐवज, विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे, तसेच तक्रारकर्तीचा शपथे वरील पुरावा आणि तक्रारकर्ती व विमा कंपनीचा लेखी व मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समोर खालील मुद्दे न्यायनिवारणार्थ उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
1 | विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते काय | -होय- |
2 | काय आदेश | अंतीम आदेशा नुसार |
मुद्दा क्रं 1 व 2 बाबत-
08. विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएन्टल अॅश्योरन्स कंपनीने लेखी उत्तरात असा आक्षेप घेतला की, अपघाताचे दिवशी मृतकाने मद्दार्काचे सेवन केले होते. मृतकाचा व्हीसेरा व हिस्ट्रोपथॉलॉजी करीता नमुने परिक्षण कामी रासायनिक प्रयोगशाळा नागपूर (Regional Forensic Science Laboratory Nagpur) येथे पाठविले असता व्हीसेरा अहवाला मध्ये “Alcohol” चे प्रमाण आढळून आले. व्हीसेरा अहवाला मध्ये मृतकाचे पोटात व फुप्फुसात 103 mgs and 99 mgs of Ethyl Alcohol per 100 grams असे नमुद केले व मृतकाचे रक्ता मध्ये सुध्दा 101 mgs of Ethyl Alcohol per 100 grams असे नमुद आहे त्यामुळे मृतकाचा मृत्यू हा मद्दार्काचे सेवन केल्यामुळे झालेला आहे. मृतकाने मद्दार्काचे सेवन केलेले असल्यामुळे विमा अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले असल्याने तिचा विमा दावा नामंजूर केल्याचे कळविले असे नमुद केले.
09. या उलट तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय मोहाडी जिल्हा भंडारा यांचे दिनांक-25.06.2020 रोजीचे पत्रा प्रमाणे मृत्यूचे कारण “Lightning” असे नमुद आहे. आम्ही सदर वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, मोहाडी, जिल्हा भंडारा यांनी दिलेल्या फायनल ओपीनीयनचे अवलोकन केले असता त्यामध्ये मृत्यूचे कारण हे “Lightning” असे नमुद आहे. आम्ही रासायनिक प्रयोगशाळा नागपूर यांनी दिनांक-27 नोव्हेंबर, 2019 रोजी दिलेल्या अहवालाचे वाचन केले त्यामध्ये पुढील प्रमाणे नमुद आहे-
Results of Analysis- Exhibit Nos. (1) and (2) contain (103) milligrams and (99) milligrams of Ethyl Alcohol Per 100 grams, respectively. Exhibit Nos (3) and (4) each contains (101) mgs of Ethyl Alcohol per 100 millilitres respectively.
10. आम्ही विरुध्दपक्ष ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने दिनांक-29 जानेवारी, 2021 रोजीचे विमा दावा नामंजूरीचे पत्र जे तक्रारकर्तीचे नावे दिलेले असून सदर पत्राची प्रत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा आणि जयका इन्शुन्स ब्रोकरेज कंपनीला दिलेले आहे , त्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये असे नमुद आहे की, शव विच्छेदन अहवाला नुसार मृत्यूचे कारण हे राखीव ठेवण्यात आलेले आहे. तसेच कोणत्याही दसतऐवजा वरुन हे सिध्द होत नाही की, मृतकाचा मृत्यू हा विज पडून झालेला आहे. व्हीसेरा रिपोर्ट अनुसार मृतकाने अपघात होण्याचे अगोदर मद्दार्काचे प्रशान केलेले होते. विमा पॉलिसी नियमा नुसार मद्द प्रभावा खाली घडलेला कुठलाही अपघात विमा दाव्यास पात्र नाही त्यामुळे विमा दावा रद्द करीत आहोत असे नमुद आहे. शव विच्छेदन अहवाला मध्ये मृतकाचे शरिरावर जखमा झाल्याचे नमुद आहे. मृतकाचा मृत्यू हा विज आंगावर पडून झालेला असताना विरुध्दपक्ष विमा कंपनी मृतकाचा मृत्यू विज आंगावर पडल्यामुळे झालेला नाही अशी जी भूमीका घेतली आहे ती चुकीची आहे. मृतकाचा मृत्यू विज आंगावर पडून झालेला नाही तर कोणत्या कारणामुळे झाला हे पुराव्यानिशी सिध्द करण्याची जबाबदारी विरुध्दपक्ष विमा कंपनीची आहे. क्षणभरासाठी असे गृहीत धरले की, विरुध्दपक्ष विमा कंपनीचे म्हणण्या प्रमाणे मृतकाचा मृत्यू हा मद्दार्काचे प्राशन केल्यामुळे झाला परंतु केवळ मद्दार्काचे प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला ही बाब सिध्द झालेली नाही दुसरी महत्वाची बाब अशी आहे की, वैद्दकीय अधिकारी यांनी मृत्यूचे कारण हे विज आंगावर पडून झाल्याचे नमुद केलेले आहे आणि विज आंगावर पडल्यामुळे झालेल्या मृत्यूशी मद्दार्क सेवनाचा कोणताही संबध निर्माण होत नाही असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विज कडाडून पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे, त्याचा मद्दार्काशी काहीही संबध येत नाही.
