जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 137/2019. तक्रार दाखल दिनांक : 16/04/2019. तक्रार आदेश दिनांक : 01/02/2021. कालावधी: 01 वर्षे 09 महिने 16 दिवस
(1) प्रकाश हरिबा नवले, वय 53 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. चव्हाणवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
(2) राजेंद्र हरिबा नवले, वय 50 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. चव्हाणवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी लि.,
तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
(2) कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी लि.,
तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
(3) कनिष्ठ अभियंता, म.रा.वि.वि. कंपनी लि.,
तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.
(4) विद्युत निरीक्षक, म.रा.वि.वि. कंपनी लि.,
तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
(3) श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- सुधीर य. पटाडे
विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेतर्फे विधिज्ञ :- विनायक बा. देशमुख (बावीकर)
विरुध्द पक्ष क्र. 4 स्वत:
आदेश
श्री. शशांक शरदचंद्र क्षीरसागर, सदस्य यांचे द्वारे :-
1. विरुध्द पक्ष यांच्या निष्काळजीपणामुळे तक्रारकर्ता यांच्या शेतजमिनीतील ऊस पीक, ठिबक व पाईप लाईन जळाल्यामुळे नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्ता यांचे वादकथन असे की, मौजे चव्हाणवाडी, ता. तुळजापूर येथे गट क्र.132 मध्ये तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांचे नांवे प्रत्येकी 2 हे. 01 आर. शेतजमीन क्षेत्र आहे आणि ते आप-आपसात सख्खे बंधू आहेत. सदर मिळकतीमध्ये त्यांची संयुक्त मालकीची विहीर असून संयुक्त मोटारीकरिता विरुध्द पक्ष यांच्याकडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे आणि त्यांचा ग्राहक क्रमांक 594520390780 आहे. शेतजमीन बागायत असल्यामुळे ते ऊस पीक घेत होते व आहेत.
3. तक्रारकर्ता यांचे पुढे कथन आहे की, सन 2017-18 मध्ये वर नमूद क्षेत्रापैकी तक्रारकर्ता क्र.1 यांनी 0 हे. 80 आर. व तक्रारकर्ता क्र.2 यांनी 1 हे. 60 आर. क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन संचाच्या सहाय्याने 86032 जातीच्या ऊसाची लागवड केली होती. दि.9/12/2018 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास वा-यामुळे त्यांच्या शेतजमिनीवरुन गेलेल्या विद्युत वाहिनीतील तारांमध्ये घर्षण होऊन स्पार्कींग झाले आणि त्याच्या ठिणग्या ऊस पाचटावर पडून ऊस पिकाने पेट घेतला. त्यामुळे तक्रारकर्ता यांचे संपूर्ण ऊस पीक, ठिबकसह पी.व्ही.सी. पाईपलाईन जळून खाक झाली. पोलीस ठाणे, नळदूर्ग; तहसील कार्यालय, तुळजापूर; तालुका कृषि अधिकारी, तुळजापूर व विरुध्द पक्ष यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस यंत्रणेने जळीत क्र.20/2018 अन्वये नोंद करुन पंचानामा केला. तसेच तहसीलदार, तुळजापूर यांनी पंचासमक्ष पंचनामा केला. विरुध्द पक्ष क्र.1 यांनी दि.11/2/2018 रोजी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.
4. तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, त्यांनी ऊस पिकाची चांगली जोपासना केली होती आणि घटनेच्या वेळी ऊस पीक 11 महिन्याचे व 20 ते 22 कांड्याचे होते. त्यामुळे त्यांना 7 ते 8 लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळाले असते. ऊस पिकासह ठिबक सिंचन संच व पी.व्ही.सी. पाईप जळाल्यामुळे त्यांचे एकूण रु.8,00,000/- चे नुकसान झाले आहे. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना नुकसान भरपाईची मागणी केली असता टाळाटाळ करण्यात आली.
5. उपरोक्त वादकथनाच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांनी रु.8,00,000/- दि.9/12/2018 पासून द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह देण्याचा; मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.10,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
6. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांच्या कथनानुसार विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याशी त्यांचा संबंध नाही. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे विभक्त राहतात आणि त्यांचा एकमेकांच्या व्यवहाराशी संबंध येत नाही. त्यांनी तक्रारकर्ता क्र.1 यांना विद्युत पुरवठा दिलेला आहे आणि त्यांचा ग्राहक क्रमांक 594520390780 आहे. विरुध्द पक्ष क्र.2 हे त्यांचे ग्राहक नाहीत.
7. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ता यांच्या मालकीच्या मिळकतीवरुन त्यांची विद्युत वाहिनी गेलेली आहे. घटनेचे पंचनामे त्यांच्या अपरोक्ष करण्यात आलेले आहेत आणि ते अमान्य केले आहेत. त्यामुळे पंचनामे पुराव्यात गृहीत धरता येणार नाहीत. तसेच तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांना घटनेची माहिती तात्काळ दिलेली नाही. घटना त्यांच्या हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणामुळे घडलेली नसून नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेली असावी.
8. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे पुढे कथन आहे की, विद्युत निरीक्षक, उस्मानाबाद यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष निरीक्षण व तपासणी केली, हे चूक आहे. त्यांच्या पत्राचे अवलोकन केले असता कोणत्या तारखेस अपघात स्थळाची पाहणी केली, कोणती निरीक्षणे केली, कोणाची तपासणी केली, कोणाचे जबाब नोंदविले, विद्युत वाहिनीच्या कोणत्या ठिकाणी घर्षण झाले इ. उल्लेख नाही. तसेच सदरचे पत्र 25 दिवसानंतर दिलेले असल्यामुळे पुराव्यात ग्राह्य धरणे योग्य होणार नाही.
9. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे पुढे कथन आहे की, तक्रारकर्ता यांनी ऊस लागण तारीख नमूद केलेली नाही. तसेच ऊस लागवड क्षेत्राचा पुरावा दिलेला नाही. त्यामुळे ऊस पीक 11 महिन्याचे व 20 ते 22 कांडयाचे होते, असे म्हणता येत नाही. तक्रारकर्ता यांचा ऊस जळालेला नसून केवळ ऊसाचे पाचट जळाले आणि त्यांचा ऊस कारखान्यास गेला असल्यामुळे तक्रारकर्ता यांचे नुकसान झालेले नाही. तक्रारकर्ता हे त्यांचे ग्राहक नाहीत. शेवटी तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती विरुध्द पक्ष यांनी केलेली आहे.
10. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी अभिलेखावर लेखी निवेदन दाखल केले आहे. त्यांचे कथन आहे की, विद्युत निरीक्षक हे महावितरण कंपनीचे अधिकारी नाहीत आणि ते महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत असणा-या विद्युत निरीक्षण कार्यालयाचे अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यालयामार्फत विद्युत प्राणांतिक/अप्राणांतिक/जळीत प्रकरणाचे निरीक्षण करण्यात येते. त्यांनी घटनेची चौकशी दि.17/12/2018 रोजी केली आणि दि.4/1/2019 रोजी अहवाल दिला. नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची असून महावितरणकडे अर्ज सादर करुन पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यामुळे नुकसान भरपाईकरिता त्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये आणि त्यांना अनावश्यक पक्षकार केल्यामुळे त्यांचे नांव प्रकरणातून वगळण्यात यावे, अशी विनंती केली आहे.
11. तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदन व अभिलेखावर दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ उपस्थित होणा-या मुद्दयांची कारणमीमांसा त्यांच्यापुढे दिलेल्या उत्तराकरिता खालीलप्रमाणे देण्यात येते.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ता हे ग्राहक संरक्षण कायदा, 2019 अन्वये होय.
'ग्राहक' संज्ञेत येतात काय ? (तक्रारकर्ता क्र.1)
2. विरुध्द पक्ष यांच्या विद्युत वाहिनीच्या तारांतील घर्षणामुळे होय.