11. आम्ही महाराष्ट्र शासनाचे कृषी, पशुसवंर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-19 सप्टेंबर, 2019 रोजीचे परिपत्रकाचे वाचन केले, त्यामध्ये विमा कंपनी या सदरा खाली विमा कंपनीस सुचना दिलेल्या आहेत, त्यामधील विमा दावा निकाली काढण्यासाठी काही सुचना पुढील प्रमाणे आहेत.
अक्रं-9 विमा कंपन्यांना सुस्पष्ट कारणां शिवाय विमा प्रस्ताव नाकारता येणार नाहीत. विमा कंपन्यांनी नामंजूर विमा दाव्या प्रकरणी सुस्पष्ट कारणमीमांसा संबधित शेतक-यांना कटाक्षाने मराठी भाषेतच कळविले व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी/आयुक्त कृषी/ सहसंचालक कृषी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविणे व विमा संगणक प्रणाली मध्ये नोंद घेणे अनिवार्य आहे.
अक्रं-10 विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या बाबतचे पत्र संबधित अर्जदारास पोहोच करावे व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी/ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना दयावी. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 21 दिवसाच्या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील.
अक्रं-11 प्रकरण मंजूर केल्यावर पंधरा दिवसांच्या आत अनुज्ञेय नुकसान भरपाई संबधित लाभार्थ्यांच्या खात्या वर जमा करणे बंधनकारक राहील. अन्यथा तीन महिन्या पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर 15 टक्के व्याज देय राहील.
अक्रं-12 परिपूर्ण विमा दावा कंपनीकडे सादर झाल्या पासून त्यावर 21 दिवसांच्या आत कार्यवाही करणे विमा कंपनी वर बंधनकारक राहील. मात्र तरीही विमा कंपनीने कागदपत्रांची पुर्तता झालेल्या प्रकरणी मंजूरी योग्य प्रस्ताव नाकारल्यास विमा सल्लागार कंपनीने शेतक-यांच्या वतीने इर्डा ग्राहक तक्रार कक्ष/ विमा न्यायाधीश/ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच/ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग/न्यायालय येथे दावे दाखल करेल.
अक्रं-13 शेतक-यांचा विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्रापत झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील.
अक्रं-14 तथापी विमा पॉलिसी कालावधीच्या अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्या पासून 90 दिवसा पर्यंत पूर्वसूचना प्राप्त होणारे व संगणक प्रणाली मध्ये विहित कालावधीत कागदपत्रांसह नोंद झालेल्या पूर्वसूचना पत्रा नुसार विमा प्रस्ताव सुध्दा स्विकारणे विमा कंपनीस बंधनकारक राहील.
वरील प्रमाणे शासन परिपत्रकात सुचना विमा कंपनीसाठी निर्गमित केलेल्या आहेत. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका नुसार परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्या पासून 21 दिवसाच्या आत उचित कार्यवाही करावी (मंजूरी, नामंजूरी, त्रुटी कळविणे) न केलास तीन महिन्यां पर्यंत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील असे स्पष्ट नमुद आहे .
12. आमचे समोरील हातातील तक्रारी मध्ये तक्रारकर्तीने जरी विमा दावा विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दिनांक-23.09.2019 रोजी सादर केला होता तरी विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे लेखी उत्तरा नुसार मृतकाचा पोलीस अंतीम अहवाल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने दिनांक-20.01.2021 रोजीचे पत्रान्वये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात सादर केला होता असे नमुद केलेले आहे . म्हणजेच मृतकाचा पोलीस अंतीम अहवाल मिळाल्या नंतर विरुध्दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक-29.01.2021 रोजीचे पत्राव्दारे नामंजूर केला.
13. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्यू झालेला असल्यामुळे तक्रारकर्ती ही कायदेशीर वारसदार आहे त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्ती हिला विमा दाव्याची रक्कम रुपये-2,00,000/- आणि सदर रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने विमा दावा नाकारल्याचा दिनांक-29.01.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्याच बरोबर तक्रारकर्ती हिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मोहाडी जिल्हा भंडारा आणि विरुध्दपक्ष क्रं 4 विमा सल्लागार कंपनी यांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
14. उपरोक्त नमुद वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, पुणे आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्यवस्थापक, नागपूर यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीला आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्ती श्रीमती सीमा गौरीशंकर पुडे हिला तिचे पतीचे अपघाती मृत्यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्त) अदा करावी आणि सदर रकमेवर विमा दावा नाकारल्याचा दिनांक-29.01.2021 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15 टक्के दराने व्याजाची रक्कम तक्रारकर्तीला अदा करावी.
- तक्रारकर्ती हिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्ती हिला अदा कराव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, मोहाडी, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 4 जयका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षकारांनी अतिरिक्त संच जिल्हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.