तक्रारकर्ता यांचे ऊस पीक जळाल्याचे सिध्द होते काय ? (वि.प. क्र.1 ते 3 यांनी)
आणि त्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना
द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी केली आहे काय ?
3. तक्रारकर्ता हे नुकसान भरपाईसह तक्रार खर्च मिळण्यास होय (अंशत:)
पात्र आहेत काय ? (तक्रारकर्ता क्र.1)
4. आदेश काय ? शेवटी दिल्याप्रमाणे
कारणमीमांसा
12. मुद्दा क्र. 1 :- तक्रारकर्ता क्र.1 यांचे नांवे विरुध्द पक्ष यांनी कृषी प्रयोजनार्थ 5 अश्व शक्ती विद्युत पुरवठा दिल्याचे वीज आकार देयकावरुन निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांनी मुद्दा उपस्थित केला की, तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे विभक्त राहतात आणि त्यांचा एकमेकांच्या व्यवहाराशी संबंध येत नाही. तसेच त्यांनी तक्रारकर्ता क्र.1 यांना विद्युत पुरवठा दिलेला असून त्यांचा ग्राहक क्रमांक 594520390780 आहे. परंतु विरुध्द पक्ष क्र.2 हे त्यांचे ग्राहक नाहीत. उभयतांचा वाद-प्रतिवाद पाहता तक्रारकर्ता क्र.1 हे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांच्याकडून कृषी प्रयोजनार्थ विद्युत पुरवठा घेत असल्यामुळे ते ‘ग्राहक’ संज्ञेत येतात. परंतु तक्रारकर्ता क्र.2 यांचे शेतजमीन क्षेत्र विभक्त असल्याचे 7/12 उता-यावरुन निदर्शनास येते. तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांच्या संयुक्त मालकीची विहीर असल्याबाबत महसुली नोंदीचा पुरावा आढळून येत नाही. तक्रारकर्ता क्र.1 व 2 हे सख्खे बंधू असले तरी त्यांच्या शेतजमीन मिळकती स्वतंत्र दिसून येतात. तसेच तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांनी संयुक्तपणे विद्युत जोडणी घेतल्याचा पुरावा नाही. विद्युत पुरवठा तक्रारकर्ता क्र.1 यांचे नांवे विद्युत पुरवठा घेतल्याचे दिसून येते. वादकथित स्थितीमध्ये तक्रारकर्ता क्र.2 यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून विद्युत जोडणी घेतल्याचे सिध्द होत नसल्यामुळे ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 अन्वये तक्रारकर्ता क्र.2 हे विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे ‘ग्राहक’ होऊ शकत नाहीत. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर वरीलप्रमाणे दिले आहे.
13. मुद्दा क्र. 2 :- तक्रारकर्ता यांचे कथन आहे की, दि.9/12/2018 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास वा-यामुळे त्यांच्या शेतजमिनीवरुन गेलेल्या विद्युत वाहिनीतील तारांमध्ये घर्षण होऊन स्पार्कींग झाले आणि त्याच्या ठिणग्या ऊस पाचटावर पडून ऊस पिकाने पेट घेतला. त्यामुळे तक्रारकर्ता यांचे संपूर्ण ऊस पीक, ठिबक, पी.व्ही.सी. पाईपलाईन जळून खाक झाली. उलटपक्षी तक्रारकर्ता यांची वादकथने अमान्य करताना विरुध्द पक्ष यांनी कथन केले की, घटना त्यांच्या हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणामुळे घडलेली नसून नैसर्गिक आपत्तीमुळे घडलेली असावी.
14. असे दिसते की, दि.10/12/2018 रोजी तक्रारकर्ता यांच्या ऊस पीक जळीत घटनेनंतर पोलीस खाते व कृषी सहायक, मौजे काटगांव यांनी पंचनामा केलेला आहे. तसेच दि.9/12/2018 रोजी तलाठी, सज्जा काटगांव यांनी पंचनामा केलेला दिसून येतो.
15. पोलीस ठाणे, नळदुर्ग यांनी घटनास्थळ पंचनाम्यामध्ये ऊस, ड्रीपच्या नळया, पी.यू.सी. पाईप जळाल्याचे नमूद केलेले आहे. तसेच ऊसातून गेलेल्या विद्युत तारेचा झोळ पडलेचे दिसत आहे, असेही नमूद केले आहे.
16. तलाठी, सज्जा काटगांव यांनी पंचनाम्यामध्ये नमूद केले की, गट नं. 132 मधून विद्युत लाईटचे पोलची लाईन गेली असून विद्युत तारेच्या घर्षनाने ठिणगी पडून सकाळी 10:30 वाजता (दि.9/12/2018) राजेंद्र हरिदास नवले यांचा 01 हे. 60 आर. ऊस व प्रकाश हरिदास नवले यांचा 00 हे. 80 आर. ऊस आग लागून जळाला आहे. तसेच ठिबक सिंचनच्या नळ्या व पी.व्ही.सी. पाईप 10 लागलेल्या आगीत जळाले आहेत.
17. कृषी सहायक, मौजे काटगाव यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये तलाठी, सज्जा काटगांव यांच्या पंचनाम्याप्रमाणे मजकूर आहे.
18. विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उस्मानाबाद यांनी तक्रारकर्ता यांच्या ऊस जळीत प्रकरणाची चौकशी करुन दि.4/1/2019 रोजी पत्राद्वारे कळविले आहे. त्या पत्रामध्ये अपघाताचा निष्कर्ष खालीलप्रमाणे नमूद आहे.
अपघाताचा निष्कर्ष :-
महावितरण कंपनीकडून सदर अपघाताची सूचना व अहवाल, अपघातस्थळाचे प्रत्यक्ष केलेले निरीक्षण व तपासणी, नोंदविलेले जबाब, तसेच प्राप्त नमुना-अ यावरुन खालीलप्रमाणे अभिप्राय देत आहोत.
मौजे चव्हाणवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथे गट नं.132 मध्ये श्री. प्रकाश हरीबा नवले व राजेंद्र हरीबा नवले यांचे शेत आहे. शेतात महावितरण कंपनीची 100 केव्हीए शिंदे डीटीसी वरुन आलेली लघुदाब वाहिनी (3 फेज 4 वायर) आहे. सदर लघुदाब वाहिनीस स्पेसर्स बसविले नसल्यामुळे वाहिनीस झोळ पडलेला होता. दि.09/12/2018 रोजी लघुदाब वाहिनीच्या संवाहक तारा वादळवा-याने एकमेकांच्या संपर्कात येऊन स्पार्कींग झाली. तसेच सदर 100 केव्हीए शिंदे रोहित्राच्या वितरणपेटीत अयोग्य क्षमतेच्या फ्युज तारा वापरल्यामुळे फ्युज वितळले नाहीत व त्या स्पार्कींगच्या ठिणग्या वाहिनीखालील श्री. प्रकाश हरिबा नवले व राजेंद्र नवले यांच्या ऊसात पडल्या व ऊसास आग लागली व सदर ऊस जळीत प्रकरण घडले.
ज्याअर्थी सदर जळीत प्रकरण महावितरण कंपनीमार्फत वीज संच मांडणीच्या देखभाल व दुरुस्तीअभावी घडल्याचे व त्यात केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे उपाय) विनियम, 2010 मधील विनिमय 12, 35 व 58 या विनियमांचा भंग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याअर्थी या जळीत प्रकरणी नुकसान भरपाई देणेची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे.
19. सहायक अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि. यांनी दि.11/12/2018 रोजी घटनास्थळ पंचनामा केलेला दिसून येतो. त्यामध्ये नकाशा दर्शविला आहे. नकाशाप्रमाणे श्री. प्रकाश हरीबा नवले यांचा 2 एकर व श्री. राजेंद्र हरीबा नवले यांचा 4 एकर क्षेत्रातील ऊस विद्युत अपघातामुळे जळाला आहे. तसेच श्री. राजेंद्र हरीबा नवले यांचे ठिबक सिंचनचे पाईप जळाले आहेत, असे नमूद आहे.
20. उभयतांचा वाद-प्रतिवाद व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांचे ऊस पीक आगीमुळे जळाल्याची बाब स्पष्ट आहे. वादमुद्याच्या अनुषंगाने तक्रारकर्ता यांच्या ऊस पिकास लागणा-या आगीचे कारण काय होते ? हा प्रश्न निर्माण होतो.
21. ऊस जळीत घटनेबाबत विद्युत निरीक्षकांचा निष्कर्ष पाहता लघुदाब वाहिनीस स्पेसर्स बसविले नसल्यामुळे वाहिनीस झोळ पडलेला होता. दि.09/12/2018 रोजी लघुदाब वाहिनीच्या संवाहक तारा वादळवा-याने एकमेकांच्या संपर्कात येऊन स्पार्कींग झाली आणि सदर 100 केव्हीए शिंदे रोहित्राच्या वितरणपेटीत अयोग्य क्षमतेच्या फ्युज तारा वापरल्यामुळे फ्युज वितळले नाहीत व त्या स्पार्कींगच्या ठिणग्या वाहिनीखालील श्री. प्रकाश हरिबा नवले व राजेंद्र नवले यांच्या ऊसात पडल्या व ऊसास आग लागली व सदर ऊस जळीत प्रकरण घडले. विद्युत निरीक्षकांचा अहवाल अमान्य करताना विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 नमूद करतात की, कोणत्या तारखेस अपघात स्थळाची पाहणी केली, कोणती निरीक्षणे केली, कोणाची तपासणी केली, कोणाचे जबाब नोंदविले, विद्युत वाहिनीच्या कोणत्या ठिकाणी घर्षण झाले इ. उल्लेख त्यामध्ये नाही. तसेच सदरचे पत्र 25 दिवसानंतर दिलेले असल्यामुळे पुराव्यात ग्राह्य धरणे योग्य होणार नाही, असा बचाव विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी घेतला. वास्तविक पाहता विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचा तो बचाव असला तरी त्यांनी विद्युत निरीक्षक यांच्याकडे त्यांचा आक्षेप नोंदविल्याचे किंवा त्या संदर्भाने पत्रव्यवहार केल्याचे आढळून येत नाही. इतकेच नव्हेतर विद्युत निरीक्षक यांची साक्ष नोंदविण्याचा त्यांना संधी होती. आमच्या मते, अशा दुर्घटनाची चौकशी करण्यासाठी विद्युत निरिक्षक हे सक्षम व तज्ञ व्यक्ती आहेत. उचित पुराव्याअभावी त्यांचा चौकशी अहवाल फेटाळणे किंवा त्यावर अविश्वास करणे उचित होणार नाही, असे आम्हाला वाटते.
22. तक्रारकर्ता यांच्या ऊस जळीत घटनास्थळी असणा-या दोन विद्युत खांबामध्ये किती अंतर होते ? आणि दोन खांबाच्या विद्युत प्रवाही तारांमध्ये अंतर किती होते ? हे विरुध्द पक्ष यांनी स्पष्ट केलेले नाही. दोन खांबातील अंतर व विद्युत तारांमधील अंतर काय असावे, यासाठी असणा-या कायदेशीर निकषाचा ऊहापोह केलेला नाही. विद्युत तारांचा एकमेकांना स्पर्श न होण्यासाठी लाकडी काठी किंवा पी.व्ही.सी. पाईपचा वापर केलेला काय किंवा कसे, याचा खुलासा केलेला नाही. अभिलेखावर दाखल पंचनामे व विद्युत निरीक्षकांचा निष्कर्ष पाहता लघुदाब वाहिनीस स्पेसर्स नसल्यामुळे वाहिनीस झोळ पडलेला होता आणि वा-यामुळे संवाहक तारा एकमेकांच्या संपर्कात येऊन स्पार्कींगच्या ठिणग्या ऊस पिकावर पडल्या, हे स्पष्ट होते.
23. विद्युत वितरण करण्यासाठी उभारलेले उपरी तारमार्ग, विद्युत खांब व विद्युत रोहित्र यासाठी संलग्न असणा-या विद्युत संच मांडणीची वेळोवेळी आवश्यक देखभाल व दुरुस्तीसह सुरक्षीत ठेवण्याचीविरुध्द पक्ष यांच्यावर जबाबदारी आहे. विद्युत दुर्घटना घडण्यामागे मानवी चुका, निकृष्ठ देखभाल, विद्युत उपकरणांची चूक मांडणी, अप्रशिक्षीत कर्मचारी वर्ग, त्यांच्यातील समन्वय इ. कारणे असू शकतात.
24. दोन खांबातील विद्युत तारांना स्पेसर्स बसविले नसल्यामुळे तारा ढिल्या होऊन त्यामध्ये झोळ निर्माण होऊ शकतो. विद्युतभारीत तारा एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर आगीच्या ठिणग्या पडणे स्वाभाविक बाब आहे. विद्युत निरीक्षकांचा निष्कर्ष पाहता संवाहक तारांच्या संपर्कामुळे निर्माण झालेल्या ठिणग्या ऊस पिकावर पडून ऊस पीक जळाल्याचे आढळते. विद्युत तारांमुळे अपघात घडलेला असल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली आहे, या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. वरील विवेचनावरुन आम्ही मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
25. मुद्दा क्र. 3 :- तक्रारकर्ता क्र.1 व 2 यांनी ऊस पीक, ठिबक सिंचन संच व पाईपच्या नुकसानीकरिता रु.8,00,000/- नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केली आहे. तक्रारकर्ता क्र.2 हे विरुध्द पक्ष यांचे ‘ग्राहक’ आहेत, हे सिध्द न झाल्यामुळे त्यांचा नुकसान भरपाईकरिता विचार होऊ शकत नाही. तक्रारकर्ता क्र.1 यांचे कथन आहे की, त्यांनी 80 आर. शेतजमीन क्षेत्रामध्ये ऊस पिकाची लागवड केली होती. एखाद्या साखर कारखान्याचे ते सभासद आहेत, असा पुरावा त्यांनी दाखल केलेला नाही. तक्रारकर्ता यांचे ऊस पीक आगीमध्ये जळाल्यानंतर ते साखर कारखान्याकडे गाळपासाठी नेले काय किंवा त्या जळीत ऊस पिकाची कशाप्रकारे विल्हेवाट लावली, याचे स्पष्टीकरण तक्रारकर्ता यांनी दिलेले नाही. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे कथन की, तक्रारकर्ता यांचा ऊस जळालेला नसून केवळ ऊसाचे पाचट जळाले आणि त्यांचा ऊस कारखान्यास गेला असल्यामुळे तक्रारकर्ता यांचे नुकसान झालेले नाही. परंतु त्यांनीही त्या संदर्भात पुरावा दाखल केलेला नाही. अशा स्थितीमध्ये ऊस पीक जळाल्यामुळे त्यांचे किती नुकसान झाले, ही संदिग्धता राहते. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे कथन आहे की, तक्रारकर्ता यांनी ऊस लागण तारीख नमूद केलेली नाही व ऊस लागवड क्षेत्राचा पुरावा दिलेला नाही. असे दिसते की, वर्तमानपत्रामध्ये तक्रारकर्ता यांच्या जळीत ऊस पिकाची बातमी छायाचित्रासह प्रसिध्द झालेली आहे. छायाचित्रामध्ये ऊस पिकाची वाढ झाल्याची दिसते. त्यामुळे ऊस लागण तारखेच्या किंवा लागवडीच्या नोंदीचा पुरावा दिसून येत नसला तरी तक्रारकर्ता यांनी ऊस पीक घेतल्याचे व ते परिपक्व असल्याचे अमान्य करता येत नाही. तक्रारकर्ता यांनी त्यांचे अपेक्षीत ऊस उत्पादन व ऊस दर याबाबत खुलासा केलेला नाही. अशा स्थितीमध्ये योग्य विचाराअंती तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांच्याकडून जळीत ऊस पिकासाठी रु.30,000/- नुकसान भरपाई मिळण्याकरिता पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
26. तक्रारकर्ता यांनी जळीत ठिबक सिंचन संचाकरिता नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. पंचनाम्यामध्ये ठिबक सिंचन संच व पाईप जळाल्याचा उल्लेख आहे. तक्रारकर्ता क्र.1 यांनी ठिबक सिंचन खरेदी केल्याची पावती दाखल केलेली नाही. तसेच ठिबक सिंचन संच तक्रारकर्ता क्र.1 यांच्या शेतजमिनीत होता काय किंवा कसे, याचे स्पष्टीकरण किंवा त्या संदर्भात पुरावा नाही. अशा स्थितीमध्ये तक्रारकर्ता क्र.1 यांचा ठिबक सिंचन संच व पाईप जळाले, हे सिध्द होऊ शकत नाही आणि तक्रारकर्ता यांची मागणी मान्य करता येत नाही.
27. तक्रारकर्ता यांनी मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.50,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्कम ठरविताना काही गृहीत त्या–त्या परिस्थितीवर आधारीत असतात. असे दिसते की, तक्रारकर्ता हे व्यवसायाने शेतकरी आहेत. ऊस जळीत घटनेनंतर त्यांना मुख्य बागायती पिकापासून वंचित रहावे लागले. तक्रारकर्ता यांना स्वत:चे दैनंदीन व्यवहार बाजुला ठेवून पोलीस, महसूल, विद्युत महामंडळ इ. यंत्रणाकडे जावे लागले. तसेच नुकसान भरपाई मिळविण्याकरिता करावा लागलेला पाठपुरावा करावा लागलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांना त्रास सहन करावा लागणे स्वाभाविक आहे. तक्रारकर्ता यांची रु.50,000/- नुकसान भरपाईची मागणी असली तरी योग्य विचाराअंती त्याकरिता तक्रारकर्ता रु.5,000/- मिळण्यास पात्र आहेत.
28. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई न दिल्यामुळे तक्रारकर्ता यांना या जिल्हा आयोगापुढे प्रस्तुत तक्रार दाखल करणे भाग पडले. अशा कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्ला, सहायता, प्रकरण शुल्क इ. खर्चाच्या बाबी आहेत. तसेच ग्राहक तक्रार न्यायप्रविष्ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्यय होतो. योग्य विचाराअंती तक्रार खर्चाकरिता तक्रारकर्ता रु.3,000/- मिळण्यास पात्र आहेत, या निर्णयाप्रत आम्ही येत आहोत.
29. विरुध्द पक्ष क्र.4 ही शासकीय यंत्रणा आहे. कायदा व नियमानुसार ते कामकाज करतात. तक्रारकर्ता यांच्या ऊस जळीत घटनेशी ‘ग्राहक’ किंवा ‘सेवा’ संदर्भाने त्यांचा योग्य व उचित संबंध येत नाही.
30. विरुध्द पक्ष यांनी मा. महाराष्ट्र राज्य आयोगाच्या औरंगाबाद खंडपिठाचा ‘कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. /विरुध्द/ रमेश मनोज देशमुख’, प्रथम अपील क्र. 710/2008 मध्ये दिलेला न्यायनिर्णय अभिलेखावर दाखल केला. परंतु त्या निवाडयामध्ये विषद वस्तुस्थिती व न्यायिक प्रमाण प्रस्तुत तक्रारीशी सुसंगत नसल्यामुळे तो निवाडा येथे लागू पडत नाही.
30. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना रु.30,000/- नुकसान भरपाई द्यावी.
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- नुकसान भरपाई द्यावी.
3. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना तक्रार खर्चापोटी रु.3,000/- द्यावेत.
4. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाचे आत करावी.
5. विरुध्द पक्ष क्र.4 यांच्याविरुध्द आदेश नाहीत.
(श्री. किशोर द. वडणे)
(श्री. मुकुंद भ. सस्ते) अध्यक्ष (श्री. शशांक श. क्षीरसागर)
सदस्य सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-